You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: इटलीत 366 जणांचा मृत्यू, साडे सात हजार जणांना लागण
चीननंतर आता इटलीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथे कोरोनामुळे आतापर्यंत 366 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एका दिवसातच 133 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 5,883 वरून 7,375 इतकी झाली आहे.
जगभरात आतापर्यंत जवळपास 1 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि त्यापैकी 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
या विषाणूचा वेगाने होणारा प्रसार चिंताजनक आहे आणि सर्व राष्ट्रांनी या विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायांना 'सर्वोच्च प्राधान्य' द्यावं, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचलाक टेडरॉस अॅधनॉम गेब्रेयेसेस यांनी केलं आहे.
इटलीमध्ये नेमकं काय घडतंय?
इटली प्रशासनाने शुक्रवारी 24 तासात मृत झालेल्या व्यक्तींची आकडेवारी जाहीर केली. या एका दिवसात सर्वाधित मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांकडून मृत्यूच्या कारणाची माहिती मिळत नाही, तोवर निश्चित आकडेवारी सांगत येत नसल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.
इटलीच्या आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांचं सरासरी वय 81 आहे आणि यापैकी बहुतांश लोकांना काहीतरी आजार होते. शिवाय मृत्यू झालेल्यांपैकी 72% पुरूष होते.
इटली हा वृद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशाच्या लोकसंख्येत सर्वाधिक प्रमाण वृद्धांचं आहे.
इटली सरकारने दिलेल्या माहितीनुसार इटलीत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांपैकी 4.25% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर खूप जास्त आणि काळजी वाढवणारा आहे. त्यामुळे इटली सरकारने तातडीचे उपाय योजायला सुरुवात केली आहे.
याच आठवड्यात इटलीतील शाळांना 10 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसंच सर्व व्यावसायिक क्रीडा स्पर्धादेखील एकतर रद्द करण्यात आल्या किंवा बंद दाराआड खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीबीसीचे रोममधले प्रतिनिधी मार्क लॉवेन यांनी ट्वीट करत सांगितलं की कोरोनाची बाधा झालेल्या आणि एकांतवासात ठेवलेल्या एका रुग्णाने त्यांना सांगितलं, सर्वात क्लेषकारक बाब म्हणजे गर्दीची ठिकाणं टाळण्यासाठी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची अंत्ययात्रा काढायलाही बंदी घालण्यात आली आहे.
चीन, दक्षिण कोरिया आणि इराण या तीन देशांमध्ये कोरोनामुळे इटलीपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
कोरोनाविषयीचे अपडेट
- व्हॅटिकन, सर्बिया, स्लोव्हाकिया, पेरू आणि टोगोमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
- युकेमध्ये कोरोनाविषाणुची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या एका 80 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. युकेमध्ये कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नासाठी 8.3 अब्ज डॉलरचं 'इमरजंसी बिल' मंजूर केलं आहे.
- फ्रान्समधल्या काही भागांमध्येही कोरोनाचा फैलाव होतोय. त्यामुळे तिथेही सरकारने शाळा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
- कॅनडामध्येही कोरोनाचा पहिला 'स्थानिक' (कम्युनिटी) रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती परदेशात गेली नव्हती किंवा कोरोनाविषाणुची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातही आली नव्हती.
- एका क्रूज शीपलाही माल्टच्या किनाऱ्यावर थांबा घेण्यापासून रोखण्यात आलं.
- कोरोनाच्या भीतीमुळे अमेरिकेत होणारा 'south by southwest' हा संगीत सोहळादेखील रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)