इराण विमान दुर्घटनेच्या निषेधार्थ स्थानिक जनतेची निदर्शनं

युक्रेन एअरलाइन्सचं विमान इराणच्या लष्कराकडून पाडलं गेलं. या घटनेच्या निषेधार्थ इराणची जनता आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहे.

हे विमान आठ जानेवारीला तेहरान हून युक्रेनची राजधानी कीएफला जात होतं. तेहरानहून उड्डाण घेतल्यावर इराणच्या लष्कराने हे विमान चुकून पाडलं होतं. या विमानात असलेले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण 176 जण ठार झाले. त्यापैकी 86 नागरिक इराणी होते.

इराणने सुरुवातीला हे विमान पाडल्याचा इन्कार केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या मार्फत सत्य बाहेर आलं तेव्हा इराणला त्यांची चूक स्वीकारावी लागली.

इराणच्या लोकांनी लोक रस्त्यावर या घटनेविरोधात निदर्शनं केली. याशिवाय अन्य शहरांतही निदर्शनं होत आहेत. लष्कर आणि निदर्शकांमध्ये चकमक झाली. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या.

इराण आणि अमेरिकेत सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हे विमान पाडणं म्हणजे मानवी चूक असल्याचं इराणने कबूल केलं होतं.

इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

रविवारी निदर्शनं का झाली?

कडक सुरक्षाव्यवस्था असून देखील निदर्शक रस्त्यावर आले. त्यांना थोपवण्यासाठी दंगलविरोधी पथक, इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड आणि साध्या वेशात सुरक्षारक्षक उपस्थित होते.

निदर्शक इराण सरकारच्या भूमिकेचा विरोध करत असल्याचं एका व्हीडिओत स्पष्ट दिसतं. बेहिश्ती विद्यापीठाच्या मैदानावर इस्रायल आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज रंगवला होता. तिथे मात्र निदर्शक गेले नाहीत.

सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये आंदोलक इराण सरकारच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत. आमचा शत्रू अमेरिका नाही, तर आपल्या जवळचा देश आहे.

बहुतांश आंदोलक महिला होत्या. आजादी स्क्वेअरवर अनेक महिला घोषणा देत असल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. बीबीसी पर्शियन सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथेही अश्रुधुराचा वापर केला आहे.

इराणची राजधानी तेहरान च्या विविध भागात एक हजारपेक्षा अधिक लोक रस्त्यावर होतं असं इराणच्या अर्ध सरकारी वृत्तसंस्थेने सांगितली आहे. तेहरानशिवाय अनेक शहरांमध्ये ही निदर्शनं होत आहेत.

बीबीसी अरब अफेअर्स चे संपादक सॅबेस्टिअन अशर यांच्यामते ज्यांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा संरक्षण दलांशी होणाऱ्या चकमकीची त्यांना कल्पना असेलच, कारण भूतकाळात अनेकदा अशी आंदोलनं दडपली गेली.

शनिवारी सकाळी इराणमध्ये आंदोलक सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला त्यांनी विमान दुर्घटनेत ठार झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि लोकांचा राग उफाळून आला.

इराणच्या अनेक प्रसारमाध्यमांनी या निदर्शनांची दखल घेतली आहे. त्यात इराणच्या सैन्याबाबत रोष व्यक्त करण्यात आला. हा अक्षम्य गुन्हा असल्याची भूमिका प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.

सरकारचं पाठबळ असलेल्या वर्तमानपत्रांनी चूक स्वीकारणं हेच धाडसी पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. निदर्शकांची अशी दडपशाही करता येणार नाही असं ते म्हणाले. 

तसंच ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक रॉब म्हणाले की त्यांच्या देशाचे राजदूत रॉब मॅकायर यांना आंदोलनस्थळी गेल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. 

तर अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर म्हणाले की ट्रंप अजूनही इराणशी चर्चा करण्यासाठी तयार आहेत. 

इराणने काही पावलं उचलली तर देश अजूनही संकटातून बाहेर येऊ शकतो असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)