Qasem Soleimani: इराणमध्ये कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेमध्ये चेंगराचेंगरी, 50 जणांचा मृत्यू

इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. यात आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

इराकमध्ये अमेरिकेनं शुक्रवारी (3 जानेवारी) केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी केरमन शहरात मोठ्या संख्येनं लोक जमले होते.

सुलेमानी मूळचे केरमन शहरातीलच होते. त्यांचं पार्थिव इराकमधून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि सरतेशेवटी केरमन इथं आणण्यात आलंय. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी इराणमधील वेगवेगळ्या भागातून लोक केरमनमध्ये आले होते. अहवाज आणि तेहरानमध्येही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं लोक आले होते.

इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्यानंतरचं सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून सुलेमानी यांच्याकडे पाहिलं जायचं. अमेरिका मात्र आपल्या सैनिकांच्या हत्येला जबाबदार 'दहशतवादी' म्हणूनच त्यांच्याकडे पाहात होती.

कोण होते कासिम सुलेमानी?

इराणच्या कर्मन प्रांतात 11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. 80च्या दशकात इराण इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्स' या सेनेनी महत्त्वपूर्ण बजावली होती. 1980 मध्ये ते या सेनेत सामील झाले.

1980 ते 1988 या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या 41व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती.

इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. ऑपरेशन डॉन 8, कर्बाला 4 आणि कर्बाला-5 या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी मार्फत झाल्याचं बीबीसी मॉनिटरिंगने 'न्यूयॉर्कर'च्या हवाल्याने म्हटलं आहे.

मार्च 2019 मध्ये सुलेमानी यांना इराणने 'ऑर्डर ऑफ जोल्फाकार' हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. 1979 नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे शाह अयातुल्लाह खोमेनी हे सुलेमानी यांना 'लिव्हिंग मार्टिर' म्हणजे 'जिवंत हुतात्मा' असं म्हणत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)