WhatsApp: कोट्यवधी फोन्समधलं व्हॉट्सअॅप होणार बंद, तुमच्याही फोनमधलं?

फोटो स्रोत, Getty Images
1 फेब्रुवारीपासून जगभरातल्या कोट्यवधी फोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणं बंद होणार आहे. यात तुमचाही फोन आहे का?
मेसेजिंगसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेलं व्हॉट्सअॅप हे अॅप 1 फेब्रुवारीपासून जगभरातल्या कोट्यवधी मोबाईल फोनवर चालणार नाही. आउटडेटेड म्हणजेच जुनी ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या अँड्रॉईड आणि आयफोन्सवर फेसबुकद्वारे संचलित हे अॅप बंद होणार आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलणं गरजेचं होतं, असं व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे.
अँड्रॉईड 2.3.7 किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या मोबाईलवर आणि iOS8 किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या आयफोनवर ही सेवा बंद होणार आहे.
ग्राहकांनी आपल्या मोबाईल फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट केल्यास ही सेवा सुरू राहू शकेल. मात्र iOS 7 पर्यंतचेच अपडेट सपोर्ट करणाऱ्या iPhone 4S सारख्या काही मोबाईलवर मात्र व्हॉट्सअॅप पूर्णपणे बंद होणार आहे.
अशा ग्राहकांना नवीन ऑपरेटिंग सिस्टिम स्मार्टफोन घेण्याशिवाय पर्याय नाही.
कंपन्यांना जगभरातील मोबाईल आणि वायरलेस क्षेत्रासंबंधी माहिती आणि विश्लेषण पुरवणाऱ्या 'CCS इनसाईट'चे अॅनालिस्ट बेन वुड सांगतात, "आपली सेवा सुरक्षित राहावी, यासाठी हे करण्याशिवाय व्हॉट्सअॅपकडे दुसरा पर्याय नव्हता. याचा साईड इफेक्ट हा आहे, की जुनी ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या मोबाईलशी हे अॅप कम्पॅटिबल असणार नाही."
ते पुढे सांगतात, "दीर्घकाळापासून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जुन्या मोबाईल डिव्हाईसचं प्रमाण अधिक असणाऱ्या मार्केटमध्ये."
व्हॉट्सअॅप हे गेल्या दशकातलं सर्वाधिक डाउनलोड केलं गेलेलं अॅप्लिकेशन आहे. व्हॉट्सअॅपने 2017 सालीच आपण असे बदल करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, "आमच्यासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. मात्र, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपले मित्र, कुटुंबीय आणि प्रियजनांच्या संपर्कात राहण्याचे उत्तम मार्ग देण्यासाठी हा योग्य निर्णय आहे."
व्हॉट्सअॅपने 2016 साली देखील ग्राहकांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेसाठी अनेक मोबाईल डिव्हाईसेसवर आपली सेवा देणं बंद केलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या मोबाईल डिव्हाईसेसवरूनही आपली सेवा बंद केली होती. त्याच श्रृंखलेतलं हे आणखी एक पाऊल आहे.

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









