कोरोना व्हायरसचा शोध लावणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण होती?

फोटो स्रोत, Getty Images
सध्या जगभरात 'कोरोना' याच नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर संशोधनही सुरू आहे. पण मुळात कोरोना जातीचा विषाणू सर्वात पहिल्यांदा कोणी शोधून काढला?
स्कॉटलंडमधल्या एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरात पहिल्यांदा कोरोनाचं अस्तित्त्व शोधून काढलं. त्यांनी 16 व्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्यांचं नाव होतं जून अल्मेडा. व्हायरस इमेजिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या लोकांच्या यादीत आपल्या नावाची नोंद व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.
कोव्हिड-19 या साथीच्या आजाराच्या काळात पुन्हा एकदा जून यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि त्यांचं संशोधन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
कोव्हिड-19 हा नवीन विषाणू आहे. मात्र, हा विषाणू त्याच कोरोना कुटुंबातला आहे ज्याचा शोध जून अल्मेडा यांनी 1964 साली लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमधल्या प्रयोगशाळेत लावला होता.
व्हायरोलॉजिस्ट जून अलमेडा यांचा जन्म 1930 सालचा. स्कॉटलंडच्या ग्लासगोव्ह शहराच्या ईशान्येकडील एका वस्तीत अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

16 व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानतंर जून ग्लासगोव्ह शहरातल्याच एका लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून रुजू झाल्या.
तिथून पुढे त्या लंडनला गेल्या. 1954 साली त्यांनीा व्हेनेझुएलातील एक कलावंत एनरिके अलमेडा यांच्याशी लग्न केलं.
सामान्य सर्दी-पडशावर संशोधन
वैद्यकीय क्षेत्रावर विपुल लिखाण करणारे लेखक जॉर्ज विंटर यांच्या मते लग्नानंतर काही वर्षातच हे जोडपं आपल्या लहान मुलीसोबत कॅनडाच्या टोरंटो शहरात गेलं.
कॅनडातल्या ओंटारियो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. जून अल्मेडा यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने स्वतःतलं उत्कृष्ट कौशल्यं विकसित केलं. या संस्थेत काम करताना त्यांनी विषाणुची कल्पना करणं अगदी सुलभ करणारं तंत्र विकसित केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
लेखक जॉर्ज विंटर यांनी बीबीसीला सांगितलं, की युकेने डॉ. जून अल्मेडा यांच्या कामाचं महत्त्व जाणून 1964 साली लंडनमधल्या सेंट थॉमस मेडिकल स्कूलमध्ये काम करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. हे तेच हॉस्पिटल आहे जिथे कोव्हिड-19 आजाराचा संसर्ग झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना दाखल करण्यात आलं होतं.
कॅनडाहून परतल्यानतंर डॉ. अल्मेडा यांनी डॉ. डेव्हिड टायरेल यांच्यासोबत संशोधन सुरू केलं. डॉ. टायरेल त्यावेळी साध्या सर्दी-पडशावर संशोधन करत होते.
जॉर्ज विंटर यांनी सांगितलं, की डॉ. टायरेल यांनी सर्दीमुळे नाकातून गळणाऱ्या द्रवाचे अनेक नमुने गोळा केले होते आणि त्यांच्या टीमला जवळपास सर्वच नमुन्यांमध्ये साध्या सर्दी-पडशात आढळणारे विषाणू दिसत होते.
मात्र, यातला एक नमुना ज्याला B0814 असं नाव देण्यात आलं होतं, तो इतर सर्व नमुन्यांपेक्षा वेगळा होता. हा नमुना 1960 साली बोर्डिंग स्कूलमधल्या एका विद्यार्थ्याकडून घेण्यात आला होता.
विषाणुला 'कोरोना' हे नाव कुणी दिलं?
डॉ. टायरेल यांना वाटलं, की या नमुन्याची चाचणी डॉ. जून अल्मेडा यांच्या मदतीने इलेक्ट्रॉन मायक्रोस्पद्वारे करावी.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी तो नमुना डॉ. जून अल्मेडा यांच्याकडे पाठवला. त्यांनी हा नमुना बारकाईने तपासला आणि सांगितलं, की हा विषाणू इन्फ्लुएंझासारखा दिसत असला तरी हा तो नाही. हा विषाणू वेगळा आहे.
हाच तो विषाणू आहे ज्याला पुढे डॉ. जून अल्मेडा यांनी 'कोरोना' विषाणू असल्याचं सांगितलं.
जॉर्ज विंटर सांगतात, की डॉ. जून अल्मेडा यांना याच विषाणुसारखे कण त्याआधी उंदरांना होणारा हिपॅटायटिस आणि कोंबड्यांना होणाऱ्या संसर्गजन्य ब्राँकायटिसमध्ये दिसले होते.
विंटर सांगतात, की या विषाणुबाबत डॉ. जून अल्मेडा यांनी जो पहिला रिसर्च पेपर सादर केला होता तो फेटाळण्यात आला होता. डॉ. अल्मेडा यांनी इन्फ्लुएंझा विषाणुचंच खराब छायाचित्र सादर केलं आहे, असं कारण त्यावेळी देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र B-814 या नमुन्यापासून करण्यात आलेलं हे संशोधन 1965 साली प्रकाशित झालेल्या ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि दोन वर्षांनंतर जर्नल ऑफ जनरल व्हायरोलॉजीमध्ये विषाणुच्या छायाचित्रासह प्रकाशित करण्यात आलं.
जॉर्ज विंटर यांच्या मते या विषाणुची उंच-सखल रचना बघूनच डॉ. टायरेल, डॉ. अल्मेडा आणि सेंट थॉमस मेडिकल संस्थेचे प्राध्यापक टोनी वॉटरसन यांनी या विषाणुला 'कोरोना' हे नाव दिलं.
त्यानंतर डॉ. जून अल्मेडा यानी लंडनमधल्या पोस्टग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं. तिथूनच त्यांनी डॉक्टरेट घेतली.
कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांमध्ये डॉ. जून अल्मेडा वेलकॉम इन्स्टिट्युटमध्ये होत्या. तिथे इमेजिंगच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवीन विषाणू शोधून काढले आणि त्याचे पेटंट मिळवले.
वेलकॉम इन्स्टिट्युटमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. जून अल्मेडा यांनी योग शिकवायला सुरुवात केली.
मात्र, 1980च्या दशकात त्यांना संरक्षक म्हणून एचआयव्ही विषाणुचं नोव्हल छायाचित्र बनवण्यासाठी बोलवण्यात आलं.
2007 साली डॉ. जून अल्मेडा यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या 77 वर्षांच्या होत्या.
आज त्यांच्या मृत्यूच्या 13 वर्षांनंतर त्यांना आणि त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने मान्यता मिळत आहे. एक उत्तम संशोधक म्हणून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत. आज जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणुच्या संसर्गाचा अभ्यास करण्यात त्यांच्या संशोधनाची मोलाची मदत होतेय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








