लॅटेक्स अॅलर्जीः 'रिमोटची बटणं, फुगे यापैकी कशानेही माझा जीव जाऊ शकतो'

लिझ नाईट
फोटो कॅप्शन, लिझ नाईट
    • Author, क्रिस केवात्रे
    • Role, बीबीसी न्यूज

लहान मुलांचे वाढदिवस, लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानं अशा सार्वजनिक ठिकाणी फुगे अगदी हमखास दिसतात. मात्र, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लिझ नाईट फुग्याजवळ भटकतही नाहीत. कारण एक फुगाही त्यांचा जीव घेऊ शकतो. लिझ यांना लॅटेक्स अॅलर्जी आहे.

लहान असताना त्यांना धूळ, प्राण्यांचे केस, पक्षांचे पंख याची अॅलर्जी होती. त्या 12 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना माणसाच्या केसांचीही अॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचे लांब केसही कापावे लागले.

मात्र, हे सगळं इथेच थांबलं नाही. दिवसेंदिवस अॅलर्जी वाढतच गेली. या अॅलर्जीने आपलं बालपण हिरावल्याचं त्या सांगतात.

बालपणीची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, "मी चार वर्षांची असताना आम्ही आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे एक पक्षी होता. 60-70च्या दशकात हा पक्षी पाळण्याचं फॅड होतं. मात्र, मला कुठल्याही पक्षाच्या पंखाची अॅलर्जी होती."

लिझ नाईट

फोटो स्रोत, Liz Knight

फोटो कॅप्शन, लिझ यांचा लहानपणीचा फोटो. त्यांना त्यांचे मोठे केस कापावे लागले.

"मला आठवतं माझ्या वडिलांनी गाडी पार्क केली. ते माझ्या दोन्ही बहिणींसोबत घरात गेले. पण मला घरात जात आलं नाही. घरात तो पक्षी असल्याने मला कारमध्येच थांबावं लागलं. तेही एकटीने. त्यावेळी मला खूप एकटं पडल्यासारखं वाटलं. नॉर्मल माणसं जे करायचे ते मला करता येत नव्हतं."

डिव्हॉनमधील पैगंटॉन या समुद्राजवळच्या शहरात राहणाऱ्या लिझ यांना अगदी लहानपणापासून स्किन अॅलर्जी आहे. त्या विशीत असताना त्यांच्या गजकर्णाला संसर्ग होऊन तो रक्तात पसरला. त्यामुळे त्यांना अनेक आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. धूळ, केस यांची एलर्जी असणाऱ्या लिझ 1990 मध्ये एका प्रदर्शनात गेल्या होत्या. तिथे त्यांना लॅटेक्सची अॅलर्जी असल्याचं कळलं.

त्या सांगतात, "माझ्या मुलीने माझ्या हातात काही फुगे दिले. मला फुगे धरायला सांगून ती काहीतरी करायला निघून गेली. काही वेळ फुगे धरल्यानंतर मी तेच हात गालाला लावले आणि त्यानंतरच माझ्या गालावर सूज आली."

वारंवार डॉक्टरांकडे गेल्यामुळे आपली नाजूक त्वचा तिथल्या लॅटेक्सच्या संपर्कात आल्याने ही अॅलर्जी झाली असावी, असा लिझ यांचा अंदाज आहे.

या एलर्जीमुळे 56 वर्षांच्या लिझ यांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. शाईत असलेल्या लॅटेक्समुळे त्या वर्तमानपत्र वाचू शकत नाहीत. रिमोटची बटनं, चाकुची मूठ, ब्लेंडर, मिक्सर, हेअरड्रायर अशा सर्व वस्तूंवर असलेल्या लॅटेक्स कोटिंगमुळे त्यांना त्या वापरता येत नाहीत. त्यांच्या घरातल्या जवळपास सर्वच वस्तुंना त्यांनी प्लॅस्टिक कव्हर घातलं आहे.

लिझ नाईट

फोटो स्रोत, Liz Knight

फोटो कॅप्शन, रिमोट कंट्रोलवर लॅटेक्सचं कव्हर असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागते.

रस्त्याचं कामं सुरु असेल तर त्यांना घराच्या दारं, खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. यामुळे आपल्याला आपल्या घरातच कैदी झाल्यासारखं वाटतं, असं लिझ म्हणतात.

"मला अनेकदा बंदी असल्यासारखं वाटतं. घरातच सुरक्षित वाटत असल्याने कधीकधी मी आठवडाभर घरातून बाहेरही पडत नाही."

