You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Thailand Shooting: गोळ्या झाडण्यापूर्वी तो म्हणाला होता, आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे...
थायलंडमधील नाखोन रतचासिमा शहरात एका सैनिकाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात अनेकजण जखमीही झाले आहेत.
थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाने बीबीसी थाई सर्व्हिसला दिलेल्या माहितीनुसार, जाकरापांथ थोम्मा या कनिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्याने वरिष्ठांकडून बंदूक आणि गोळ्यांचा साठा हिसकावून घेतला.
बंदूक आणि गोळ्यांचा साठा घेऊन या सैनिकाने बौद्ध मंदिरात घुसून गोळीबार केला. यानंतर या सैनिकाने शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन गोळीबार केला.
हा सैनिक अद्यापही फरार आहे.
स्थानिक वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या व्हीडिओंनुसार, संशयित हल्लेखोर मुआंग जिल्ह्यात टर्मिनल 21 शॉपिंग सेंटरसमोर कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. तिथल्या लोकांवर हा इसम अंदाधुंद गोळीबार करताना लोक सैरावैरा पळत असल्याचं दिसतं आहे.
पोलीस प्रशासनाने शॉपिंग सेंटरला वेढा देऊन संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. गोळीबार करणारा संशयित सैनिक शॉपिंग सेंटरच्या आत असल्याचं समजतं. पोलिसांनी या परिसरातील नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
गोळीबार करण्यामागचा हल्लेखोराचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
हल्लेखोराने गोळीबार करताना फेसबुकवर पोस्ट केली होती. मी प्रत्यार्पण करावं का? असं हल्लेखोराने विचारलं होतं. याआधी हल्लेखोराने पिस्तूल आणि गोळ्यांचा साठा दाखवणारा फोटो शेअर केला होता. आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे असं या संशयित हल्लेखोराने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)