अण्वस्त्रांचा देश म्हणून ओळख असलेल्या उत्तर कोरियाला इंटरनेटचा सप्लाय कोण करतं?

उत्तर कोरिया, रशिया, इंटरनेट

फोटो स्रोत, STR/AFP/ GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन

सातत्याने अणूचाचण्या आणि मिसाइलच्या चाचण्या करण्यासाठी कुप्रसिद्ध उत्तर कोरियावर अनेक देशांचे निर्बंध आहेत. पण उत्तर कोरियाला इंटरनेट कोण देतं याचं उत्तर उघड झालं आहे.

उत्तर कोरियात इंट्रानेट व्यवस्था आहे. असंख्य सोशल मीडिया वेबसाईट्सवर उत्तर कोरियात बंदी आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचा जगाशी संपर्क कसा राहतो? त्यांना इंटरनेट कोण पुरवतं?

उत्तर कोरियामधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या अभ्यासक तसंच संशोधकांना हा प्रश्न नेहमी भेडसावतो. काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालेल्या वृत्तानुसार रशिया उत्तर कोरियाला इंटरनेट पुरवत असल्याचं उघड झालं आहे.

उत्तर कोरिया, रशिया, इंटरनेट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, किम जोंग उन आपल्या सहकाऱ्यांसमवेत

रशियाची ट्रान्स टेलिकॉम कंपनी उत्तर कोरियाच्या इंटरनेटचा सोर्स असल्याचं पुढे आलं आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनी फायर आय कंपनीने यासंदर्भात माहिती दिली.

रशियाच्या कंपनीने उत्तर कोरियात इंटरनेट सेवा पुरवण्यास नुकतीच सुरुवात केली आहे.

रशियाची मजबूत पकड

आतापर्यंत उत्तर कोरियात 'चायना युनायटेड नेटवर्क कम्युनिकेशन लिमिटेड कंपनी' इंटरनेट सेवा पुरवत असे. आता हे काम रशियातली एक कंपनी करत आहे.

उत्तर कोरिया, रशिया, इंटरनेट

फोटो स्रोत, Getty Images

रशियानं उत्तर कोरियाला इंटरनेट सेवा पुरवल्यानं जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. सातत्याने अण्विक चाचण्या करत असल्याने उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. इंटरनेटबंदीमुळे या देशाची कोंडी होऊ शकते.

रशियाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळाल्याने उत्तर कोरिया तंत्रज्ञानदृष्ट्या बळकट झाला आहे आणि त्यांच्या समोर अनेक पर्याय खुले झाले आहेत.

याद्वारे रशियाला उत्तर कोरियामधील इंटरनेट वापराच्या तपशीलावर नियंत्रण मिळालं आहे, असं फायर आय कंपनीचे आशिया पॅसिफिक क्षेत्राचे प्रमुख ब्रायस बोलँड यांनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्र संघटनेने उत्तर कोरियावर तेल आणि कपड्यांच्या आयात-निर्यातीवर प्रतिबंध दाखल केले होते. मात्र त्यात इंटरनेटचा समावेश नव्हता.

अमेरिकेचा सायबर अटॅक

अमेरिकेतर्फे उत्तर कोरियन लष्कराच्या गुप्तहर संघटनेचं कामकाज हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होतं.

उत्तर कोरिया, रशिया, इंटरनेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियासंदर्भातील वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झाले.

उत्तर कोरियाच्या तंत्रज्ञानाचे मार्टिन विलियम जाणकार आहेत. 38 नॉर्थ वेबसाइटकरता लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटलं आहे, 'आतापर्यंत उत्तर कोरिया एकमेव इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून होता.

ही स्थिती त्यांच्यासाठी अडचणीची ठरत होती. आणखी एक सक्षम इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्यानं त्यांची तांत्रिक आघाडी मजबूत झाली आहे'.

याआधी 2014 मध्ये सोनी पिक्चर्स कंपनीवर झालेल्या सायबर हल्ल्याचा फटका उत्तर कोरियाला बसला होता.

सोनी पिक्चर्स कंपनीने उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या कथित हत्येवर आधारित 'द इंटरव्ह्यू' या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता.

उत्तर कोरिया, रशिया, इंटरनेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीसंदर्भातील एक बातमी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं गेल्या महिन्यात उत्तर कोरियावर नवा प्रतिबंध लादला होता. प्रतिबंधाच्या नव्या कलमांना चीन तसंच रशियानेही मंजुरी दिली होती.

उत्तर कोरियावर निर्बंध

उत्तर कोरियानं तीन सप्टेंबरला सहावी आणि सगळ्यात मोठ्या क्षमतेची आण्विक चाचणी केली. यानंतरच उत्तर कोरियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करण्यात आले.

आम्ही अणुबॉम्ब तयार केला आहे आणि क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आण्विक हल्ल्याचं आक्रमणही करू शकतो असा दावा उत्तर कोरियानं केला होता.

नव्या निर्बंधांनुसार उत्तर कोरियाचे उत्पनाचे प्रमुख स्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

उत्तर कोरियाहून कपड्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उत्तर कोरिया ठराविक अंतरावरच्या देशाकडूनच कच्च्या तेलाची आयात करू शकतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)