You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका निवडणूक: गोताभया राजपक्षे वि. साजिथ प्रेमदासा - कोण होणार नवीन राष्ट्राध्यक्ष?
ईस्टर संडेच्या भीषण दहशतवादी हल्ल्यात साधारण 250 लोक मृत्युमुखी पडल्याच्या 7 महिन्यांनंतर श्रीलंकेत राष्ट्राध्यपदाच्या निवडणुका सुरू आहेत.
शनिवारी पार पडलेल्या मतदानात 80 टक्के पात्र मतदारांनी आपल हक्क बजावला असून, नवा राष्ट्राध्यक्ष कोण होईल, हे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
या निवडणुकीत एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत, मात्र थेट लढत गोताभया राजपक्षे आणि साजिथ प्रेमदासा यांच्यात होते आहे.
मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष ही निवडणूक लढवत नाही आहेत.
सात महिन्यांपूर्वी झालेल्या ईस्टर संडे साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
गुप्तचर यंत्रणेतील लहानशा चुकीमुळे हा हल्ला घडला, असं सरकारला नंतर मान्य करावं लागलं होतं.
याविषयी संरक्षण सचिवांनी म्हटलं की, "महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून नियोजित हल्ल्यांविषयीचा इशारा देण्यात आला होता. पण, अधिकाऱ्यांनी ती माहिती योग्यप्रकारे हाताळता आली नाही."
मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याआधी मुस्लीम मतदारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या ताफ्यावर काही सशस्त्र गटांनी गोळीबार केल्याची बातमी आली होती. पण, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
श्रीलंकेचा पुढचा अध्यक्ष कोण असेल?
राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या सर्व 35 उमेदवारांची नावं सामावून घेण्यासाठी दोन फूट लांबीची मतपत्रिका असली, तरी ही निवडणूक दोघांमध्येच होत आहे - गोताभया राजपक्षे आणि साजिथ प्रेमदासा यांच्यातच ही लढत होत आहे.
2005 ते 2011 या कालावधीत श्रीलंकेतील हजारो लोक विशेषत: तामिळ लोक बेपत्ता झाले होते, त्यावेळी गोताभया राजपक्षे सत्तेत होते.
पण, श्रीलंकेतील भीषण गृहयुद्ध संपविण्यात त्यांची भूमिका आणि त्यानंतर झालेले ईस्टर संडे हल्ले, यामुळे राजपक्षे यांना फायदा झाला.
ईस्टर संडे हल्ल्यांनंतर सुरक्षेबाबत त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ते देशातील बहुसंख्याक सिंहली बौद्धांवर प्रभाव टाकू शकले. यामुळे मग नागरिकत्व विषयक त्यांच्याविरुद्धच्या वादग्रस्त आरोपांकडे समर्थकांनी दुर्लक्ष केलं.
जनतेची सुरक्षा, हा राजपक्षे यांचा मुद्दा त्यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांनीही लक्षात घेतला. त्यामुळे त्यांनीही म्हटलं की आपण ही निवडणूक जिंकलो तर राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखपदी सारथ फॉन्सेका यांची नेमणूक केली जाईल, ज्यांनी तामिळ टायगर्सचा पराभव केला आहे.
असं असलं तरी, प्रेमदासा यांनी नियमितपणे सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित केलं आहे. गरिबी निर्मूलन आणि गृहनिर्माण सुधारणांवर भर दिला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच प्रेमदासा यांच्या पाठीशी निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे.
1993 मध्ये तामिळ टायगर्सच्या बंडखोरांनी त्यांचे वडील आणि श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांची हत्या केली होती. सध्या ते देशाचे गृहनिर्माण मंत्री आहेत आणि बलाढ्य अशा राजपक्षे घराण्याला त्यांच्या मायभूमीत तोंड देत आहेत.
सध्या काय सुरू आहे?
2015मध्ये राजपक्षे यांच्याविरोधात मैत्रीपाल सिरिसेना यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. पण, पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला, मात्र त्यासाठीचं कारण काही दिलं नाही.
त्यांची लोकप्रियताही दिवसेंदिवस कमी होत आहे. याला प्रमुख कारण म्हणजे एक तर त्यांनी स्वत:च्याच पंतप्रधानांना काढून टाकलं होतं, ज्यामुळे संवैधानिक संकट देशावर ओढवलं होतं. त्यातच त्यांच्यावर आरोप झाले की ईस्टर संडेच्या हल्ल्याची पूर्वसूचना त्यांना मिळूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
त्यातच, काही वादग्रस्त प्रसंगांमुळेही त्यांच्या प्रतिमेला फटका बसला आहे.
पण मतदारांचे काय प्रश्न आहेत?
राष्ट्रीय सुरक्षा हा या निवडणुकीतला सर्वांत मोठा मुद्दा आहेच. याशिवाय अल्पसंख्याकांचे समान हक्क आणि बेरोजगारी, हेदेखील प्रमुख प्रश्न मतदारांसमोर आहेत.
आंतरराष्ट्रीय संबंधांवर दोन्ही उमेदवारांनीही वेगवेगळे वचन दिलं आहेत. राजपक्षे यांनी म्हटलंय की ते निवडणूक जिंकले तर श्रीलंकेला मोठं कर्ज देणाऱ्या चीनशी "संबंध पुनर्प्रस्थापित करण्यात येतील". पण, चीनच्या श्रीलंकेवरील कर्जाच्या आकारामुळे हा विषय वादग्रस्त ठरू शकतो.
दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी प्रेमदासा हे भारत आणि अमेरिकेशी जास्त जवळ असल्याचं दिसतं.
मतमोजणी कशी होते?
निवडणुकीत एकच फेरी आहे, पण मतदार त्यांच्या पसंतीचे 3 उमेदवार निवडू शकतात.
कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यांहून अधिक मतं न मिळाल्यास मतदारांच्या इतर दोन उमेदवारांच्या गोळाबेरजेनंतर दोनपैकी एक उमेदवार विजयी ठरवला जातो.
एखाद्या उमेदवारानं 50%पेक्षा जास्त मतं मिळवल्यास रविवारी निकाल येणं अपेक्षित आहे. पण, दुसर्या पसंतीची मोजण्याची गरज असल्यास सोमवारी निकाल लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)