शफाली वर्माची आयसीसी ट्वेन्टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही संपादक, भारतीय भाषा, बीबीसी

ऑस्ट्रेलिया सध्या महिला क्रिकेटचा टी-20 वर्ल्डकप सुरू आहे. यात भारतीय संघानंही भाग घेतलाय. भारतीय संघात यावेळी यंग ब्रिगेड आहे. कुणी घरच्या स्थितीला नमवत इथवर प्रवास केलाय तर कुणी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या खेळात झेंडा रोवलाय...

या यंग ब्रिगेडचा संघर्षमय प्रवास बीबीसीनं थोडक्यात सांगण्यचा प्रयत्न केलाय...

शफाली वर्मा

"तू मुलगी आहे. तू काय खेळणार? जा बाहेर जाऊन टाळ्या वाजव. जेव्हा मी क्रिकेट खेळायला जात असे, तेव्हा मुलांकडून असं नेहमी ऐकायला मिळत असे. तेव्हा माझे केसही लांब होते. कसंतरीच वाटायचं. तेव्हाच मी ठरवलं की, केस कापायचे. जेव्हा केस कापून गेले, तेव्हा त्यांना कळलंही नाही की, ही मीच आहे. मला मुलगा व्हावं लागलं."

16 वर्षांची क्रिकेटपटू शफाली वर्मा हे सांगतेय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमधील चारमधील दोन सामन्यांमध्ये शेफालीला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताब मिळाला. शनिवारी झालेल्या सामन्यात तर शफालीनं 34 चेंडूत 47 धावा नावावर केल्या, तर बांगलादेशविरोधातील सामन्यात 17 चेंडूत 39 धावा बनवल्या.

मात्र, शफालीचा सुरूवातीचा संघर्ष पाहिल्यास लक्षात येईल की, कुठल्याही छोट्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या मुलीला मैदानात उतरण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो.

2019 च्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शफालीनं भारताच्या टी-20 टीममध्ये प्रवेश केला. आता तिची निवड थेट वर्ल्डकप टीममध्ये झालीय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपसाटी जी भारतीय टीम गेलीय, त्या टीममध्ये शफाली वर्मा आहे.

शफाली ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फॅन आहे. गेल्या वर्षी तिनं सचिनचाच 30 वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला. सचिननं सर्वांत कमी वयात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. आता तो विक्रम शफालीच्या नावे नोंद झालाय. शेफालीनं वेस्ट इंडीजविरोधात 49 चेंडूत 73 धावा बनवल्या होत्या.

2004 साली हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यात शफालीचा जन्म झाला. शफालीचे वडीलही क्रिकेटरसिक होते. त्यांना कुटुंबातून फारसं प्रोत्साहन मिळालं नाही. मात्र, आपल्यालाबाबत घडलेल्या गोष्टी मुलीबाबत घडू नये, हे त्यांनी ठरवलं आणि मुलीला काहीही कमी पडू दिलं नाही.

शफालीनं गेल्यावर्षी बीबीबीसोबत बातचीत केली होती. तेव्हा ती म्हणाली होती, "तू क्रिकेट का खेळतेस, असं माझ्या मैत्रिणी कायमच विचारायच्या. तेव्हा मी हरमन दी, मिताली दी यांचे फोटो दाखवायचे आणि म्हणायचे, यांना पाहिलंय? यांनी भारतीय क्रिकेट संघाला फायनलपर्यंत पोहोचवलंय. मग सगळ्यांचे चेहरे पडायचे."

2013 सालची गोष्ट. सचिन तेंडुलकर रणजी सामन्यासाठी हरियाणात आला असताना, गेस्ट हाऊसवर थांबला होता. तेव्हा शफाली सचिनला पाहण्यासाठी जात असे. आपण क्रिकेट खेळायचं, असं तिनं लहान असल्यापासूनच ठरवलं होतं. शफालीची जिद्द तिला वर्ल्डकपपर्यंत घेऊन आलीय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शफालीच्या कारकीर्दीला पाच महिनेच झालेत. मात्र, आताच शफालीच्या फलंदाजीला भारतीय संघाचा मोठा आधार मानला जातोय. वर्ल्डकपमधील शफालीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आतापर्यंत 14 टी-20 सामन्यांमध्ये शफालीनं 324 धावा आपल्या नावावर केल्यात.

शफालीप्रमाणेच टी-20 वर्ल्डकप खेळणाऱ्या राधा यादवचीही संघर्षकथा आहे.

राधा यादव

राधा यादव केवळ 19 वर्षांची आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी-20 वर्ल्डकप राधाचा दुसरा वर्ल्डकप आहे.

शनिवारी श्रीलंकेविरोधातल्या सामन्यात राधानं चार विकेट्स घेतल्या आणि 'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताबही मिळवला.