चार वर्षांपूर्वीच्या हिवाळ्यात त्या त्यांच्या पतीसोबत एका दुकानात गेल्या. अचानक त्यांचे ओठ सुजले आणि त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या.

त्या सांगतात, "मी ताबडतोब बाहेर पडले आणि म्हणाले तिथे काहीतरी आहे ज्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटतंय."

त्यांच्या पतीने आत जाऊन बघितल्यावर दुकानाच्या मागच्या बाजूला एका स्टँडला सहा फुगे बांधल्याचं त्यांना दिसलं. दुकानाच्या हिटिंग सिस्टिममधून फुग्यातलं लॅटेक्स प्रोटीन दुकानातल्या हवेत मिसळलं होतं. त्याचाच त्यांना त्रास होत होता. एखाद्या ठिकाणी दोन दिवस आधी फुगे बांधून ठेवले असतील आणि त्यातला एक फुगा जरी फुटला तरी त्याचं लॅटेक्स प्रोटीन दोन दिवस हवेत कायम असतं. त्याचीही त्यांना तीव्र रिअॅक्शन येऊ शकते.

कुठलीही रिअॅक्शन आली की त्यांना खूप घाम फुटतो. ओठ सुजतात आणि 'तीव्र वेदना' होतात. अशा ठिकाणाहून बाहेर पडलं की त्यांना थोडं बरं वाटतं. मात्र, पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना काही आठवडेही लागू शकतात.

लॅटेक्स अॅलर्जी म्हणजे काय?

  • लॅटेक्स हा झाडापासून मिळणारा पांढरा चिकट द्रव असतो. विशेषतः रबराच्या झाडात लॅटेक्स असतं.
  • रबराचा वापर करून बनवण्यात येणारे घरगुती किंवा वैद्यकीय वापराचे ग्लोव्ह्ज, जोडे, टायर, फुगे, काँडम अशा वस्तूंमध्ये लॅटेक्स आढळतं.
  • एखाद्या गोष्टीचा तुमची प्रतिकारशक्ती सामना करू शकत नाही तेव्हा त्याला अॅलर्जी म्हणतात. यामुळे सौम्य पुरळापासून ते अॅनाफिलॅक्सिस म्हणजेच अतिसंवेदनशील त्वचाविकार उद्भवू शकतात.
लिझ नाईट
फोटो कॅप्शन, फुगे
  • जवळपास 5% व्यक्तींना लॅटेक्स अॅलर्जी असते. मात्र, प्रत्येकामध्येच त्याची लक्षणं दिसतील, असं नाही, अशी माहिती इंग्लंडमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या NHS (National Health Service) या संस्थेने दिली आहे.
  • अनुवांशिकतेमुळे अॅलर्जी होऊ शकते. मात्र,अस्थमा आणि गजकर्ण यासारख्या आजारांमुळेदेखील अॅलर्जी होऊ शकते.
  • यातून बचावाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लॅटेक्सचा संपर्क टाळणे.
  • लॅटेक्सच्या सतत सानिध्यात येण्याने लॅटेक्स अॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो.
  • लॅटेक्सचा त्वचेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रायोगिक उपचार आहेत. मात्र, ते सर्वत्र उपलब्ध नाही.

स्रोत: NHS, British Association of Dermatologists, Globalaai

लिझ यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातच तीव्र रिअॅक्शन आली होती. ते प्रकरण त्यांच्या जीवावरच बेतणार होतं.

त्या सांगतात, "काही महिन्यांपूर्वी मी एक डिश बनवत होते. त्यासाठी 2% अननसाचा रस असणारा एक सॉस मी वापरला. ते खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटातच माझी जीभ सुजायला सुरुवात झाली. घशातही विचित्र वाटू लागलं. जीभेवरची सूच वाढतच होती."

अननसासारख्या उष्णकटिबंधीय फळांमध्ये लॅटेक्स प्रोटीनशी साम्य असणारं प्रोटीन असतं आणि त्यामुळे जवळपास तशीच रिअॅक्शनही येते. त्यांनी तात्काळ रिअॅक्शन कमी करणारं अॅड्रेनॅलिनचं इंजेक्शन घेतलं.

त्या सांगतात, "अॅम्ब्युलंसमध्ये माझं ब्लड प्रेशर मोजलं. ते 194च्या पुढे गेलं होतं."

