महाराणी एलिझाबेथ यांची मेगन आणि हॅरी यांच्या निर्णयाला मान्यता

हॅरी आणि मेगन यांनी वरिष्ठ रॉयलपद सोडण्याच्या निर्णयाला महाराणी एलिझाबेथ यांनी मान्यता दिली आहे.

हॅरी आणि मेगन यांच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. मात्र त्यांनी पूर्णवेळ रॉयलपद भूषवायला हवं होतं असंही त्या म्हणाल्या. याविषयी अंतिम निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल असं त्या म्हणाल्या.

राजघराण्यातील काही वरिष्ठ रॉयल हॅरी आणि मेगन यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराणी एलिझाबेथ यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

"हॅरी आणि मेगन यांच्या नवीन आयुष्य सुरू करण्याच्या निर्णयाला माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा आहे. त्यांनी पूर्णवेळ राजघराण्यात राहावं अशी आमची इच्छा होती. मात्र एक स्वतंत्र संसार सुरू करण्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. ते कायमच राजघराण्याचा अविभाज्य घटक असतील" असं त्या म्हणाल्या.

महाराणी एलिझाबेथ यांच्या नॉरफॉल्कमधल्या महालामध्ये झालेल्या बैठकीला 'सांड्रिंगम समिट' म्हटलं जातं. या बैठकीनंतरच महाराणी एलिझाबेथ यांनी हे निवेदन जारी केलं होतं. हॅरी - मेगनने सोमवारी केलेल्या घोषणेनंतर पहिल्यांदाच महाराणी ही घोषणा करणाऱ्या प्रिन्स हॅरीसोबत प्रत्यक्ष चर्चा केली.

ओमानचे सुलतान कबूस बिन सैद अल् सैद यांच्या निधनाच्या शोकसभेला हजर राहून प्रिन्स चार्ल्स परतलेले आहेत.

तर प्रिन्स हॅरी त्यांच्या विंडसरमधल्या फ्रॉगमोर कॉटेजमधून सांड्रिंगमला जाणार असल्याचं समजतंय.

बुधवारी हॅरी आणि मेगन यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक निवेदन प्रसिद्ध केलं. आपण 'वरिष्ठ रॉयल' पदाचा त्याग करत असून यापुढे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलं होतं.

याशिवाय यापुढे यूके आणि उत्तर अमेरिकेत आपण वेळ घालवणार असून 'महाराणी, कॉमनवेल्थ आणि आपल्या संस्थासाठीचं' आपलं काम आपण करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

या जोडप्याच्या भविष्यासाठीच्या योजना लक्षात घेत महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्ल्स, विल्यम आणि हॅरी याविषयीच्या उपलब्ध पर्यायांचा विचार करतील.

जरी येत्या काही दिवसांत यावरचा तोडगा निघाला तरी त्याची अंमलबजावणी व्हायला काही दिवसांचा अवधी लागण्याचा अंदाज आहे.

जर या चर्चांमधून अपेक्षित तोडगा मिळाला नाही तर हे जोडपं वाहिन्यांना मुलाखत देईल, ज्याचे एकूणच राजघराण्यावर मोठे परिणाम होतील, असं वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

टॉम ब्रॅडबी यांनी गेल्यावर्षी या जोडप्यावर डॉक्युमेंटरी केली होती. ते हॅरी आणि मेगनचे मित्रही आहे. संडे टाईम्समध्ये टॉम यांनी लिहीलं होतं, "मला वाटतं एक तपशीलवार, कोणतीही गुपितं न ठेवणारी मुलाखत होईल, आणि ते चांगलं ठरणार नाही."

मेगन आणि या जोडप्याचा आठ महिन्यांचा मुलगा आर्ची हे सध्या कॅनडामध्ये आहेत.

मेगन आणि प्रिन्स हॅरी यांनी ख्रिसमसही कॅनडात साजरा केला होता. सहा आठवडे त्यांनी राजघराण्याच्या कामांमधून विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर ते गेल्या आठवड्यात यूकेमध्ये परतले.

सतत मीडियाच्या नजरेखाली राहण्यामुळे आयुष्यात येणारा ताण हॅरी आणि मेगन यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात बोलून दाखवला होता.

गेल्या जूनमध्ये ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिजच्या फाऊंडेशनपासून वेगळे झाल्यानंतर सध्या हे दोघे ससेक्स रॉयल चॅरिटी लाँच करण्याच्या तयार आहेत.

तर ससेक्स रॉयल ब्रँडचा ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी डिसेंबरमध्ये या जोडप्याने अर्ज केला होता. या ब्रँडखाली पुस्तकं, कॅलेंडर्स, कपडे, चॅरिटी फंड, शैक्षणिक आणि सामाजिक सेवा सुरू करण्यात येतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)