मानवी मेंदूने हुशारीचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे का?

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, बीबीसी

मानवी बुद्ध्यांक वाढणार आहे की तो आता अशा शिखरावर पोहोचला आहे की जिथून मेंदूची वाढ आता शक्य नसल्यामुळे त्यात घसरण होणार आहे.

आपण हुशारीची पातळी गाठल्यामुळे बुद्ध्यांक आता घसरणार अशी चर्चा वैज्ञानिक वर्तुळात आहे. मानवी बुद्धीचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न बीबीसीचे पत्रकार डेव्हिड रॉबसन यांनी केला आहे.

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र आपण आज बुद्धिमत्तेच्या सुवर्णकाळात जगतोय.

जवळपास 100 वर्षांपूर्वी बुद्ध्यांक म्हणजेच IQ (Intelligence Quotient) कसा मोजायचा, याचा शोध लागला. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या शतकभरात मानवी बुद्ध्यांकात सातत्याने वाढ झाली आहे. इतकं की आजची अगदी सामान्य बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती 1919 साली जन्माला आलेल्या व्यक्तीच्या तुलनेत प्रतिभासंपन्न मानली जात होती. याला Flynn Effect म्हणतात.

हे वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. मात्र, बुद्ध्यांक वाढीची गती यापुढे मंदाऊ शकतो. कदाचित उलटही होऊ शकते. याचाच अर्थ आपण मानवी बुद्ध्यांकाचं शिखर गाठलं आहे.

आपण खरंच बुद्ध्यांकाची सर्वोच्च पातळी गाठली आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर बुद्ध्यांक घसरणीमुळे मानवतेच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो?

यासाठी आपल्याला मानवी बुद्धिमत्तेच्या उगमापासून सुरुवात करावी लागेल. आपले पूर्वज दोन पायांवर ताठ उभे राहून चालू लागले तेव्हापासून आपली उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजेच जवळपास 30 लाख वर्षांपूर्वीपासून. कवटीच्या जीवाश्माच्या स्कॅनवरून कळतं की पहिला द्विपाद वानर ज्याला ऑस्ट्रॅलोपिथिकस म्हणतात त्याचा मेंदू 400 क्युबिक सेंटीमीटर होता. आधुनिक मानवी मेंदूच्या केवळ एक तृतीयांश.

आधुनिक मानवाचा मेंदू शरीरातली जवळपास 20% उर्जा वापरतो. अधिक कॅलरी खर्च होणं म्हणजे मेंदूचा आकार मोठा असणं.

मेंदू विकसित होण्यामागे अनेक कारणं आहेत. मात्र, एका प्रमुख सिद्धांतानुसार समूहामध्ये राहू लागल्याने मेंदू अधिक विकसित होत गेला.

ऑस्ट्रॅलोपिथिकसनंतर मानवाच्या पूर्वजांनी अधिक मोठ्या समूहात राहायला सुरुवात केली. हा मानव झाडावरून उतरून खाली आला होता आणि जमिनीवर झोपायचा. त्यामुळे त्याला वन्यप्राण्यांपासून धोका वाढला होता. वन्यप्राण्यांपासून सुरक्षा मिळावी, कदाचित या कारणामुळे पुढे समूह मोठे-मोठे होत गेले असावे. समूहात राहिल्यामुळे बदलत्या वातावरणाची जोखीम कमी झाली. नैसर्गिक स्रोतांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ लागला. मुलांची जबाबदारी ही समूहावर पडली.

मात्र, अशाप्रकारे समूहात राहणं सोपं नव्हतं. स्वतःच्या अनुभवावरून तुम्हालाही याची कल्पना असेल. तुम्हाला प्रत्येक व्यक्ती कशी आहे, याची माहिती ठेवावी लागते. प्रत्येकाची आवड, नावड, ती व्यक्ती विश्वासू आहे की नाही, हे सर्व माहिती हवं. शिवाय शिकारीसारखी, ज्यात एकापेक्षा जास्त जणांची गरज पडते, सामूहिक जबाबदारी पार पाडायची असेल तेव्हा तर स्वतःसोबतच समूहातल्या इतर व्यक्ती काय करत आहेत, यावरही बारीक लक्ष ठेवावं लागतं.