पुढचे काही तास त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. पुन्हा रिअॅक्शन येत नाही ना, याची खात्री करण्यात आली. मात्र, काही तासांनंतर रिअॅक्शनची सगळी लक्षणं कमी झाली.

लिझ नाईट

फोटो स्रोत, Liz Knight

फोटो कॅप्शन, लिझ यांना असा त्रास होतो.

लिझ यांच्या अॅलर्जीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्या मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यामुळे खूप एकाकी पडल्यासारखं वाटतं. चार वर्षांपूर्वी त्यांना व्यायामाची शिकवणीही सोडावी लागली. कारण व्यायामासाठी लागणाऱ्या मॅटमध्ये, तिथे वापरण्यात येणाऱ्या एरोसोल स्प्रेमध्ये लॅटेक्स असतं.

लिझ फार्मसीमध्ये काम करायच्या. मात्र, तिथेही लॅटेक्सचा सततचा संपर्क येत असल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकत नाही, अशी खंत त्यांना वाटते.

असं असलं तरी लॅटेक्स अॅलर्जीमुळे आपल्या आयुष्यातला आनंद गमवायचा नाही, हे लिझ यांनी पक्क ठरवलं आहे. त्या म्हणतात, "मी चालू-फिरू शकते, मी गोष्टी बघू शकते, काम करू शकते आणि ज्या गोष्टी मला करता येतात, त्यासाठी मी कृतज्ञ असायला हवं."

त्यांना त्यांच्या घराजवळच विणकाम करणाऱ्या महिलांचा एक ग्रुप मिळाला आहे. या ग्रुपमध्ये सगळे त्यांची काळजी घेतात. Globalaai या एलर्जीविषयी जागरुकता निर्माण करणाऱ्या एनजीओच्या त्या अॅम्बेसडर आहेत.

डॉ. पूजा न्यूमन यांनी 2016 साली Globalaai या एनजीओची स्थापना केली. मेलबर्नमधल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांच्यावर एक फुगा पडला. त्याची एवढी तीव्र रिअॅक्शन आली आणि त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं होतं. याच घटनेने डॉ. पूजा यांना लॅटेक्स एलर्जीविषयी जागरुकता निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

उपचारादरम्यानच त्यांनी लॅटेक्स अॅलर्जीची माहिती देणारं फेसबुक पेज उघडलं आणि त्यातूनच पुढे Globalaai या एनजीओची स्थापना झाली.

डॉ. पूजा म्हणतात, "अशाप्रकारच्या एलर्जीमुळे व्यक्तीला होणाऱ्या तीव्र वेदना तसंच दैनंदिन आयुष्यात इतरांसोबत मिसळता न आल्याने आलेली एकटेपणाची भावना याची जाणीव लोकांना करून देणं, हा या एनजीओ सुरू करण्यामागचा एक उद्देश आहे."

या संघटनेमार्फेत सार्वजनिक स्थळी रिअॅक्शन कमी करण्यासाठी दिले जाणारे एपीपेन इन्जेक्शन्सची स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तसंच या संघटनेने अमेरिकेतील अनेक प्रांतात फूड इंडस्ट्रीत लॅटेक्स ग्लोव्जवर प्रतिबंध घालण्याचं समर्थन केलं आहे. ऑस्ट्रेलियात सार्वजनिक स्थळी फुग्यांच्या वापरावर बंदी घालण्याची संघटनेची मागणी आहे.

Globalaai संघटनेच्या माध्यमातून लिझ यांनी केलेल्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पैंगन्टॉन या त्यांच्या शहातली अनेक दुकानं आता लिझ यांच्या सल्ल्यानुसार लॅटेक्सचा वापर कसा टाळता येईल, यावर भर देत आहेत.

लॅटेक्स अॅलर्जीमुळे लिझ यांच्या दैनंदिन आयुष्यावर अनेक बंधनं आली असली तरी त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.

त्या म्हणतात, "आपल्या बाबतीतच असं का झालं, असा विचार मनात आल्यावर थोडं खचून जायला होतं. मात्र, प्रत्येकवेळी मला वाटतं की यापेक्षाही वाईट घडू शकलं असतं. मी जास्तीत जास्त लोकांना लॅटेक्स अॅलर्जीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते. जितक्या जास्त लोकांना याविषयी कळेल तेवढा जास्त बदल घडवता येईल."

त्या पुढे म्हणतात, "मी ठरवलं आहे, या अॅलर्जीसमोर पराभूत व्हायचं नाही. मी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेन. फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीदेखील."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)