You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Corona Virus: चीनमध्ये नवीन वर्ष साजरं करायला गेलेल्या कुटुंबावर ताटातुटीची वेळ
कोरोना व्हायरसने चीनमध्ये आतापर्यंत 300हून अधिक जणांचा बळी घेतलाय तर सहा हजारांहून जास्त जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे अनेक कुटुंबांचीही ताटातूट होत आहे. यापैकीच एक असलेल्या सिडल दाम्पत्यावरही एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ आली आहे.
जेफ सिडल यांना आपल्या चिमुकल्या मुलीसाठी पत्नीला चीनमध्ये एकटं सोडून जावं लागत आहे.
जेफ सिडल ब्रिटिश नागरिक आहेत तर त्यांच्या पत्नी सिन्डी या चिनी आहेत. त्यांना 9 वर्षांची एक मुलगी आहे - जास्मिन. सिन्डी या पती जेफ आणि मुलगी जास्मीनसोबत चिनी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मायदेशी आल्या होत्या.
मात्र नेमकं याच काळात चीनमध्ये कोरोनाच्या साथीने डोकं वर काढलं आणि नवीन वर्षाच्या उत्साहावर पाणी फिरलं.
हुबेई प्रांतातल्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस पसरल्याचा अंदाज आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 3,500 रुग्ण या हुबेई प्रांतात आढळले आहेत.
शिक्षण आणि नोकरीसाठी हुबेईला पसंती
हुबेई प्रांतात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक राहतात. शिक्षण आणि नोकरीसाठी जगभरातले लोक हुबेईला पसंती देतात. सिन्डी यांचं माहेरही याच हुबेई प्रांतातलं.
वुहान आणि हुबेईमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत बोलवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि जपानने तर विशेष विमान पाठवून हजारो नागरिकांना माघारी आणलं आहे.
भारत सरकारनेही एअर इंडियाच्या एका विशेष विमानाने वुहानमध्ये अडकलेल्या 323 भारतीयांना भारतात परत आणलं. याशिवाय मालदिव्ह्सचे 7 नागरिकही भारताने तिथून बाहेर काढले.
सिडल जोडपंही 1 फेब्रुवारीला ब्रिटनला परत जाणार होतं. मात्र विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनानं विमानतळ, सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद केली आणि त्यामुळे त्यांचं फ्लाईट रद्द करण्यात आलं.
या जोडप्याने ब्रिटिश वकिलातीकडे धाव घेतली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, की जेफ आपल्या मुलीसोबत ब्रिटनला परतू शकतात. मात्र सिन्डीकडे 2008 सालापासून ब्रिटनचा कायमस्वरूपी व्हिसा असला तरी ब्रिटिश नागरिकांना हुबेईमधून बाहेर काढण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या विशेष विमानात त्यांना जाता येणार नाही.
बीबीसीशी बोलताना जेफ म्हणाले, "परराष्ट्र कार्यालयाने मला सांगितलं, की चीनच्या प्रशासनाने त्यांच्या नागरिकांना देश न सोडून जाण्याचे निर्देश दिल्याने ब्रिटनचं विशेष विमान केवळ ब्रिटिश नागरिकांनाच घेऊन जाऊ शकतं.
"त्यामुळे मी आणि ब्रिटिश पासपोर्ट असणारी माझी 9 वर्षांची मुलगी जास्मीननं परत जायचं की आम्ही तिघांनीही इथंच राहायचं, याचा निर्णय मला घ्यायचा होता."
चीनमध्ये दुहेरी नागरिकत्व स्वीकार्ह नाही.
'अश्रूंचा महापूर'
सिडल दाम्पत्याने मुलीला घरी परत पाठवण्याचा निर्णय घेतला. अर्थातच हा निर्णय दोघांसाठीही सोपा नव्हता.
जेफ म्हणाले, "हा निर्णय खूप त्रासदायक होता. 9 वर्षाच्या मुलीची तिच्या आईपासून ताटातूट होणार होती आणि त्या दोघी पुन्हा कधी भेटणार, कुणास ठाऊक?"
"माझी मुलगी सतत रडतेय... स्वाभाविक आहे."
मात्र, सिडल यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत.
घरापासून वुहान विमानतळापर्यंत येण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल, असं ब्रिटिश वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं सिडल यांनी म्हटलं.
ते सांगतात, "विमानतळापर्यंत जाण्यासाठी तीन तास लागतात. मात्र रस्ते बंद आहेत. गाडी काढली आणि निघालो, अशी परिस्थिती नाही."
ते पुढे सांगतात, "आम्ही चिनी प्रशासनाला फोन करून सांगितलं, की कारने विमानतळापर्यंत जाण्यासाठी आम्हाला स्पेशल डिप्लोमॅटिक नोट हवी आहे."
"मात्र आपण अशी नोट देऊ शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं."
बीबीसीने परराष्ट्र कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं, की सिडल प्रकरणाची माहिती चिनी प्रशासनाला देण्यात आली आहे.
चिनी प्रशासन काय निर्णय देतं, यावर जेफ आणि जस्मीन यांचं भविष्य अवलंबून आहे. तोवर मात्र, चिनी सदस्य असणाऱ्या परदेशी कुटुंबांना जेफप्रमाणेच कटू निर्णय घ्यावा लागणार, एवढं नक्की.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)