आजच्या आधुनिक मानवासाठी सामाजिक आकलनाचा अभाव नामुष्कीचं कारण ठरतो. आधुनिक काळात जर सामाजिक आकलन चुकलं तर आपल्यावर फजितीचा प्रसंग ओढवू शकतो पण आपल्या पूर्वजांसाठी तो तर जगण्या मरण्याचा प्रश्न होता.

याशिवाय मोठ्या समूहात राहिल्यामुळे मानवाला कल्पनांची देवाणघेवाण करता आली. त्यातून पुढे नवनवीन तांत्रिक आणि सांस्कृतिक शोध लागले. उदाहरणार्थ मानवाने शिकार करण्यासाठीची अवजारं शोधली. अशाप्रकारच्या कामांसाठी तुमच्याकडे निरीक्षणातून शिकण्याची बुद्धिमत्ता असावी लागते. यातून मेंदूला चालना मिळत गेली.

जवळपास चार लाख वर्षांपूर्वीच्या होमो हिडेलबर्गेनिसीस मानवाच्या मेंदूचा आकार वाढून 1,200 क्युबिक सेंटीमीटरपर्यंत पोचला होता. आधुनिक मानवी मेंदूपेक्षा थोडा लहान. आधुनिक मानवी मेंदूचा आकार 1,300 क्युबिक सेंटीमीटर आहे. जवळपास 70,000 वर्षांपूर्वी आपले पूर्वज आफ्रिकेतून बाहेर पडले. एव्हाना त्यांच्या मेंदूचा चांगलाच विकास झालेला होता. पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात जगण्याची कला त्यांनी हस्तगत केली होती. गुहांमध्ये आढळणाऱ्या भित्तीचित्रांवरून आपले पूर्वज विश्वनिर्मितीसंबंधी विचार करू लागले होते, याची कल्पना येते.

मात्र, शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची क्षमता मोजण्यासाठी बुद्ध्यांक मापनाचा शोध जेमतेम 100 वर्षांपूर्वी लावलेला आहे. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारच्या आकलन क्षमता या परस्परांशी संबंधित असतात, या गृहितकावर त्याचं यश अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखाद्याला केवळ कल्पना करून एखादं हूबेहूब चित्र किंवा शिल्प साकारता येतं. ही खरंतर स्वतंत्र बुद्धिमत्ता. मात्र, IQ चाचणीत या बुद्धिमत्तेला गणिती/तार्किक बुद्धिमत्तेशी जोडलं गेलं. याच कारणामुळे IQ एक 'सर्वसाधारण बुद्धिमत्ता' दर्शक आहे, असं आज मानलं जातं.

IQ चाचणीवर बरीच टीका होते. मात्र, यावर बरंच संशोधन झालेलं आहे आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार या चाचणीचे गुण अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची कामगिरी कशी असेल, याची कल्पना देणारे असतात. विशेषतः तुमची शैक्षणिक कामगिरी. याशिवाय तुम्ही नोकरीच्या ठिकाणी नवीन कौशल्यं किती लवकर आत्मसात कराल, याचंही भाकीत या चाचणीतून करता येतं. IQ चाचणी परिपूर्ण नाही. एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या यशामागे अनेक कारणं असतात. असं असलं तरी ही चाचणी जटील माहिती आत्मसात करणं आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या लोकांच्या क्षमतेतलं ढोबळ अंतर दाखवतात.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बुद्ध्यांक वाढू लागल्याचं दिसतं. मात्र, मानसशास्त्रज्ञांनी नुकतीच याची नोंद घ्यायला सुरुवात केली. याचं कारण म्हणजे बुद्ध्यांकाचे गुण प्रमाणित करण्यात आले. म्हणजेच ज्या लोकांनी IQ चाचणी केली त्यांचे ढोबळ गुण अशा पद्धतीने परावर्तित केले जेणेकरून बुद्ध्यांकाचा मध्य 100 राहील. यामुळे वेगवेगळ्या बुद्ध्यांक चाचण्या घेणाऱ्यांची तुलना करणं शक्य झालं. मात्र, जोवर तुम्ही डेटाचा स्रोत तपासत नाही तोवर तुम्हाला पिढ्यांमधल्या बुद्ध्यांकातला फरक कळणार नाही.

