You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अबब! प्रत्यक्षाहून प्रतिमा महाग!
अत्यंत दिमाखात शूट केलेला (आणि भरपूर खर्च केलेला) 'द क्राउन' या मालिकेचा दुसरा सिझन नेटफ्लिक्सने नुकताच रिलीज केला. ही मालिका महाराणी एलिझाबेथ यांची कथा सांगते.
एका अंदाजानुसार या वेब-सिरीजच्या पहिला सिझनसाठी 130 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 8 अब्ज 32 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला. या सिरीजचे निर्माते पीटर मॉर्गन यांच्या मते, हा आकडा दोन्ही सिझन्ससाठी झालेल्या खर्चाच्या जवळपास जाणारा आहे.
काहीही असलं तरी हा खर्च अवाढव्य आहे. तासाभराच्या प्रत्येक एपिसोडसाठी 41 कोटी ते 83 कोटी रुपये एवढा खर्च येतो, असा अंदाज आहे.
महाराणी एलिझाबेथ यांच्या स्वतःच्या प्रत्यक्षातल्या खर्चापेक्षा ही सिरीज शूट करण्यात जास्त खर्च झाला असू शकेल का?
अशा काही गोष्टींवर नजर टाकूया ज्या पडद्यावर सादर करताना प्रत्यक्षापेक्षा जास्त खर्च झाला.
महाराणी एलिझाबेथ आणि द क्राउन
ब्रिटीश संसदेने राज्यकर्त्याला देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर राणींचा तनखा वाढला आहे.
2018-19 या वर्षात महाराणींना 82.2 दशलक्ष पौंड म्हणजेच 7 अब्ज रुपये मिळतील. म्हणजे प्रत्येक ब्रिटीश नागरिकामागे सुमारे 107 रुपये असा हा हिशोब आहे.
शाही भेटी, समारंभ आणि सुरक्षेवरचा खर्च या रकमेत अंतर्भूत नसल्याने ब्रिटीश राजघराण्यावर प्रत्येक वर्षी 300 दशलक्ष पौंड, म्हणजे 25 अब्जांपेक्षा अधिक खर्च होतो, असं टेलिग्राफ वृत्तपत्राचं म्हणणं आहे.
याचा विचार करता, महाराणी एलिझाबेथ आणि त्यांच्या परिवाराचा खर्च त्यांच्यावर बनवलेल्या टीव्ही सिरीजपेक्षा जास्तच आहे, असं म्हणावं लागेल.
निष्कर्ष: द क्राउन या सिरीजचे सहा सिझन्स येणं अपेक्षित आहे. जर प्रत्येक सिझनसाठी येणाऱ्या खर्चाचा आकडा कायम राहिला, तर तो 49 अब्ज रुपये (सांगोवांगीच्या गोष्टींचा आकडा) आणि 25 अब्ज रुपये (निर्माते मॉर्गन यांच्या आकड्यानुसार) यादरम्यान असेल. राजघराण्याच्या वार्षिक खर्चात द क्राउनच्या किमान तीन आणि कमाल सहाच्या सहा सिझन्सचा खर्च निघू शकेल.
अमेरिकेचे एलियन हंटर्स आणि द एक्स फाईल्स
अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार पेंटागॉनने 2007-12 या काळात अवकाशात उडणाऱ्या अज्ञात वस्तूंच्या म्हणजे UFOच्या संशोधनावर 12 अब्ज रुपयांपेक्षा जास्त खर्च केला.
या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला नव्हता.
पण हेच काम जर फॉक्स मल्डर आणि डॅना स्कली यांना दिलं असतं तर ते कमी खर्चात झालं असतं, नाही का?
1990च्या दशकात आलेल्या 'एक्स फाईल्स' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये FBIचे एजंट पॅरानॉर्मल म्हणजे पारलौकिक गोष्टींचा वेध घेत असतात. IMDB या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, एक्स फाईल्सच्या पहिल्या सिझनमध्ये प्रत्येक एपिसोडमागे 9 कोटी 60 लाख रुपये इतका खर्च झाला होता.
चलनवाढीचा विचार करता 2007 साली पेंटागॉनचं संशोधन जेव्हा सुरू झालं तेव्हा हा खर्च प्रतिएपिसोड साडेतेरा कोटींच्या घरात होता.
निष्कर्ष: अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला एक्स फाईल्सच्या एजंटना साडेनऊ एपिसोडसाठी कामाला घेता आलं असतं. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी असंच झालं असतं नाही का? बघा ना, फॉक्स आणि डॅनाने परग्रहांवरील अनेक जीवांचा सामना केलाय, FBIला किती सापडले? एकही नाही.
RMS टायटॅनिक आणि टायटॅनिक सिनेमा
1997 साली, नॉर्थ अटलांटिक समुद्रात हेलकावे खाणारी ही प्रेमकथा आणि त्यातला सेलिन डिऑनचा आर्त स्वर यामुळे एखाद्याच्या डोळ्यात अश्रू न तरळते तरच नवल.
जॅक आणि रोजच्या भूमिकांमधून लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि केट विन्सलेट यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. १२ अब्ज रुपये खर्च झालेल्या या चित्रपटाला ११ ऑस्कर पुरस्कारही मिळाले.
मग हा भव्यदिव्य चित्रपट आणि त्या दुर्दैवी जहाजापैकी कशावर जास्त खर्च झाला?
1909 साली जेव्हा टायटॅनिक जहाजाची बांधणी सुरू झाली तेव्हापासून ते काम पूर्ण होईपर्यंत 48 कोटी रुपये खर्च झाले. 1997 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा खर्च ८ अब्ज रुपये इतका होता.
निष्कर्ष: एक छानछौकीचं विशालकाय जहाज बांधाण्यात जितका खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च त्या जहाजाची दुर्दैवी कथा सांगण्यावर झाला.
ER आणि अमेरिकेतली एखादी खरी इमर्जन्सी रूम
अमेरिकेत आरोग्य सुविधा हे प्रचंड खर्चिक प्रकरण आहे. मेडिकल ड्रामा ER बाबतही हेच म्हणावं लागेल. ERच्या बळावर जॉर्ज क्लुनीला स्टारडम मिळालं.
1998 साली अमेरिकन टीव्ही नेटवर्क NBCने ERचे निर्माते वॉर्नर ब्रदर्स यांना प्रत्येक एपिसोडमागे साधारण ८३ कोटी रुपये दिले.
एक खरी इमर्जन्सी रुम चालवण्यासाठीच्या खर्चाशी याची तुलना केली तर काय निष्कर्ष काढता येईल?
ER मधलं कुक काउंटी जनरल हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलवरून सुचलं, त्या इलिनॉयच्या कुक काउंटीमधल्या जॉन एच स्ट्राँगर ज्युनियर हॉस्पिटलने आम्हाला खर्चाचा लेखाजोखा दिला.
कर्मचारी आणि वस्तु पुरवठ्यावरचा खर्च धरून या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुमला वर्षाला 2.6 अब्ज रुपये इतका खर्च येतो.
निष्कर्ष: १९९८ सालचे 83 कोटी रुपये आताच्या गणितात १.२ अब्ज रुपये इतके होतात. त्या हिशोबाने एका एपिसोडच्या खर्चात एक खरीखुरी ER साडेपाच महिने चालवली जाऊ शकते.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)