You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T20 World Cup: भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत पाचव्यांदा ट्वेन्टी-20 जेतेपदावर नाव कोरलं. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड इथं झालेल्या ऐतिहासिक लढतीत ऑस्ट्रेलियाने 184 धावांचा डोंगर उभारला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव 99 धावांतच आटोपला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर जेतेपद राखतानाच पाचव्या विश्वविजेतेपदावर नाव कोरलं.
बेथ मूनीने 10 चौकारांसह 78 धावांची खेळी केली. अॅलिसा हिलीने 7 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. या दोघांनी 115 धावांची सलामी दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मन्धाना यांना दोन षटकांतच गमावलं. हरमनप्रीत कौर माघारी परतताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तडाखेबंद फॉर्मात असणारी शफाली केवळ 2 रन्स करून तंबूत परतली. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने तानिया भाटियाला पिंच हिंटर म्हणून पाठवलं. मात्र जोनासनचा बॉल मानेवर आदळल्याने तानिया उपचारांसाठी पॅव्हेलियनमध्ये परतली.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धाना या अनुभवी खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने चार खेळाडू गमावून भारतासमोर 185 धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून अॅलिसा हिली आणि बेथ मूनी या दोघी ओपनिंगसाठी आल्या. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या तडाखेबाद अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 184 धावांची मजल मारली.
हिलीने 39 बॉलमध्ये 75 धावा केल्या तर बेथ मूनीने 54 बॉलमध्ये 78 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने 9.2 च्या सरासरीने 184 धावा केल्या. भारतातर्फे दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि राधा यादव यांनी बॉलिंग केली.
हिली आणि मूनीने सलामीला येऊन तडाखेबाज सुरुवात केली. पहिली विकेट मिळवण्यास भारताला उशीर झाला. बाराव्या ओव्हरमध्ये हिलीची विकेट पडली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 115 होता.
हिलीची विकेट पडल्यानंतर लॅनिंग आली. मूनीने तिच्या साथीने आपला धडाकेबाज खेळ सुरू ठेवला. नंतर लॅनिंग, गार्डनर, हायनेज यांच्या विकेट पडल्या. मूनी 78 धावांवर नॉटऑउट राहिली.
ऑस्ट्रेलियाचा संघ:
अॅलिसा हिली (कर्णधार) बेथ मूनी, मेग लॅनिंग, रॅचेल हायनेज, अॅशले गार्डनर, सोफी मोलिनूएक्स, निकोला केरी, जेस जोनासन, जॉर्जिया वेअरहॅम, डेलिसा किमिन्स, मेगन शूट
भारताचा संघ:
शफाली वर्मा, स्मृती मंधाना, तानिया भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, रादा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)