Sania Mirza: होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद

गोंडस चिमुरड्याच्या मातृत्वाची जबाबदारी पेलत सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदावर नाव कोरलं.

आई बनल्यानंतर सानियाचं हे पहिलंच जेतेपद आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सानियाने कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला होता.

होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत सानिया आणि नाडिआ किचोनेक जोडीने अंतिम लढतीत शुआई पेंग आणि शुआई झांग जोडीवर 6-4, 6-4 असा विजय मिळवत जेतेपदाची कमाई केली. सानिया-नाडिआ जोडीला या स्पर्धेसाठी मानांकनही देण्यात आलं नव्हतं.

इझानच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरलेल्या 33 वर्षीय सानियाने एक तास 21 मिनिटात विजय मिळवला. सानियावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. #mummahustles म्हणजेच मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअरमध्ये दमदार वाटचाल करणाऱ्या स्त्रिया.

कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचं ठरवल्याने सानिया 2018 आणि 2019 वर्षांमध्ये एकाही स्पर्धेत सहभाग झाली नाही. दोन वर्षांनंतर जेतेपदासह सानियाने दिमाखात पुनरागमन केलं. सानियाच्या करिअरमधलं हे 42वं जेतेपद आहे.

सानियाने 14 जानेवारीला ट्वीटरवर आपल्या मुलासह फोटो पोस्ट केला होता.

''आज माझ्या जीवनातला सगळ्यांत गोड आणि खास क्षण आहे. प्रदीर्घ काळानंतर मी कोर्टवर उतरले आहे आणि माझ्या गोंडुल्याने मला खेळताना पाहिलं. माझे आईबाबाही याक्षणी उपस्थित होते. मी पहिली फेरी पार केली आहे. माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार", असं सानियाने म्हटलं होतं.

सानियाप्रमाणेच सेरेना विल्यम्सनेही आई झाल्यानंतर जेतेपदावर नाव कोरलं होतं. अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमनेही मातृत्वाच्या जबाबदारीनंतर शानदार पुनरागमन केलं होतं. नव्वदीच्या दशकात पी.टी.उषा यांनीही अशा प्रकारे जबरदस्त कामगिरी केली होती. अनेक महिला खेळाडू मातृत्वाच्या जबाबदारीनंतर खेळणं कमी करतात किंवा निवृत्तीच पत्करतात. मात्र सानिया तसंच सेरेनाने अनोखा मापदंड प्रस्थापित केला आहे.

गेल्या वर्षी 32 वर्षीय शेली एन प्रिसीने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पदकाचा आनंद तिने मुलाबरोबर साजरा केला होता. मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही करिअर सुरू ठेवता येतं हा संदेश मला द्यायचा होता असं शेलीने सांगितलं.

हे सांगितलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)