संशोधक जेम्स फ्लिन यांनी गेल्या शतकभराचा बुद्ध्यांकाचा स्कोर तपासला. त्यात त्यांना आढळलं की बुद्ध्यांक सातत्याने वाढला आहे. हा फ्लिन इफेक्ट वादाचा मुद्दा असला तरी ही वाढ अनुवांशिक बदलापेक्षा इतर पर्यावरणीय कारणांमुळे असावी.

याची तुलना आपण मानवी उंचीशी करू शकतो. मानवाची सरासरी उंची एकोणीसाव्या शतकाच्या मानवापेक्षा 5 इंचाने वाढली आहे. याचा अर्थ आपली जनुकं बदलली असा होत नाही. तर आपलं सर्वांगिण आरोग्यच बदलल्यामुळे हा बदल घडून आला आहे.

याची तुलना मानवाच्या उंचीशी होऊ शकते.

कदाचित बुद्ध्यांक आणि उंची दोन्हीच्या वाढीमागे काही समान कारणं असू शकतात. उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती, बालवयात होणाऱ्या संसर्गाचा फैलाव कमी होणं आणि अधिक सकस अन्न या सर्वांचा परिणाम म्हणून आपली शारीरिक उंची आणि बुद्ध्यांक या दोन्हीची वाढ झालेली असू शकते. काहींच्या मते बुद्ध्यांक वाढीमागे पेट्रोलमधलं शिशाचं प्रमाण कमी होणं, हे देखील कारण असू शकतं. इंधन जितकं स्वच्छ, तेवढी अधिक बुद्धिमत्ता.

मात्र, हे देखील परिपूर्ण चित्र नाही. आपल्या बौद्धिक वातावरणातही बराच मोठा बदल झाला आहे. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच अमूर्त विचार आणि तर्क शक्तीला चालना मिळू लागली आहे. उदाहरणार्थ हल्ली शाळेतही अमूर्त स्वरूपात विचार करायला शिकवण्यावर भर दिला जातो.

(याला अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणतात. यात नजरेसमोर नसणाऱ्या वस्तूची, व्यक्तीची केवळ कल्पना करून काम करायचं असतं. उदाहरणार्थ एखादा डिझायनर नवा ड्रेस तयार करताना, नवीनच स्टाईल शोधून काढतो, ही स्टाईल त्याने कुठे बघितलेली नसते, तर मनातल्या मनात त्याची कल्पना केलेली असते.)

आधुनिक तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठीही याच अमूर्त स्वरूपाच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याकडे आपला कल असतो. यासाठी संगणकाचं उदाहरण देता येईल. संगणकात एखादं सोपं काम करायचं असेल तरीही त्यात दिलेले सिम्बॉल ओळखून त्यांचा योग्य वापर करावा लागतो.

फ्लिन इफेक्टचं कारण कुठलंही असो, याचे पुरावे आहेत की आपण या युगाच्या (बुद्ध्यांक वाढीचं युग) अंतापर्यंत पोचलो आहोत. यापुढे बुद्ध्यांक स्थिर असेल, किंवा त्याचा ऱ्हास होत जाणार आहे. फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्कसारख्या देशांमध्ये नव्वदच्या दशकाच्या मध्यापासूनच बदल दिसू लागले आहेत. या देशांच्या सरासरी बुद्ध्यांकात दरवर्षी 0.2 अंकांची घसरण बघायला मिळतेय. याचाच अर्थ येणाऱ्या दोन पिढ्यांच्या सरासरी बुद्ध्यांकात सात अंकांची तफावत असेल.