टी-20 वर्ल्डकपच्या रँकिंगमध्ये राधा चौथ्या क्रमांकावर आहे. तिची ही कामगिरी भारतीय गोलंदाजांमधील तिची जागाही स्पष्ट करते.

2000 साली राधाचा जन्म झाला. अत्यंत गरिबीत राधाचं बालपण गेलं. मुंबईतल्या कांदिवली भागात 200-250 स्केअऱ फुटाच्या घरात ती लहानाची मोठी झाली. संघर्षमय आयुष्य राहिलं असलं, तरी आपल्या जिद्दीच्या बळावर राधानं आता भारताच्या महिला संघात स्थान मिळवलंय आणि वर्ल्डकपमध्येही खेळतेय.

पोटापाण्यासाठी राधाचे वडील उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून मुंबईला स्थलांतरित झाले. सुरूवातीला दूध विकण्याचा व्यवसाय करू लागले.

राधा अफलातून क्रिकेट खेळत असे. मात्र, घरची स्थिती नव्हती की, राधाला चांगलं प्रशिक्षण दिलं जाऊ शकेल. त्याचवेळी प्रफुल्ल नाईक नावाच्या प्रशिक्षकाची राधाला मदत मिळाली. प्रफुल्ल नाईक यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहानामुळं राधाच्या क्रिकेटमधील स्वप्नाला आणखी बळकटी मिळाली.

2018 साली म्हणजे वयाच्या 17 व्या वर्षी राधाला भारताच्या टी-20 संघात पहिल्यांदा संधी मिळाली आणि 2019 साली ICC चा 'टीम ऑफ द इयर' (टी20) पुरस्कारही राधाला मिळाला.

घरची आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही राधानं जिद्द कधीच सोडली नाही.

2020 साली म्हणजे यंदा ज्यावेळी बीसीसीआयनं राधाला 'ग्रेड बी काँट्रॅक्ट'साठी निवडलं, तेव्हा राधाच्या आनंदाला सीमा उरली नाही. मात्र, अजूनही तिचे स्वप्न पूर्ण झालं नाही. अजूनही असंख्य स्वप्नं तिनं उराशी बाळगलीयेत.

टी-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये शिखा पांडे आणि दिप्तीसोबत राधाच्या गोलंदाजीवरही भारतीय संघाची मदार आहे.

जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज भलेही 19 वर्षांची असेल, पण भारतीय महिला क्रिकेटसाठी ती 39 टी-20 आणि 16 वन डे सामने खेळली आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये जेमिमा भारतीय संघाची अत्यंत विश्वासार्ह फलंदाज आहे. ICC टी-20 रँकिंगमध्ये जेमिमा सातव्या स्थानावर आहे.

अनेक क्रिकेटर्ससारखंच जेमिमाही सचिन तेंडुलकरलाच आपला आदर्श मानते. लहानपणापासूनच जेमिमाला क्रिकेटची आवड आहे. आधी अंडर-19 आणि नंतर भारतीय टीममध्ये जेमिमानं स्थान मिळवलंय.

भारतीय संघात जेमिमाला 'जेमी' नावानं ओळखलं जातं.

क्रिकेटच्या मैदानाइतकंच ती बाहेरही उत्साही असते. ती उत्तम गिटार वाजवते. सोशल मीडियावर तर ती 'स्टार' आहे.

ऋचा घोष

केवळ 16 वर्षांची ऋचा ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप खेळतेय.

या वर्ल्डकपच्या काही दिवस आधीच म्हणजे फेब्रुवारीतच ऋचानं पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. इतक्या कमी अनुभवानंतरही ऋचा भारतीय संघाचा भाग आहे.

सचिन तेंडुलकर तिचा आदर्श आहे, तर महेंद्रसिंह धोनीची षटकार मारण्याची स्टाईल तिला आवडते.

सिलीगुडीसारख्या लहानशा भागात राहणारी ऋचा स्थानिक क्लबमध्ये क्रिकेट खेळणारी एकमेव मुलगी होती. मात्र, यामुळं ती निराश झाली नाही. वयाच्या 11 व्या वर्षीच तिची निवड अंडर-19 टीममध्ये झाली.

ऋचा फलंदाजी करते, गोलंदाजी करते आणि विकेटकीपिंगही करते. वर्ल्डकपमधील तिच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल.

शफाली, राधा, जेमिमा आणि ऋचा यांसारख्या युवा महिला खेळाडूंच्या वैयक्तिक संघर्षकथा वेगवेगळ्या असूनही त्या सर्व एकसारख्या आहेत - याचं कारण कुणी पुरुषप्रधानतेला, तर कुणी प्रथा-परंपरांना ठोकर मारून, तर कुणी आपल्या घरातील गरिबीला पराभूत करून इथवर या मुली पोहोचल्यात.

उराशी बाळगलेली स्वप्नं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची मनातली अफाट जिद्द आणि अखंड मेहनत - हेच त्यांच्या इथवर पोहोचण्याचं शस्त्र आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)