You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात भारत मोठी बाजारपेठ असल्यामुळे जग शांत आहे
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात काश्मीरचा उल्लेख केला.
इम्रान खान म्हणाले, "पाकिस्तानात सत्तेत आल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्यासाठी हात पुढे केला, मात्र भारताकडून कुठलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही."
"भारतात निवडणुका होणार होत्या. त्यामुळं मोदी सरकारची भूमिका समजू शकत होतो. मात्र, निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आणि पुन्हा सत्तेत आल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी शांततेसाठी पाकिस्तानच्या सर्व प्रयत्नांना नकार दिला."
इम्रान खान म्हणाले, "भारतानं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला आणि 80 लाख लोकांवर सर्व बाजूंनी बंदी आणली, तेव्हा लक्षात आलं की, यामागे मोदी सरकारचा खास अजेंडा आहे."
भारतानं शिमला करार आणि त्यांच्यात राज्यघटनेविरोधात पाऊल उचललं आहे, असंही इम्रान खान म्हणाले.
'काश्मीरमध्ये रक्तपात होईल'
काश्मीरमधील बंदी हटेल तेव्हा तिथं रक्तपात होण्याची शक्यता आहे. 80 लाख काश्मिरी लोक जनावरांसारखं आयुष्य जगत आहेत, असं इम्रान खान म्हणाले..
"काश्मीरमध्ये होणाऱ्या अतिरेकावर जग गप्प आहे, कारण भारत एक मोठी बाजारपेठ आहे." असा आरोप इम्रान खान यांनी केला.
भारतातल्या हिंसेत काश्मिरी युवक सहभागी होतील आणि भारताकडून पाकिस्तानला जबाबदार ठरवले जाईल, अशीही शंका आहे, असं इम्रान खान म्हणाले.
इम्रान खान म्हणाले, "जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, तर एक लहान देश असल्या कारणानं अण्वस्त्राच्या वापराशिवाय पाकिस्तानकडे कोणताच पर्याय शिल्लक नसेल."
संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून इम्रान खान यांनी जगाला इशारा दिलाय की, जर असं झालं, तर त्याचा परिणाम केवळ भारत-पाकिस्तानपर्यंत मर्यादित राहणार नाही.
संयुक्त राष्ट्राला आपल्या जबाबदारीची आठवण करून देत इम्रान खान म्हणाले, भारत आणि पाकिस्तान आज अशा ठिकाणी आहे, जिथं 1939 साली युरोप होतं.
"1939 साली युरोपने हिटलरचं लांगूलचालन केलं. परिणामी जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागलं. काश्मीरमध्ये सध्या हीच स्थिती आहे आणि जगानं यात हस्तक्षेप करायला हवा." असं इम्रान खान म्हणाले.
50 मिनिटांचं लांबलचक भाषण
इम्रान खान म्हणाले, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य आहेत, ती संघटना हिटलर आणि मुसोलिनीला आपलं आदर्श मानते. संघाच्या विचारांनीच महात्मा गांधीजींची हत्या केली."
संयुक्त राष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडायला हवी आणि काश्मीर प्रकरणी आपल्या प्रस्तावांना लागू केलं पाहिजे, असंही इम्रान खान म्हणाले.
"संयुक्त राष्ट्रासह संपूर्ण जगानं भारतावर दबाव टाकला पाहिजे की, भारतानं काश्मीरवरील बंदी हटवावी. काश्मीरमधील राजकीय नेते आणि हजारो जनता अटकेत आहेत. त्यांची तातडीनं सुटका केली पाहिजे. काश्मिरींना स्वत: निर्णय घेण्याचा अधिकार मिळायला हवा." असं इम्रान खान म्हणाले.
इम्रान खान यांनी जवळपास 50 मिनिटं भाषण केलं. त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यासह जलवायू परिवर्तन, जगातील वाढतं दारिद्र्य आणि इस्लामोफोबिया या मुद्द्यांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला.
याआधी इम्रान खान यांनी म्हटलं, "दहशतवादाशी कुठल्याही धर्माचं काही घेणं-देणं नाही. 9/11 च्या घटनेनंतर इस्लामोफोबियाची वाढ झाली असून, ते संपायला हवं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)