ही आकडेवारी नव्यानेच हाती आली असल्यामुळे फ्लिन इफेक्टपेक्षा या बुद्ध्यांक घसरणीच्या या ट्रेंडचं स्पष्टिकरण देणं अवघड आहे. याचं एक कारण हल्लीचं शिक्षण मेंदूला पूर्वीइतकं चालना देत नाही किंवा मेंदूला उत्तेजित करत नाही, हे असू शकतं. काही बुद्ध्यांक चाचण्यांमध्ये मुलांची अंकगणितीय चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांची कामगिरी चांगली नव्हती. मात्र, ओस्लो विद्यापीठातले ओले रॉजबर्ग यांनी म्हटल्याप्रमाणे या मुलांना कॅलक्युलेटरची सवय झाल्यामुळे त्याचे परिणाम असे आले असावे.

आपल्या संस्कृतीचाही आपल्या बौद्धिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो, हे आता स्पष्ट झालं आहे.

बुद्ध्यांकात होणाऱ्या बदलाची कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बुद्ध्यांक बदलाचे समाजावर काय परिणाम होतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फ्लिन इफेक्टने सांगितलेल्या बुद्ध्यांक विकासाचा आपल्याला खरंच फायदा झाला आहे का? आणि तसा तो झाला नसेल तर का नाही?

बुद्धिमत्तेविषयीच्या एका नियतकालिकाच्या एका विशेषांकात हाच प्रश्न उपस्थित करण्यात आला. या विशेषंकाच्या संपादकीय स्तंभात कॉर्नेल विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ असणारे रॉबर्ट स्टेर्नबर्ग लिहितात...

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपेक्षा आजची पिढी जटील मोबाईल फोन किंवा तंत्रज्ञानात अधिक पारंगत आहे. मात्र, एक समाज म्हणून आपल्या वागणुकीविषयी 30 अंक जे सांगतात, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? (दोन व्यक्तींच्या बुद्द्यांकात 30 अंकांची तफावत असल्यास त्या दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधू शकत नाही, असा एक सिद्धांत सांगतो.) 2016 ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक कदाचित आपल्या इतिहासातली सर्वात बालिश निवडणूक होती.

इतकंच नाही तर उच्च बुद्ध्यांकाने उत्पन्नातली वाढती तफावत, गरिबी, वातावरण बदल, प्रदूषण, हिंसाचार, अंमली पदार्थांमुळे होणारे मृत्यू यासारख्या जगासमोरच्या किंवा देशासमोरच्या कुठल्याच मोठ्या समस्येवर उपाय सापडलेला नाही.

इथे कदाचित स्टेर्नबर्ग निराशावादी वाटू शकतात. कारण आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे बालमृत्यू कमी झाले आहेत. गरिबीचं समूळ उच्चाटन झालेलं नसलं तरी जगभरात गरिबी कमी झाली आहे.

फ्लिन इफेक्ट खरोखरीच आपल्या बुद्धिमत्तेचा झालेला विकास दर्शवतो की नाही, यावर प्रश्न उपस्थित करणारे स्टेर्नबर्ग एकटे नाहीत. स्वतः जेम्स फ्लिन यांनीदेखील हा इफेक्ट काही विशिष्ट तार्किक कौशल्यापुरता मर्यादित असल्याचं म्हटलेलं आहे. याची तुलना शारीरिक व्यायामाशी करता येईल.

वेगवेगळे व्यायाम प्रकार सर्वांगिण तंदुरुस्ती देत नाहीत. तर ते वेगवेगळे स्नायू बळकट करतात. त्याचप्रमाणे आपण काही विशिष्ट प्रकारच्या अमूर्त विचारांचा अभ्यास करतोय. मात्र, यामुळे आकलनाची सर्व प्रकारची कौशल्यं विकसित होईल, असं गरजेचं नाही. कदाचित भविष्यात जग अधिक सुंदर बनवण्यासाठी इतर कमी विकसित कौशल्यं गरजेची असतील.

