You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान यांचं संयुक्त राष्ट्रांतलं भाषण खोटं, प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण: भारताचं उत्तर
भारताने संयुक्त राष्ट्रांत 'Right to Reply' म्हणजेच 'उत्तर देण्याचा अधिकार' याअंतर्गत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला उत्तर दिलं आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा म्हणाल्या, "इम्रान खान यांचं भाषण प्रक्षोभक होतं आणि त्यांनी म्हटलेली प्रत्येक गोष्ट खोटी होती."
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत जवळपास 50 मिनिटांचं प्रदीर्घ भाषण केलं. पाकिस्तानने शांततेसाठी चर्चा करण्यात यावी असा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता पण भारताने या प्रयत्नांची दखल घेतली नाही असं ते म्हणाले.
विदिशा मैत्रा यांनी शुक्रवारी दिलेल्या एका सविस्तर निवेदनात इम्रान खान यांच्या आरोपांना उत्तर दिलं आणि भारताची बाजू मांडली.
विदिशा मैत्रा यांनी दिलेलं उत्तर
इम्रान खान यांचा दावा आहे की पाकिस्तानात सध्या कुठलंच कट्टरतावादी संघटन अस्तित्वात नाही आणि हा दावा पडताळून पाहण्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना आमंत्रित केलं आहे. त्यामुळे जगाने त्यांना त्यांचं आश्वासन पूर्ण करायला सांगावं, असं आम्हाला वाटतं.
आमचे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं पाकिस्तानने त्यांची आश्वासनं पूर्ण करण्याआधी द्यावीत.
- संयुक्त राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट 130 अतिरेकी आणि 25 अतिरेकी संघटना त्यांच्या देशात आहेत की नाही, याचं पाकिस्तानला उत्तर देता येईल का?
- पाकिस्तान हे मान्य करेल का की संपूर्ण जगात पाकिस्तान एकमेव असं राष्ट्र आहे जे संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्या अल कायदा या संघटनेशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना पेन्शन देते?
- पाकिस्तान हे समजून सांगू शकेल का की त्यांना न्यूयॉर्कमधली त्यांची प्रतिष्ठित हबीब बँक का बंद करावी लागली? यामागे ही बँक अतिरेकी कारवायांसाठी लाखो रुपयांचा व्यवहार करायची, हे कारण आहे का?
- पाकिस्तान हे नाकारू शकतो का की 'फायनान्शिएल अॅक्शन टास्क फोर्स'ने 27 पैकी 20 हून जास्त मानकांच्या उल्लंघनासाठी त्यांना नोटीस दिली आहे?
- आणि शेवटचा प्रश्न हा की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या न्यूयॉर्क शहरासमोर हे नाकारू शकतात का की ते ओसामा बिन लादेनचं खुलेआम समर्थन करायचे?
'इम्रान यांचं भाषण असभ्य'
विदिशा मैत्रा म्हणाल्या की इम्रान खान यांनी यूएनजीएमध्ये जी काही वक्तव्यं केलीत त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा दुरुपयोग झाला आहे.
त्या म्हणाल्या, " परराष्ट्र व्यवहारात शब्द महत्त्वाचे असतात. एकवीसाव्या शतकात 'नरसंहार', 'रक्तपात', 'वंशीय श्रेष्ठत्व', 'बंदूक उचला' आणि 'शेवटपर्यंत लढू' अशा शब्दांचा वापर मध्ययुगीन मानसिकतेचं द्योतक आहे."
विदिशा मैत्रा म्हणाल्या की इम्रान खान कधीकाळी क्रिकेटर होते आणि 'जेंटलमन्स गेम'वर त्यांचा विश्वास होता. मात्र, आज त्यांच्या भाषणाने असभ्यतेचा कळस गाठला आहे.
विदिशा मैत्रा यांच्या उत्तरातील इतर भाग
पुढे त्या सभागृहाला उद्देशून म्हणाल्या, पाकिस्तान दहशतवाद आणि द्वेषपूर्ण भाषणाला प्रोत्साहन देत आहे. आणि अशा प्रकारे 'वाईल्ड कार्ड एन्ट्री' घेऊन पाकिस्तान मानवाधिकारांचा नवा चॅम्पियन बनू इच्छितो.
हे तेच राष्ट्र आहे ज्याने आपल्या अल्पसंख्याक लोकसंख्येला 23 टक्क्यांवरून (1947) 3 टक्क्यांवर आणलं आहे.
हे तेच राष्ट्र आहे ज्याने ख्रिश्चन, शीख, अहमदिया, हिंदू, शिया, पश्तून, सिंधी आणि बलूच समाजाच्या लोकांविरोधात ईशनिंदा कायद्याचा बडगा उगारून सतत छळ केला आणि बळजबरीने धर्मांतरण केलं.
पाकिस्तानने दहशतवाद आणि द्वेषपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. याउलट भारत जम्मू-काश्मीरमध्ये विकासाला चालना देत आहे.
भारतीय नागरिकांच्या वतीने इतर कुणाला बोलण्याची गरज नाही. कमीत कमी त्यांना तर अजिबात नाही ज्यांनी द्वेषाच्या विचारधारेने दहशतवादाचा उद्योग चालवला.
याशिवाय संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट केलं, "पाकिस्तान दहशतवाद आणि द्वेषपूर्ण भाषणाला चालना देत आहे. याउलट भारत जम्मू-काश्मीरमध्ये विकासाला चालना देत आहे."
तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्वीट केलं आहे, "अणुयुद्धाच्या अंध राष्ट्रवाद, जिहाद, दहशतवादाला खतपाणी घालणे, युद्धालाप, असत्य, विश्वासघात आणि सर्वोच्च आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या दुरुपयोगाच्या वरही आयुष्य असतं, याची प्रत्येकालाच जाण असते, असं नाही."
इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासंघात दिलेल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं की भारताने काश्मीरमधून 'अमानवीय संचारबंदी' उठवली पाहिजे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)