पुरुषांनी उभं राहून लघवी करणं आरोग्यासाठी फायद्याचं की बसून करणं?

अनेकदा पुरूष उभ्यानंच लघवी करतात.

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याकडे पुरूष किंवा मुलं उभ्याउभ्या लघवी करतात, तर बायका बसून. बाई आणि पुरूषाच्या लघवी करण्याच्या पद्धतीतला हा फरक आपण गृहीतच धरलेला असतो.

पण आता बऱ्याच देशांमधील तज्ज्ञ पुरूषांकडून नैसर्गिक विधीसाठी सहजपणे केल्या जाणाऱ्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

पुरूषांनी लघवी कशी करावी, हा आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे, तर स्त्री-पुरूष समानतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिने हा समान हक्कांचा प्रश्न आहे.

या दोन्ही गटांपैकी कोणाला झुकतं माप द्यायला हवं? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुरूषांच्या आरोग्यासाठी योग्य काय आहे?

झटपट कार्यभाग उरकण्याचा प्रकार?

अनेक पुरूषांसाठीही उभ्यानं लघवी करणं तितकं सोपं नसतं.

कदाचित हे पटकन उरकणारं आणि व्यावहारिक आहे. म्हणजे पुरूषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाबाहेर तुम्हाला कधी लांबलचक रांग दिसते का? तर नाही. कारण पुरूष अगदी झटपट आपला कार्यभाग उरकून बाहेर पडतात.

पुरूष स्वच्छतागृह

फोटो स्रोत, Getty Images

पुरूषांच्या स्वच्छतागृहाबाहेर रांग न दिसण्याची दोन प्रमुख कारणं आहेत-

1. शू करण्यासाठी पुरुषांना कपडे चटकन काढता येतात आणि

2. बंदिस्त क्युबिकल्सपेक्षाही युरिनल्ससाठी कमी जागा लागते. त्यामुळे एका मोठ्या खोलीत अनेक युरिनल्स मावू शकतात.

पण अनेक आरोग्यविषयक वेबसाइट्सवर दिलेल्या माहितीनुसार लघवी करताना शरीराची जी स्थिती असते, त्यावर लघवीचं प्रमाण अवलंबून असतं.

लघवी करण्याची योग्य पद्धत

मुळात आपल्याला शू का आणि कशी होते, हे पाहू. आपल्या किडनीमध्ये लघवी तयार होते. किडनी आपल्या शरीरातील नको असलेल्या द्रव्यांच्या उत्सर्जनाचं काम करते.

लघवी नंतर ब्लॅडरमध्ये साठवली जाते. त्यामुळे आपण आपली रोजची कामं बिनघोरपणे करू शकतो, रात्री निवांत झोपू शकतो. कारण लघवी ब्लॅडरमध्ये साठवली जात असल्यामुळे सतत टॉयलटेमध्ये जावं लागत नाही.

सर्वसाधारणपणे 300 ते 600 मिलिलीटर लघवी साठविण्याची ब्लॅडरची क्षमता असते. मात्र ब्लॅडर दोन तृतीयांश भरल्यानंतर सहसा आपल्याला शू लागते.

ब्लॅडर

फोटो स्रोत, Getty Images

ब्लॅडर पूर्णपणे रिकामी करण्यासाठी आपली नर्व्हस कंट्रोल सिस्टिम पूर्णपणे निरोगी असायला लागते. त्यामुळे आपल्याला बाथरूमला जायची गरज आहे, का याचे संकेत मिळतात. तसंच आपण काही काळासाठी लघवी रोखूनही धरू शकतो.

जेव्हा आपण योग्य शारीरिक स्थितीत असतो, तेव्हा आपले पेल्व्हिक फ्लोअर मसल्स आणि ब्लॅडर स्फिन्क्टर रिलॅक्स होतात. यावेळी ब्लॅडरचं आकुंचन होतं आणि ब्लॅडरमधून लघवी युरेथ्रामध्ये येते आणि मग शरीराबाहेर.

बसून लघवी करायची की उभं राहून?

