You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एक ट्वीट करून सांगितलं, "आपल्याकडे एक नवीन करार आहे, ज्यामुळे सारंकाही पुन्हा आपल्या नियंत्रणात येईल."
या कराराच्या मसुद्यावर अजूनही काम सुरू आहे, आणि या कराराच्या अंतिम स्वरूपाला युरोप तसंच युकेच्या संसदेची मंजुरी लागणारच आहे.
मात्र डेमोक्रॅटिक युनियन पार्टी (DUP)ने अजूनही या कराराला आपण पाठिंबा देऊ शकत नाही, असं म्हटलंय. उत्तर आयरिश पार्टीनेही एक निवेदन जारी करत म्हटलंय की आपण या प्रस्तावाला सध्याच पाठिंबा देणार नाही.
हा प्रस्तावित करार तर थेरेसा मे यांनी पुढे केला होता त्या करारापेक्षाही "वाईट दिसतोय", असं म्हणत विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी हा करार "नाकारायलाच हवा", असं सांगितलं.
मात्र युरोपियन कमिश्नर प्रेसिडेंट जॉ-क्लॉड जंकर यांच्यानुसार हा करार "बऱ्यापैकी संतुलित" आहे.
युरोपियन काऊंसिल अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांना लिहिलेल्या एका पत्रात जंकर म्हणाले, "आपण लवकरात लवकर (ब्रिटनची EUमधून) बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण करून, यापुढे युरोपचे युनायटेड किंग्डमशी कसे संबंध असणार आहेत, याच्या वाटाघाटी करायल्या हव्यात."
जंकर आणि जॉन्सन या दोघांनीही आपापल्या संसदेला हा करार संमत करण्याची विनंती केली आहे.
एवढंच नव्हे तर ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्यून्सबर्ग यांना सांगितलं की पंतप्रधान जॉन्सन हे नंतर युरोपीय नेत्यांना विनंती करणार आहेत की ब्रेक्झिटची तारिख पुढे ढकलण्याबाबत कुठलीही विनंती स्वीकारू नये.
सध्या ब्रिटनच्या नेत्यांनी सप्टेंबरमध्ये एक कायदा संमत केला होता ज्यानुसार, जर ब्रिटनच्या संसदेने कुठलाही करार संमत केला नाही तर जॉन्सन यांना 19 ऑक्टोबरच्या आधी ब्रेक्झिट पुढे ढकलण्याची विनंती करणं बंधनकारक आहे.
युरोपीयन युनियनचे मुख्य वार्ताहर मायकल बर्नियर यांनी सांगितलं की नवीन ब्रेक्झिट करारात चार प्रमुख मुद्दे आहेत -
- युरोपीयन युनियनचे काही निवडक कायदे यापुढेही उत्तर आयर्लंडमध्ये लागू होतील.
- उत्तर आयर्लंड ब्रिटनच्या कस्टम सीमेच्या आतच असेल मात्र ते युरोपीयन युनियनच्या एकसंघ बाजारपेठेत प्रवेशासाठी ब्रिटनचं प्रवेशद्वारही असेल.
- युरोपीयन युनियन ही एकसंघ बाजारपेठ असे आणि व्हॅट लागू करण्याच्या बाबतीत ब्रिटनच्या हितांचाही विचार केला जाईल, असंही मान्य करण्यात आलं आहे.
- उत्तर आयर्लंडचे प्रतिनिधी दर चार वर्षांनी हा निर्णय घेऊ शकतील की त्यांना युरोपीयन युनियनचे नियम उत्तर आयर्लंडमध्ये लागू करायचे आहेत की नाही.
मात्र DUP आणि उत्तर आयर्लंडच्या पक्षांनी या कराराला विरोध केला आहे. शिवाय, जॉन्सन यांच्यात हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांनी राजीनामा दिल्यामुळे तसंच 20 खासदारांना व्हीपच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे आता जॉन्सन यांच्यापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)