कोरोना व्हायरस : अमेरिकेत दोन लाख नागरिकांचे प्राण जाऊ शकतात?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अमेरिकेत 1 लाख 40 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 2200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर दोन आठवड्यात वाढू शकतो, असं ट्रम्प यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे हॉस्पिटल यंत्रणेवर ताण पडू शकतो असंही त्यांनी सूचित केलं.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे दोन लाख अमेरिकन नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो, असा इशारा व्हाईट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी दिला होता. लाखो अमेरिकन नागरिकांना याचा संसर्ग होऊ शकतो हे सत्य आहे, अशा शब्दांत डॉ. फाऊची यांनी इशारा दिला होता.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या एक लाखापर्यंत नियंत्रणात ठेवली तर आपण समाधानकारक कामगिरी केली असं म्हणता येईल, असं ट्रंप यांनी म्हटलं.
अमेरिकेत कोरोना व्हायरसने घातलेलं थैमान लक्षात घेऊन ट्रंप प्रशासनाने कोरोनासंदर्भातील नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

काही दिवसांपूर्वी इस्टरपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत हे निर्बंध असतील, असे संकेत ट्रंप यांनी दिले होते. मात्र आता एप्रिलअखेरीपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळावे लागतील असंही ट्रंप यांनी म्हटलं.
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक लाख चाळीस हजाराच्या पुढे गेली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2, 493 एवढी आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
ट्रंप यांनी काय म्हटलं?
कोरोना व्हायरस टास्क फोर्स प्रेस ब्रिफिंगवेळी राष्ट्राध्यक्ष ट्रंप बोलत होते. सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनावरचा उतारा आहे. जूनपर्यंत अमेरिका कोरोना संकटातून सावरलेला असेल असंही त्यांनी सांगितलं.
येत्या दोन आठवड्यात अमेरिकेत कोरोना मृत्यूदराचं प्रमाण टोकाला जाऊ शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. "या आजारावर संपूर्णपणे मात करेपर्यंत आपण जिंकलो असं जाहीर करणं वेडेपणाचं ठरेल. या आजाराचा समूळ बीमोड करायला हवा," असं ट्रंप यांनी म्हटलं.
विश्लेषकांच्या मते, मृत्यूदर वाढण्याचा इशारा म्हणजे कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते असं ट्रंप यांना म्हणायचं असावं.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमावलीचं पालन केलं नाही तर कोरोनामुळे 2.2 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू ओढवू शकतो हे लक्षात आल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी इस्टर सणाचा काळ आनंदाचा असेल, असं ट्रंप यांनी म्हटलं होतं. आणखी काही आस्थापनं आता खुली होतील, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र इस्टरवेळी निर्बंध हटवणं ही केवळ शक्यताच होती.
ते पुढे म्हणाले, "आपल्याला आपलं नेहमीचं आयुष्य जगायला मिळावं हीच माझी इच्छा आहे. मला आकडेवारी दिसते आहे, कोरोनावर लवकरात लवकर विजय मिळवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे."
कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी वेगवान चाचण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चाचणीनंतर पाच मिनिटात कोरोनाचा संसर्ग झाला आहे, की नाही हे कळू शकेल. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स तसंच अन्य स्टाफच्या चाचण्या करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेत काय परिस्थिती?
नागरिकांनी अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनाने नागरिकांना सांगितलं आहे. ऑफिसला जाणं, रेस्तराँमध्ये जेवण तसंच बारमध्ये जाणं याला अनुमती नाही. एकावेळी केवळ दहा माणसंच एकत्र येऊ शकतात. कोरोनाचा प्रादूर्भाव झालेल्या अनेक राज्यांनी यापेक्षा कठोर निर्बंध लागू केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कोनेक्टिकट इथल्या रहिवाशांना 14 दिवसांकरता देशभरात कुठेही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क शहरातील नॉन इसेन्शियल म्हणजेच आवश्यकता नसणाऱ्या सभा-मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश आस्थापनं बंद करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क शहरात कोरोना बाधितांची संख्या 33,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अनावश्यक बाहेर पडल्यास पोलीस 250-500 डॉलर्स एवढा दंड ठोठावू शकतात.
वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता?
काही हॉस्पिटल्स व्हेंटिलेटर, मास्क तसंच आपात्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या उपकरणांचा साठा करून ठेवत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला होता. ज्यांच्याकडे या वस्तू अतिरिक्त प्रमाणात आहेत त्यांनी त्या अन्य हॉस्पिटल्सना द्याव्यात, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
येत्या आठवड्यांमध्ये काय होईल याचा विचार करत हॉस्पिटल्सनी वैद्यकीय उपकरणांचा साठा करायला नको, असं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना काळात व्हेंटिलेटरची उपलब्धता हा आरोग्य क्षेत्रापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज वाढत चालली आहे.
अमेरिकेतील अनेक राज्यांनी येत्या काही दिवसात व्हेंटिलेटरचा साठा संपुष्टात येईल, असं स्पष्ट केलं आहे.
कोरोनाचा संसर्ग फुप्फुसांवर आक्रमण करतो आणि रुग्णाला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात. व्हेंटिलेटरमुळे रुग्णाला श्वास घेण्यात मदत होऊ शकते.
जागतिक परिस्थिती काय?
कोरोनामुळे जगभरात 33,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जर्मनीत कोरोना बाधितांचा आकडा वाढून 57,000 वर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाने नागरिकांवरील निर्बंध कठोर केले आहेत. एकावेळी केवळ दोनच माणसं एकत्र येऊ शकतात. आऊटडोअर जिम आणि पार्क बंद करण्यात आल्या आहेत.
दक्षिण कोरियात सर्व कुटुंबीयांना आपात्कालीन निधी पुरवण्यात येईल, असं राष्ट्राध्यक्ष मून जाइ यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
युकेमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे 20,000 माजी कर्मचारी कामावर रुजू झाल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं.
स्पेनमध्ये रविवारी (29 मार्च) कोरोनामुळे 838 जणांचा मृत्यू झाला.
इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10,779 एवढी झाली आहे.
फ्रान्समध्ये 292 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. खास ट्रेन्सच्या माध्यमातून कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या प्रांतातून रुग्णांना उपचारांसाठी दक्षिणेकडील हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं.
रशियातही नागरिकांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून, आपात्कालीन वैद्यकीय उपचार, औषधं, किराणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