निरोगी व्यक्तिला लघवी करण्यासाठी जोर लावावा लागत नाही.

पण कधीकधी पुरूषांना मूत्रविसर्जनामध्ये तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अडचणी येतात. प्लोस वन या वैज्ञानिक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार बसून लघवी करत असताना मूत्रविसर्जनाच्या मार्गात अडथळे येत नाहीत.

बसून शू करणे योग्य की उभं राहून?

फोटो स्रोत, Getty Images

या अभ्यासामध्ये निरोगी पुरूष आणि प्रोस्टेट सिंड्रोम किंवा लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स (LUTS) असलेल्या पुरूषांची तुलना करण्यात आली होती.

LUTS चा त्रास असलेल्या पुरूषांमध्ये बसून लघवी करताना युरेथ्रल भागावर दाब येत नाही आणि मूत्रविसर्जनाची प्रक्रिया कमी त्रासदायक होते.

पण निरोगी व्यक्तींमध्ये बसून आणि उभं राहून लघवी करताना फार फरक आढळून आला नाही.

तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?

ज्या पुरूषांना मूत्रविसर्जनाची समस्या आहे, त्यांनी स्वच्छ जागी बसून लघवी करावी, अशी सूचना युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने केली आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृह

फोटो स्रोत, Getty Images

बसून लघवी केल्यामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होत नाही किंवा पुरूषांचं लैंगिक आयुष्य सुधारतं अशा गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील. पण या गोष्टींची सत्यता सिद्ध करणारे कोणतेही पुरावे किंवा अभ्यास नाहीये.

सगळेजण जर एकच शौचालय वापरत असतील तर...

या सगळ्या चर्चेला 2012 साली स्वीडनमधून सुरूवात झाली. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची परिस्थिती पाहून एका स्थानिक नेत्यानं आपल्या पुरूष सहकाऱ्यांनी मूत्रविसर्जनाच्या पर्यायांचा विचार करावा, यासाठी प्रयत्न सुरू केले.

नैसर्गिक विधी करताना स्वच्छतेचा विचार व्हावा आणि स्वच्छतागृहात जाताना लोकांवर बिचकत, नाकाला रुमाल लावत आत जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

सार्वजनिक स्वच्छतागृह

फोटो स्रोत, Getty Images

या विषयावरून पुढे इतरही युरोपियन देशांमध्ये विशेषतः जर्मनीमध्ये चर्चा सुरू झाली. जर्मनीमध्ये आता अशी काही सार्वजनिक शौचालयं आहेत, जिथं पुरूषांनी उभं राहून लघवी करायला सक्त मनाई आहे.

काही शौचालयांमध्ये सिग्नलच्या धर्तीवर लाल चिन्हं आहेत, ज्याचा अर्थ उभ्यानं लघवी करण्यास मनाई असा आहे. पण जे पुरूष बसून शू करतात त्यांना "Sitzpinkler" असं संबोधलं जातं. या शब्दाचा अर्थ म्हणजे पुरूषी वर्तनात न बसणारे असा होतो.

सार्वजनिक स्वच्छतागृह

फोटो स्रोत, Getty Images

ही मोहीम केवळ सार्वजनिक स्वच्छतागृहांपुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक घरांमध्येसुद्धा पुरूष पाहुण्यांना बसून लघवी करण्याची सूचना केली जाऊ लागली.

2015 मध्ये जर्मनीमधला एक खटला प्रचंड गाजला होता. घरमालकाने आपल्या भाडेकरूकडून बाथरुममधली संगमरवरी फरशी खराब केल्याबद्दल नुकसानभरपाई मागितली होती. लघवीमुळेच फरशी खराब झाल्याचा घरमालकाचा दावा होता.

पण न्यायाधीशांनी घरमालकाची मागणी फेटाळून लावली. "उभं राहून लघवी करणं हा स्त्री-पुरूषांसाठीच्या सामाजिक संकेतांचाच भाग आहे. ही एक सर्वमान्य पद्धत आहे," असं न्यायाधीशांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)