उत्तर कोरियात का उभी राहत आहेत रिसॉर्ट्स, लक्झरी स्पा आणि बागा?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिक जाखड
- Role, पूर्व आशिया तज्ज्ञ
गरीबीशी झगडा करणारा उत्तर कोरियासारखा देश सध्या करमणूक आणि विरंगुळ्यासाठीच्या सोयी निर्माण करण्यावर मोठा भर देतोय.
किम जाँग-उन यांच्या राजवटीमध्ये देशभरात अनेक रिसॉर्ट्स, शॉपिंग मॉल्स आणि अम्युझमेंट पार्क्स उभी राहिली आहेत. जानेवारीतच उद्घाटन झालेलं यांगडॉक हॉट स्प्रिंग्स रिसॉर्ट यापैकीच एक.
या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याने विशेष रस घेतलेला दिसतोय. कारण 2019वर्षात किम जाँग-उन यांनी किमान 5 वेळा यांगडॉकला भेट दिली.
यापैकीच एका भेटीदरम्यान त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना झऱ्यांचं पाणी अंडी उकडली जातील इतपत गरम ठेवण्याच्या सूचना दिल्याचं समजतं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
पवित्र मानल्या जाणाऱ्या पाएक्तु पर्वताजवळ सामजियॉन इथे गेल्या महिन्यात एक नवीन माऊंटर स्पा आणि स्की रिसॉर्ट सुरू झालं आहे. उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय मीडियाने याचं वर्णन, 'आधुनिक संस्कृतीचं प्रतीक' असं केलं होतं.
वाॉनसान-कालमा टुरिस्ट झोनमध्ये होत असलेल्या अशाच एका प्रकल्पात किम जाँग-उन यांना विशेष रस असून हा प्रकल्प एप्रिलमध्ये खुला होणार आहे.
पण उत्तर कोरिया या सगळ्याची निर्मिती का करतंय?
नवीन स्वित्झर्लंड?
या देशाला सध्या गरज आहे ती चांगलं मूल्य असणाऱ्या परदेशी चलनाची. आणि ते परदेशी पर्यटकांकडूनच मिळू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर अनेक निर्बंध घातलेले आहेत. यामुळे कोळसा, शस्त्र वा खाण उद्योगाद्वारे पैसे कमावण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. पण यामध्ये पर्यटनाचा समावेश करण्यात आलेला नाही.
याशिवाय आतापर्यंत देशाबाहेर काम करणाऱ्या उत्तर कोरियाच्या कामगारांकडूनही प्याँगयांगला मोठा महसूल मिळत होता. पण निर्बंधांमुळे या कामगारांना डिसेंबरमध्ये देशात परतण्यास सांगण्यात आलं.
देशाकडचे सध्याचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेता विचारपूर्वक काही प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आल्याचं एनके न्यूजच्या पत्रकार जिऑंगमिन किम सांगतात.
"परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी उत्तर कोरियाकडे उरलेल्या काही निवडक पर्यायांपैकी पर्यटन एक आहे," त्यांनी बीबीसी मॉनिटरींगशी बोलताना सांगितलं.
2019 मध्ये सुमारे 3,50,000 चीनी पर्यटक उत्तर कोरियात आल्याचा एनके न्यूजचा अंदाज आहे. यामुळे देशाला 175 दशलक्ष डॉलर्सचा फायदा झाला आहे.

फोटो स्रोत, KCNA
आपल्याला उत्तर कोरियाशी असलेले तणावपूर्वक संबंध सुधारायचे असल्याने आपण आपल्या नागरिकांना उत्तर कोरियाला भेट देण्याची परवानगी देण्याची शक्यता असल्याचं दक्षिण कोरियानेही म्हटलं होतं.
पण यामध्येही उत्तर कोरियासमोर एक पेच आहे. त्यांना पैशाची तर गरज आहे पण ते स्थानिकांना पर्यटकांच्या संपर्कात येऊ देऊ शकत नाहीत. कारण या परदेशी पर्यटकांचा प्रभाव स्थानिकांवर पडण्याची त्यांना भीती आहे.
