कोरोना व्हायरस: वृत्तपत्रांना स्पर्श केल्यानं कोव्हिड-19 होतो का?

फोटो स्रोत, ANI
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू आहे. मात्र यादरम्यान ज्या वेगानं कोरोना व्हायरस पसरतोय, त्याच वेगानं चुकीची माहिती आणि अफवाही पसरताना दिसतायत.
त्यातच, वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, असाही एक दावा केला जातोय. प्रिंटिंग प्रेसमधून तुमच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचेपर्यंत अनेक लोकांचा स्पर्श त्याला झालेला असतो. त्यामुळे वृत्तपत्राच्या माध्यमातून व्हायरसचं संक्रमण होतं, असा दावा करण्यात येत आहे.
या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संपर्क केला.
एका ईमेलच्या उत्तरात WHOने बीबीसीला सांगितलं, "जर कुणी कोव्हिड-19 ची लागण झालेली व्यक्ती वृत्तपत्राला स्पर्श केला असल्यास त्यावर विषाणू काही वेळासाठी राहू शकतात. मात्र, वृत्तपत्रांच्या माध्यमातून संक्रमणाची शक्यता फारच कमी आहे. कारण संक्रमण अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, जसं की, तुमच्यापर्यंत विषाणू किती प्रमाणात पोहोचतो, कुठल्या गोष्टीवर किती वेळ विषाणू जिवंत राहतो, कुठल्या वातावरणात आहे, वगैरे."

फोटो स्रोत, WHO
मात्र, याबद्दल अधिक नीट समजून घेण्यासाठी भारताच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NSDC) चे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंह यांच्याशी आम्ही बातचीत केली.
डॉ. सिंह सांगतात, "वृत्तपत्रांमधून कोव्हिड-19 पसरत असल्याचं कुठेच आढळले नाही. अन्यथा, आम्ही स्वत:हून त्याबाबत माहिती दिली असती.
"कोव्हिड-19 हा मुख्यत: शिंकल्यानं किंवा खोकल्यानं तोंडावाटे बाहेर आलेल्या थेंबांद्वारे पसरतो. त्यामुळं लोकांनी एकमेकांपासून विशिष्ट अंतर दूर राहिलं पाहिजे आणि हात स्वच्छ धुवले पाहिजेत, हाच उपाय आहे. हा विषाणू जगात सर्वांसाठीच नवीन आहे. त्यामुळं याच्याशी संबंधित माहिती हळूहळू समोर येत राहील."

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच वृत्तपत्रांशी संबंधित अफवांचा उल्लेख करत एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "आज माझ्या घरीही वृत्तपत्र आलं नाही. मी याबाबत माहिती घेतली, तेव्हा कळलं की वृत्तपत्रांसंबंधी खूप अफवा पसरल्यात. काही लोकांनी पेपरवाल्यांना पेपर घरी न देण्यास सांगितलंय. मी तुमच्यासमोर सांगतो की वृत्तपत्रानं काहीही होत नाही. वृत्तपत्रामुळं खरी माहिती मिळेल, वृत्तपत्र वाचून हात धुवले पाहिजेत."

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, AIIMS मधील औषधी विभागाचे वरिष्ठ डॉक्टर प्रा. नवल विक्रम हे हा दावा पूर्णपणे फेटाळत नाहीत.
डॉ. विक्रम सांगतात, "कोरोना व्हायरस धातूंच्या वस्तूंवर अधिक काळ टिकतो. या तुलनेत कपडे किंवा कागदावर जिवंत राहण्याचा अवधी कमी आहे. वृत्तपत्रामुळं कोरोना व्हायरसची लागण झालेला अद्याप एकही रुग्ण सापडला नाही. मात्र धोक्याची शक्यता कमी असली, तरी ती पूर्णपणे नाकारता येणार नाही."
एकूणच बीबीसीच्या पडताळणीत असं समोर आलं की, वृत्तपत्रांमधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र डॉक्टरांचं मत आहे की, वृत्तपत्र वाचल्यानंतर खबरदारीसाठी हात साबण किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरनं स्वच्छ धुवावेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








