Cut-Copy-Pasteचे जनक लॅरी टेस्लर काळाच्या पडद्याआड

जर तुम्हाला कॉम्प्युटर येत असेल तर Cut Copy Paste या तीन बटणांचं महत्त्व तुम्हाला ठाऊक आहेच. त्याशिवाय काम करणं अगदीच अशक्य आहे.

या तीन बटणांचा किंवा कमांडचा शोध लावणाऱ्या लॅरी टेस्लर यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.

कॉम्प्युटरचा युझर इंटरफेसच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात ज्या लोकांनी अभूतपूर्व योगदान दिलं त्यात टेस्लरचा समावेश होता.

1960 मध्ये त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत काम करायला सुरुवात केली. त्यावेळी काँप्युटर काही लोकांकडेच होता. ते सुरुवातीचे दिवस होते आणि गोष्टी नवीन होत्या. त्यात काही अडचणीही होत्या. टेस्लर यांनी या तीन बटणा सामान्य लोकांसाठी सुकर करून दिल्या.

त्याशिवाय Found and replace (Ctrl+F) यासारख्या अनेक कमांड्स तयार केल्या होत्या. त्यात टेक्स्ट लिहिण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासारखी अनेक कामं सोपी झाली.

युजर इंटरफेस तयार करण्यात तज्ज्ञ

त्यांनी बराचसा काळ अमेरिकन कंपनी झेरॉक्समध्ये घालवला. या कंपनीनेही ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ट्विटमध्ये लिहिलंय, "Cut, Copy, Paste आणि Replace (ctrl+x, ctrl+c, ctrl+v) अशा अनेक कमांड तयार करणारे झेरॉक्स कंपनीचे माजी संशोधक लॅरी टेस्लर होते. ज्या व्यक्तीने आमचं रोजचं आयुष्य सुकर केलं. त्यांचे मन:पूर्वक आभार."

त्यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर युझर इंटरफेस डिझाईनमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं. कॉम्प्युटर सामान्य लोकांसाठी कसा सोपा करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट होतं.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठ्या कंपनीत काम केलं. त्यांनी सुरुवात झेरॉक्स आणि अॅल्टो रिसर्च सेंटरमध्ये केली. त्यानंतर त्यांना स्टीव्ह जॉब्स यांनी अॅपल कंपनीत येण्याची गळ घातली. तिथे त्यांनी 17 वर्षं काम केलं.

अॅपल सोडल्यानतर त्यांनी एका स्टार्टअपची स्थापना केली होती. काही काळ ते अॅमेझॉन आणि याहूमध्येही काम केलं.

2012 मध्ये बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "जेव्हा तुम्ही पैसा कमावता तेव्हा तुम्ही निवृत्त होत नाही तर तो पैसा ते दुसऱ्या कंपनीत लावता."

ते म्हणाले, "आपल्याला जे ज्ञान मिळतं ते दुसऱ्या पिढीला देण्यात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो."

कॉम्प्युटर सामान्यांसाठी आणला

टेस्लर यांनी कॉम्प्युटरच्या क्षेत्रात बरंच काम केलं आहे. कट-कॉपी-पेस्टचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा शोध होता. या शोधामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

सिलिकॉन व्हॅलीतील कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियमच्या मते टेस्लर यांनी कॉम्प्युटर सायन्सचं ट्रेनिंग सोपं केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)