"परदेशी चलन मिळवतानाच स्थानिक नागरिकांचा परदेशी लोकांशी फारसा संपर्क येऊ नये म्हणूनच काही ठराविक विशेष पर्यटन क्षेत्रच खुली करण्याचं त्यांचं उद्दिष्टं आहे," जिऑंगमिन किम सांगतात.
पण एक पर्यटन केंद्र होण्यासाठी उत्तर कोरियाला रिसॉर्ट्स बांधण्यापेक्षा जास्त काहीतरी करावं लागेल.
"उत्तर कोरियात येणारे पर्यटक हे पश्चिमेकडच्या देशातले श्रीमंत पर्यटक असतील असं जर किम जाँग-उन यांना वाटत असले तर त्यांचे प्रकल्प यशस्वी होणार नाहीत," दक्षिण कोरियाच्या कूकमिन विद्यापीठाचे प्राध्यापक आंद्रे लांकोव्ह म्हणतात.
"उत्तर कोरियाच्या एकूणच आर्थिक विकासासाठी हातभार लावण्याची क्षमता पर्यटनात असली तरी यावरच्या मर्यादा अजून स्पष्ट नाहीत. उत्तर कोरिया म्हणजे काही स्वित्झर्लंड नाही," एनके न्यूज दैनिकाच्या वेबसाईटवर 8 नोव्हेंबरला छापण्यात आलेल्या लेखात त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, KCNA
याशिवाय कोरोना व्हायरसच्या फैलावाचा परिणामही किम यांच्या योजनांवर होण्याची शक्यता आहे. या व्हायरसच्या उद्रेकानंतर उत्तर कोरियामध्ये परदेशी पर्यटकांवर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त आहे.
'लोकांविषयीचं प्रेम'
देशासमोर आर्थिक अडचणी असल्या तरी देशात सर्वकाही उत्तम असल्याचं दाखवत स्थानिकांमध्ये भरभराटीची भावना निर्माण व्हावी यासाठी या सुखसोयींची निर्मिती करण्यात आली आहे.
"कितीही निर्बंध लादण्यात आले तरी आपल्या देशामध्ये या चांगल्या सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती ही लोकांना 'सुसंस्कृतपणे' जगता यावं यासाठी करण्यात येत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हावा यासाठी हे सगळं करण्यात येतंय," जिऑंगमिन किम म्हणतात.
उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय माध्यमांनी या पर्यटनस्थळाचं गेल्या काही काळात तपशीलवार वार्तांकन केलं असून याद्वारे या स्थळांचा प्रचारही करण्यात येतोय.
किम यांच्या 2019मधल्या कामाबद्दलची एक डॉक्युमेंटरी उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्यात आली. यामध्ये यांगडॉक रिसॉर्ट आणि सामजियॉन शहराच्या निर्मितीची माहिती सांगण्यावर मोठा भर देण्यात आलेला आहे.
यांगडॉक रिसॉर्ट आणि त्या जवळच्या परिसरातले रस्ते, तिथलं हवामान याविषयीची विशेष माहिती देणारं सेगमेंटही या चॅनलवर दाखवण्यात आलं.

फोटो स्रोत, KCNA
"यांगडॉक रिसॉर्ट हे सर्वोच्च नेते किम जाँग-उन यांच्या लोकांविषयीच्या प्रेमाचं प्रतीक असून लोकांनी अधिक सुसंस्कृत आयुष्य जगता यावं या चांगल्या उद्दिष्टाने ते बांधण्यात आलेलं आहे," KCNA न्यूज एजन्सीच्या अधिकाऱ्याने 21 जानेवारीला म्हटलं होतं.
