तब्बल 75 वर्षांनी सापडली दुसऱ्या महायुद्धातली अमेरिकन पाणबुडी

दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेपत्ता झालेली अमेरिकन पाणबुडी - युएसएस ग्रेबॅक (USS Grayback) चा तब्बल 75 वर्षांनी शोध लागलाय. चीनच्या पूर्वेकडील समुद्रात ही पाणबुडी सापडली आहे.

युएसएस ग्रेबॅक ही पाणबुडी 1944 मध्ये त्यावरच्या 80 कर्मचाऱ्यांसह बेपत्ता झाली होती. या पाणबुडीवर जपानी विमानांनी हल्ला केला होता. या पाणबुडीचे नेमके अक्षांश-रेखांश सांगणारी लष्करी कागदपत्रं सापडल्यानंतर ही पाणबुडी शोधण्यासाठी जपानच्या ओकीनावा जवळच्या समुद्रात एक शोधमोहीम राबवण्यात आली.

पण या अक्षांश-रेखांशांचं योग्य टिपण काढण्यात आलं नव्हतं आणि त्यातून एक अंकही गायब होता.

ही पाणबुडी सापडल्याचं या पाणबुडीवर बुडतेवेळी असणाऱ्या 80 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कळवण्यात आलं आहे.

कॅथी टेलर यांचे काका जॉन पॅट्रिक किंगही या पाणबुडीवर होते. आता ही पाणबुडी मिळाल्यानं या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम मिळाल्याचं त्या सांगतात.

"मी त्यांना शोधून काढीन किंवा त्यांची स्मृती कायम जिवंत ठेवीन, हे मी अगदी लहान असतानाच ठरवलं होतं," एबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं.

कशी पार पडली पाणबुडीची शोधमोहीम?

दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या अमेरिकन पाणबुड्यांना शोधण्याचं काम 'द लॉस्ट 52 प्रोजेक्ट'द्वारे (The Lost 52 Project) करण्यात येतं. युएसएस ग्रेबॅकला शोधण्याची मोहीम त्यांनी ओकिनावाच्या किनाऱ्यापासून सुरू केली.

पण ही पाणबुडी कुठे बुडली याची जपानी सैन्याने केलेली नोंद चुकीची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या नोंदीतला एका आकडा गायब होता आणि त्यामुळे शोध घेण्याची जागा तब्बल 160 किलोमीटर्सनं चुकली होती.

म्हणून मग या लष्करी कागदपत्रांसोबतच नवीन ड्रोन टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला. यामध्ये ही पाणबुडी 1400 फूट खोलवर असल्याचं आढळलं.

हा 'द लॉस्ट 52' प्रोजेक्ट चालवणारे टीम टेलर म्हणतात, " अमेरिकन नौदलाची ही युद्धनौका नेमकी कुठे बुडलेली आहे हे कळल्याने आता या जागेचं संरक्षण करता येईल. हे आमच्या नौदल सैनिकांचं शौर्यस्थळ आहे."

बुडण्यापूर्वी ग्रेबॅक पाणबुडीने किमान 14 बोटींचा वेध घेत त्यांना उद्ध्वस्त केलं होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या एकूण 52 पाणबुड्या बेपत्ता झाल्या, त्यापैकी ही एक पाणबुडी होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)