बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टला राम राम, आता फक्त समाजकार्य करणार

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. मायक्रोसॉफ्टसचे सहसंस्थापक असलेले गेट्स 2008 सालापासूनच कंपनीच्या दैनंदिन कामातून बाजूला झाले होते. आता ते पूर्णपणे कंपनीतून बाहेर पडलेत.

मायक्रोसॉफ्टसह बिल गेट्स 'बर्कशायर हाथवे'तूनही बाहेर पडलेत. वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीत ते संचालक पदावर होते. बर्कशायर हाथवेच्या संचालकपदावर ते 2004 सालापासून होते.

मायक्रोसॉफ्टचं माझ्या आयुष्यातील महत्त्व कायमच मोठं राहिलंय, अशा भावना बिल गेट्स यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, यशस्वी उद्योगपती आणि सामाजिक कामं यामुळं बिल गेट्स कायमच चर्चेत असतात. जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स हे दुसऱ्या स्थानावर आहेत.

कॉलेज सोडल्यानंतर बिल गेट्स न्यू मेक्सिकोतील आल्बुकर्की शहरात गेले आणि तिथं बालपणीचा मित्र पॉल अॅलन यांच्या सोबतीनं मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. पॉल अॅलन यांचं दोनच वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली निधन झालं.

मायक्रोसॉफ्टला खरी ओळख मिळाली ती 1980 साली. कारण याच वर्षी मायक्रोसॉफ्टनं IBM कंपनीसोबत ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी करार केला. MS-DOS नावाची ऑपरेटिंग सिस्टम IBM च्या मदतीनं मायक्रोसॉफ्टनं तयार केली.

1986 साली मायक्रोसॉफ्ट सार्वजनिक झाली. यावेळी बिल गेट्स हे 31 वर्षांचेच होते. स्वकर्तृत्वावर श्रीमंत झालेले सर्वात तरूण म्हणून त्यांची जगभरात ओळख निर्माण झाली.

'आता सामाजकार्य करणार'

बिल गेट्स हे 65 वर्षांचे आहेत. आताही ते जगभर फिरत असतात आणि गेट्स फाऊंडेशनचं काम करतात. पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या मदतीनं त्यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या कामाला बिल गेट्स गेल्या काही वर्षांपासून खूप वेळ देताना दिसतात.

द क्रोनिकल ऑफ फिलान्थ्रॉपीनं 2018 साली गेट्स दाम्पत्याला अमेरिकेतील सर्वात दानशूर समाजसेवी म्हणून गौरवलं होतं. गेल्याच वर्षी गेट्स दाम्पत्यानं 4.8 बिलियन डॉलर इतकी संपत्ती सामाजिक कामासाठी दान केली होती.

मायक्रोसॉफ्ट आणि बर्कशायर हाथवे या दोन्ही कंपन्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यानंतर बिल गेट्स यांनी पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक आरोग्य, शिक्षण आणि हवामान बदल या विषयात काम करण्याची इच्छा बिल गेट्स यांनी व्यक्त केलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)