2020: नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करू नका - सिडनीच्या नागरिकांची मागणी

फोटो स्रोत, Getty Images
नव्या वर्षाच्या स्वागतासाठीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी नाईट शोज आयोजित करण्यात आले आहेत, म्युझिक कॉन्सर्ट्स आहेत आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
मात्र एका ठिकाणी हा जल्लोष करण्याला जरा विरोध होतोय - ऑस्ट्रेलियातं मुख्य शहर सिडनी येथे.
जगभरात नववर्षाचं आगमन सर्वांत आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतं. दरवर्षी जल्लोषाचे पहिले फोटो दिसतात ते सिडनीतल्या त्या हार्बर ब्रिजवरचे, जिथे हजारो-लाखो फटाक्यांनी मध्यरात्रीचा आसमंत उजळून निघतो.
मात्र यंदा या आतषबाजीवर 'नाहक' खर्च करू नये, अशी स्वाक्षरी मोहीम उघडण्यात आली आहे. सिडनीतल्या जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या स्वाक्षऱ्या असणारी याचिकाही कोर्टात दाखल केलीय.
शिवाय, फटाक्यांवर खर्च होणारा पैसा सिडनीला धोका असणाऱ्या आगींच्या घटना रोखण्यासाठी वापरावा, अशीही मागणी या लोकांनी केलीय.
गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एकट्या सिडनी शहरात फटाक्यांवर जवळपास 28 कोटी रूपये (40 लाख डॉलर) खर्च झाल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे जंगली झुडुपांनी पेट घेतला आहे. यात गावच्या गावं नष्ट झाली आहेत. हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दिवसरात्र या आगी आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहेत.
त्यामुळे, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी ही आतषबाजी रद्द व्हावी, कारण "आधीच वातावरणात प्रचंड धूर आहे," त्यातच लोकांना या आतषबाजीचा "आणखी त्रास होईल," असं या याचिकेत म्हटलंय.

फोटो स्रोत, PA
मात्र, सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर यांनी आत्ता ही आतषबाजी रद्द करण्यास नकार दिला आहे.
फटाक्यांना विरोध करणाऱ्या "लोकांप्रति माझी सहानुभूती" असल्याचं म्हणत मूर म्हणाल्या की, मात्र फटाक्यांचं खरेदी आणि एकंदरच या कार्यक्रमाचं नियजोन 15 महिने आधीच झालं होतं आणि त्यासाठी पैशांची तरतूदही झाली होती.
"आम्ही फटाक्यांची आतषबाजी रद्द करू शकत नाही, आणि जरी आपण तसं केलं तरी त्यानं कुणाचंच पाहिजे तसं भलं होणार नाही," असा क्लोव्हर मूर यांनी याचिकाकर्त्यांच्या वेबसाईटवर लिहिलंय.
अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांनी Change.Org वरील याचिकेखाली प्रतिक्रिया दिल्यात. त्यात एकानं म्हटलंय की, फटाक्यांची आतषबाजी म्हणजे एकप्रकारचा अपमान असेल.
"ऑस्ट्रेलियात सध्या शाळांची पुनर्बांधणी, घरं उभारण्यासाठी पैसा हवाय. त्यामुळं आपल्याला प्राधान्य ठरवायलं हवं. ही आतषबाजी म्हणजे आपल्याला कशाची जास्त काळजी आहे, हे दाखवते," असं एका नागरिकानं म्हटलंय.
ऑस्ट्रेलियातला मोठा समूह फटाक्यांची आतषबाजी नाकारून इतर पद्धतींनी नवं वर्ष साजरं करणार असल्याचं लिंडा मॅक्कॉर्मिक म्हणाल्या. लिंडा यांनीच Change.Orgवर याचिकेचं पेज सुरू केलं.

फोटो स्रोत, DANIEL KNOX/ANDREW O'DWYER
गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया अत्यंत भयंकर आगीच्या घटनांना सामोरं गेलंय. कधी वाढत्या तापमानामुळं आगीच्या घटना घडल्या तर कधी भीषण दुष्काळामुळं.
सिडनी शहर ज्या राज्यात येतं, त्या न्यू साऊथ वेल्समध्ये तर सर्वांत जास्त म्हणजे जवळपास 100 आगीच्या घटना घडल्यात.
ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या बालमोरल शहराचं 22 डिसेंबर रोजी आगीमुळं नुकसान झालं होतं. या शहरातच्या दक्षिणेस सर्व मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