उदाहरणार्थ सर्जनशीलता. स्टेर्नबर्गसारखे संशोधक जेव्हा सर्जनशीलतेविषयी बोलतात तेव्हा त्याचा अर्थ केवळ कलेच्या दृष्टिकोनातून नसतो. तर वास्तविक जीवनाशी संबंधित कौशल्य असा त्याचा अर्थ असतो. तुम्ही एखाद्या समस्येवर उत्तम उपाय किती सहजगत्या शोधू शकता? तुमची 'प्रतिवादात्मक विचारसरणी' किती चांगली आहे - अजून न उद्भवलेली काल्पनिक परिस्थितीचा विचार करण्याची क्षमता.

बुद्धिमत्तेमुळे आपण अधिक सृजनशील व्हायला हवं. मात्र, बुद्ध्यांक वाढला तसा काळानुरूप वैयक्तिक सर्जनशीलता वाढल्याचं आढळत नाही.

तर्कशक्तीचाही प्रश्न आहे. पुरावे ग्राह्य धरून आणि असंबद्ध माहिती वगळून तुम्ही किती उत्तम निर्णय घेऊ शकता याला तर्कशक्ती म्हणतात.

जास्त बुद्धिमत्ता म्हणजे जास्त तर्कशक्ती, असा समज होऊ शकतो. मात्र, तसं नाही. उच्च बुद्ध्यांक अंकगणितासारख्या कौशल्याशी संबंधित आहे. ही बुद्धिमत्ता शक्यतांचं आकलन आणि जोखीम उचलण्यासाठी आवश्यक असते. असं असलं तरी तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी इतरही काही घटक असतात ज्यांना बुद्धिमत्तेच्या अभावाशी कसलाही संबंध नसतो.

यासाठीचं उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थावर 95% फॅट फ्री लिहलं असेल तर तो अधिक आरोग्यदायी असल्याचं आपल्याला वाटतं. मात्र, तेच जर 5% फॅट असं लिहिलं असेल तर तो पदार्थ आरोग्यदायी आहे, असं आपल्याला वाटणार नाही. याला फ्रेमिंग बायस म्हणतात. अगदी उच्च बुद्ध्यांक असणारी व्यक्तीदेखील अशा दिखाव्याला भुलू शकते.

मानवी प्रवृत्ती केवळ त्याच माहितीवर विचार करण्याची आहे जी माहिती आपल्या मताचं समर्थन करणारी असते. जी माहिती आपल्या मताच्या विरोधी असते त्याकडे कानाडोळा करण्याकडे आपला कल असतो. त्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. कन्फर्मेशन बायस म्हणजे थोडक्यात आपलंच बरोबर ही भूमिका असणं. राजकारणाविषयी बोलताना हे घातक ठरू शकतं.

उच्च बुद्ध्यांक तुम्हाला आर्थिक गर्तेत पडण्यापासूनही वाचवू शकत नाही. ही अशी प्रवृत्ती आहे ज्यात एखादा प्रकल्प यशस्वी होणार नाही, याची जाणीव असूनही तुम्ही त्यात गुंतवणूक करता. विशेषतः उद्योजकांसाठी हे घातक ठरू शकतं. (ब्रिटिश आणि फ्रेंच सरकारांना सुपरसोनिक प्रवासी विमानांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, या विमानांचा व्यावसायिक वापरातून नफा मिळणार नाही, याची कल्पना येत असूनही त्यांनी या विमान निर्मितीत गुंतवणूक केली आणि अखेर ही गुंतवणूक तोट्याची ठरली.)

दिर्घकालीन नफ्यासाठी नजिकच्या फायद्याकडे दुर्लक्ष करणं कला असते. भविष्य सुखकर करायचं असल्यासं ही कला हस्तगत करता यायला हवी. मात्र, उच्च बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीकडे ही कला असेलच असं नाही. उच्च बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती ऐहिक सवलतींनाही बळी पडू शकतात.

याव्यतिरिक्तही काही सर्वसाधारण चिंतन कौशल्यं असतात. उदाहरणार्थ तुमच्या गृहितकांना आव्हान देण्याची क्षमता, गहाळ माहिती ओळखणे आणि कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी घटनेचा वैकल्पिक स्पष्टिकरण शोधणे. उत्तमरीत्या विचार करण्यासाठी ही महत्त्वाची कौशल्यं आहेत.

