अल्बर्ट आईनस्टाईन 'यांना' म्हणायचे गणितातली जिनियस

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शतकातला सर्वांत महान वैज्ञानिक म्हटलं जातं.

पण याच अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एमी नोदर यांच्याबद्दल म्हटलं होतं की, "एमी नोदर महिलांना उच्च शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या गणितातल्या सगळ्यांत प्रतिभावंत, जिनियस महिला होत्या."

पण या एमी नोदर होत्या कोण?

एमी यांचा जन्म जर्मनीत 1882 मध्ये झाला. त्यांचे वडील मॅक्स हे गणितज्ञ होते आणि ते बॅवेरियामधल्या अॅर्लान्जन विद्यापीठात शिकवत.

एमी यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केलातेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला कारण त्याकाळी महिलांना उच्चशिक्षण घेण्याची परवानगी नव्हती.

पण जर शिक्षकांनी परवानगी दिली तर त्यांना वर्गात येऊन बसता येईल असं त्यांना नंतर सांगण्यात आलं.

अखेर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण त्यांनी विद्यापीठामध्ये शिकवायला सुरुवात केल्यानंतरकाही काळ त्यांना पगारही दिला गेला नव्हता.

'आधुनिक बीजगणिताची जननी'

असं म्हटलं जातं की एमी नोदर यांनी आधुनिक बीजगणिताचा (Algebra) पाया रचला. क्वांटम थिअरीचा पाया त्यांनी रचला.

त्यांचे सिद्धांत समजून घेतल्याशिवाय आईनस्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत (Theory of Relativity) समजणं शक्य नाही.

अवघड समजला जाणारा सापेक्षतावादाचा सिद्धांत एमी नोदर यांनी अगदी सरळ सोप्या पद्धतीने सगळ्यांसमोर मांडला, असं खुद्द आईनस्टाईन यांचं म्हणणं होतं.

पण असं असूनही एमी नोदर यांच्यावर अन्याय झाला असं त्यांचं चरित्र लिहिणाऱ्या मायकल लुबेला यांचं म्हणणं आहे.

गॉटिंजन विद्यापीठामध्ये त्यांना प्राध्यापकाची नोकरी देण्यात आली नाही. शिकवण्याची परवानगी मिळाली तर पगार देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.

लोकांनी टोमणे मारले, "हे विद्यापीठ आहे, एखादा सॉना (मसाज करण्याची आणि वाफ घेण्याची जागा) नाही."

नोदर प्रमेय

सेवाईल विद्यापीठाच्या आण्विक आणि उपाण्विक (सबटॉमिक) भौतिकशास्त्र केंद्राचे प्राध्यापक मॅन्युएल लोजानो यांनी बीबीसीला सांगितलं, "थोडक्यात सांगायचं झालं तर नोदर प्रमेय ही सगळ्यांत गूढ भौतिकशास्त्र समजून घ्यायची सोपी पद्धत आहे."

लोजानो म्हणतात, "हे प्रमेय सिद्धांत म्हणून अगदी सोपं असलं तरी गणिताच्या दृष्टिकोनातून फारच अवघड आहे. सममिती (Symmetry) आणि परिमाण (Quantity) यामधल्या नात्याबद्दल हा सिद्धांत आहे."

"कल्पना करा की माझ्या हातात एक वाईनचा ग्लास आहे आणि मी तुम्हाला डोळे मिटायला सांगितले... तुम्ही डोळे मिटल्यानंतर जर मी हा ग्लास त्याच्या अक्षावरच उलटवला आणि तुम्हाला डोळे उघडायला सांगितले तर कदाचित डोळे उघडल्यानंतर हे तुमच्या लक्षात येणार नाही की हा ग्लास जागेवरून हलवण्यात आला होता."

"पण जर मी हा ग्लास गोल फिरवला आणि तुम्ही डोळे उघडलेत तर तुम्हाला वाटेल, काहीतरी नक्कीच झालं होतं.

याचा अर्थ?

लोजानोंनुसार याचा अर्थ म्हणजे हा ग्लास एका अक्षावर सममितीत होता, पण दुसऱ्या अक्षावर सममितीत नव्हता.

ऊर्जा नष्ट करता येत नाही, तिचं स्वरूप मात्र बदलता येऊ शकतं, हा थर्मोडायनामिक्सचा सिद्धांत सर्वांनाच माहीत आहे. याला 'कनव्हर्ज्ड क्वांटिटी' म्हणतात.

लोजानो म्हणतात, "एमींनी या कनव्हर्ज्ड क्वांटिटीला सममितीशी जोडलं. याच्या मदतीने भौतिकशास्त्रातल्या अनेक गूढ गोष्टी समजून घेता येऊ शकतात."

अमेरिकेतल्या आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या मायली सँचेझ म्हणतात, "हे जगातलं सर्वांत छान प्रमेय आहे. पहिल्यांदा वाचल्यावरच मी याच्या प्रेमात पडले होते. माझे विद्यार्थी या प्रमेयाने अचंबित होतात."

नाझींच्या उदयानंतर जर्मनीमध्ये एक नियम बनवण्यात आला. यानुसार सरकारी विद्यापीठांमध्ये सर्व पदांवरील ज्यूंना काढून टाकण्यात आलं.

'ज्यू असल्यामुळे विद्यापीठातून काढलं'

ज्यू असल्यानेच नोदर यांनांही विद्यापीठातून काढून टाकण्यात आल्याचं चरित्र लेखक लुबेला म्हणतात. त्यानंतर त्या ज्यू आणि इतर विद्यार्थ्यांना आपल्या घरी बोलवून शिकवायला लागल्या.

पण नंतर त्यांना देश सोडावा लागला. त्या अमेरिकेत गेल्या. तिथे प्रिन्सटन विद्यापीठाच्या ब्रिन मॉर कॉलेजमध्ये त्या काम करू लागल्या.

1935मध्ये नोदर यांना ट्यूमर झाला. त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि चारच दिवसांत त्यांचं निधन झालं.

तेव्हा त्या फक्त 53 वर्षांच्या होत्या.

फक्त भौतिकशास्त्रच नाही, तर इतर क्षेत्रांमध्येही त्यांनी काम केलं. बीजगणितातल्या त्यांच्या शोधांमुळे आधुनिक गणितज्ञांना मोठी मदत झाली. जणू काही त्या आधुनिक बीजगणिताच्या आईच होत्या.

इतक्या मोठ्या वैज्ञानिक असूनही नोदर यांना त्यांच्याच देशात त्यांच्या हक्काचं स्थान मिळालं नाही.

नाझी सरकारने त्यांचं योगदान एका झटक्यात नाकारलं. पण अमेरिकन विद्यापीठाने मात्र त्यांना थोडाफार न्याय दिला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)