You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिगारेट ओढल्याने होणारं नुकसान फुप्फुसं भरून काढू शकतात?
धूम्रपान हे फुप्फुसांच्या आरोग्यासाठी घातक असतं, हे आपल्याला माहिती आहे. पण फुप्फुसांमध्ये धूम्रपानामुळे होणारं नुकसान भरून काढण्याची नैसर्गिक क्षमताही असते.
अगदी कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. मात्र, त्यासाठी धूम्रपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
धूम्रपान पूर्णपणे बंद केल्याने फुप्फुसांचं झालेलं नुकसान भरून काढण्याची 'जादू' आपल्या फुप्फुसांकडेच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. यापूर्वी असंही मानलं जायचं, की धुम्रपानामुळे फुप्फुसांच्या पेशींचं कायमस्वरूपी नुकसान होतं.
मात्र, 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकात नवीन संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या नवीन संशोधनात काही आश्चर्यकारक निष्कर्ष आढळून आले आहेत. स्मोकिंगच्या दुष्परिणामांपासून बचावलेल्या पेशी फुप्फुसांना रिपेअर करू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
सलग चाळीस वर्षं दिवसभरात सिगारेटचं एक संपूर्ण पाकीट संपवणाऱ्या आणि नंतर धूम्रपान सोडणाऱ्या रुग्णांमध्येही हा बदल दिसून आला आहे.
तंबाखूच्या धुरात असलेल्या हजारो विषारी रसायनांमुळे (केमिकल्स) फुप्फुसांमधील पेशींच्या डीएनएला बाधा पोहोचते आणि त्यांच्यात बदल घडून येतात. याला 'म्युटेशन' म्हणतात. या 'म्युटेशन'मुळे सुदृढ पेशींचं हळूहळू कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या पेशींमध्ये रुपांतर होतं.
ज्या स्मोकर्सना कॅन्सर नाही, अशांच्या फुप्फुसांच्या पेशींमध्येसुद्धा असे बदल हळूहळू सुरू झाल्याचं या अभ्यासात आढळलं आहे.
या अभ्यासासाठी चेन स्मोकर्सच्या श्वसनमार्गातून पेशींचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं तेव्हा तंबाखूमुळे त्यांच्यात बदल झाल्याचं आढळलं. या पेशींमध्ये 10 हजार जेनेटिक बदल दिसून आले.
UCL मधल्या संशोधकांपैकी एक असलेल्या डॉ. केट गोवर्स म्हणतात, "याची तुलना आपण कुठल्याही क्षणी फुटण्याची वाट बघत असलेल्या मिनी टाईम बॉम्बशी करू शकतो. हे टाईम बॉम्ब फुटले की कॅन्सर होतो."
मात्र, काही पेशी अशा होत्या ज्यांच्यावर धूम्रपानाचा परिणाम झालेला नव्हता. अशा पेशींचं प्रमाण अत्यल्प होतं.
धूम्रपानाच्या परिणामांपासून या पेशी कशा बचावल्या, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, 'न्युक्लिअर बंकर म्हणजेच अणुबॉम्बने भरलेल्या बंकरमध्ये या पेशी शाबूत होत्या.'
आणि याच त्या पेशी आहेत ज्या स्मोकिंग सोडल्यानंतर फुप्फुसात वाढतात आणि डॅमेज झालेल्या पेशींची जागा घेतात.
ज्या लोकांनी धूम्रपान सोडलं होतं त्यांच्या फुप्फुसातल्या 40% पेशी या कधीही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या पेशींसारख्याच होत्या.
सँगेर इन्स्टिट्युटचे डॉ. पीटर कॅम्पबेल यांनी बीबीसीला सांगितलं, "असे काही निष्कर्ष निघतील, याची आम्हालाही कल्पना नव्हती."
ते पुढे सांगतात, "फुप्फुसांमध्ये अशा काही पेशी असतात ज्या एखाद्या चमत्काराप्रमाणे श्वसननलिकेतील खराब झालेलं आवरण भरून काढतात."
"तब्बल 40 वर्षं धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्येही अशा पेशी असतात ज्यांच्यावर तंबाखूचा परिणाम झालेला नसतो आणि धूम्रपान सोडल्यानंतर त्या वाढतात, ही एक अत्यंत उल्लेखनीय अशी बाब आहे."
धूम्रपान सोडण्याची प्रेरणा
फुप्फुसं किती प्रमाणात रिपेअर होऊ शकतात, यावर सध्या अभ्यास सुरू आहे.
युकेमध्ये दरवर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाचे 47 हजार रुग्ण आढळतात. यापैकी तीन चतुर्थांश व्यक्तींना धूम्रपानामुळे कॅन्सर झालेला असतो.
धूम्रपान सोडल्यापासूनच फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी-कमी होत असल्याचं यापूर्वीच्या अभ्यासांमधूनही सिद्ध झालेलं आहे.
धूम्रपान थांबवल्यानंतर लगेचच पेशींचं म्युटेशन थांबतं आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होत असावा, असा संशोधकांचा अंदाज होता.
युकेतील कॅन्सर संशोधन केंद्रातले डॉ. रॅचेल ऑरिट म्हणतात, "धूम्रपान सोडण्याचे दोन फायदे होऊ शकतात. एक म्हणजे पेशींचं म्युटेशन थांबतं आणि दुसरं म्हणजे ज्या पेशी शाबूत राहिल्या त्या झालेलं नुकसान काही प्रमाणात तरी भरून काढू शकतात. हे खूप प्रेरणादायी आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)