"लोकांची आवड लक्षात घेत वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या सूज्ञ नेतृत्त्वाखाली बांधण्यात आलेल्या या रिसॉर्टमध्ये आता मोठ्या प्रमाणावर लोक आनंद घेत आहेत," त्यांनी पुढे सांगितलं.
1990च्या दशकात लोकांच्या जगण्यासाठीच्या गरजा वेगळ्या होत्या. आता लोकांच्या मागण्या वाढल्या असून आयुष्य फक्त जगण्यापुरतं उरलेलं नसल्याचं उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवून असणाऱ्या ब्लॉगचे सह-संपादक बेंजामिन कॅटझेफ सिलबर्थस्टिन म्हणतात.
"बहुतांश उत्तर कोरिया अजूनही अतिशय गरीब आहे. पण अगदी त्यांच्या शहरातली परिस्थिती बदलत नसली तरी एकंदरीतच गोष्टी सुधारत असल्याची भावना किम यांना लोकांमध्ये निर्माण करायची आहे. पण आता असा एक मध्यमवर्ग निर्माण होतोय जो पैसे कमावतो ज्यांना मजा करायची आहे आणि ज्यांच्याकडे खर्चायला पैसेही आहेत," बीबीसी मॉनिटरींगशी बोलताना त्यांनी सांगितलं.
"किम जाँग-उन यांना मोठ्या महत्त्वाकांक्षा असलेला एक वेगळ्या धाटणीचा नेता व्हायचं आहे आणि मनोरंजनाच्या सुखसोयींची निर्मिती हे ते दाखवण्याचा एक मार्ग आहे."
बांधकाम व्यवसायाला गती
उत्तर कोरिया एक आधुनिक देश आहे असं दाखवत देशप्रेमाची एक भावना निर्माण करण्याची किंम यांची इच्छा आहे. म्हणूनच अशा 'शोपीस' म्हणजेच दाखवण्यासाठीच्या बांधकाम प्रकल्पांवर भर देण्यात येतोय.
देशाच्या पूर्व किनारपट्टीवर वॉनसान-कालमा टूरिस्ट झोन तयार करण्यात येतोय. यामध्ये बीचसमोर असणारी हॉटेल्स आहेत, क्रीडा संकुल, वॉटरपार्क आणि बरंच काही आहे.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर याचं ऑक्टोबर 2019मध्ये उद्घाटन होणं अपेक्षित होतं. पण बांधकाम साहित्याच्या तुटवड्यामुळे या प्रकल्पाचं काम मागे पडलं. हा आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा परिणाम होता.
कुमगँग पर्वताचा 'एक अनोखं जागतिक सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र' म्हणून विकास करण्याचा आपला इरादा असल्याचंही किम यांनी जाहीर केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी दक्षिण कोरियाला या भागातली आपली बांधकामं हटवण्यासही सांगितलं आहे.
किम जाँग-उन यांच्याच राजवटीच्या काळामध्ये मासिकरियाँग स्की रिसॉर्ट, कांग्ये रिसॉर्ट, मिरेई सायंटिस्ट स्टीट आणि प्याँगयांगमधील रेऑमयाँग स्ट्रीटचं बांधकामम झालेलं आहे.
पण हे सगळे प्रकल्प फक्त दिखाव्याचे असून त्यांचा प्रत्यक्ष काहीही उपयोग नसल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
यासोबतच या प्रकल्पांच्या बांधकामासाठी जबरदस्तीने मजुरी करवून घेतली जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, KCNA
उत्तर कोरियातून नुकतंच पलायन केलेल्या एका व्यक्तीने सामजियॉनच्या बांधकामावरील मजुरांसाठीच्या कठीण परिस्थितीविषयी नुकतंच भाष्य केलं होतं.
"उपाशीपोटी थंडीमध्ये काम करणाऱ्या त्या मुलांच्या विचाराने मी रात्रभर जागा राहतो," त्या व्यक्तीने 20 जानेवारी रोजी बोलताना एनके न्यूजला सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