मात्र, याचा बुद्ध्यांकासाठी घनिष्ठ संबंध असतोच किंवा उच्च शिक्षणातून ही कौशल्यं अवगत करता येतात, असं नाही. अमेरिकेमध्ये एक संशोधन करण्यात आलं. यात आढळलं की उच्च पदवी असूनही अनेकांच्या क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच समीक्षात्मक विचारसरणीत अजिबात फरक पडला नाही.

यातून एक गोष्ट लक्षात येते की बुद्धिमत्तेत वाढ झाली असली तरी याचा अर्थ सर्व प्रकारचे निर्णय घेण्याच्या क्षमतेत चमत्कारिक वाढ झाली आहे, असा नाही.

तर्कशक्ती आणि समिक्षात्मक विचार यांच्या अभावामुळे आर्थिक घोटाळा कसे होतात, हजारो लोक भोंदू वैदुंकडे जाऊन औषधपाण्यावर कसा वारेमाप खर्च करतात किंवा स्वतःचं आरोग्य कसं धोक्यात आणतात, हे मी माझ्या पुस्तकात विस्तृतपणे विशद केलं आहे.

आपल्या समाजासाठी यातून मोठा धोका संभवतो. या कौशल्याअभावी वैद्यकीय क्षेत्रात त्रुटी, न्यायदानात चूक संभवते. यामुळे जागतिक अर्थसंकट ओढावू शकतं. समुद्रात मोठी इंधन गळती होऊ शकते. यामुळे फेकन्यूज पसरू शकतात. वातावरण बदलासारख्या महत्त्वाच्या विषयावर मोठ्या प्रमाणावर राजकीय ध्रुवीकरण होऊ शकतं.

मानवी इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं की जटील समाजात राहण्यासाठी आपल्या मेंदूचा किती जलद गतीने विकास झाला आणि आधुनिक जीवनाने आपल्याला अधिक अमूर्त विचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या आधुनिक जीवनाने आपली तर्कहीन वृत्ती सोडण्यास मदत केलेली नाही. स्मार्ट व्यक्तींमध्ये उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असते, असं आपण गृहीत धरलं आहे. मात्र, वास्तवात असं होतं नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.

भविष्याकडे बघताना 'Reverse Flynn Effect' आणि बुद्ध्यांकाचा होत चाललेला ऱ्हास यामुळे आपण आपल्या बुद्धीचा कसा वापर करतो, याचा आढावा घेतलाच पाहिजे. शिवाय यापुढे ही घसरण रोखणं, याला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र, आपण इतर कौशल्य सुधारण्यासाठीही ठोस आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो, जे उच्च बुद्ध्यांकासोबत येत नाही.

अशा प्रकारची विचारसरणी विकसित करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ डॉक्टरांना त्यांच्या विचारांबाबत अधिक चिंतनशील होण्यास शिकवलं तर आजाराच्या आकलनात होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका टाळता येऊ शकतात. तसं झाल्यास हजारो लोकांचे जीव वाचवता येईल.

मात्र, ही कौशल्यं शालेय शिक्षणातच का शिकवू नये? उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात 'निर्णयप्रक्रियेतल्या त्रुटी' या विषयाचा समावेश करता येऊ शकतो, हे लिड्स युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलचे वँडी बर्नी डी ब्रून आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं आहे. यामुळे त्यांची तर्कशक्ती विकसित होतेच. शिवाय यातून ऐतिहासिक घटना शिकण्याची क्षमताही वृद्धिंगत होते.

परंपरागतरीत्या आपण ज्याला बुद्धिमत्ता मानत आलो आहोत, त्यासोबतच तर्कशक्ती आणि समिक्षात्मक विचारसरणीलाही तेवढंच महत्त्व दिल्यास काय करता येऊ शकतं, हे या छोट्या-छोट्या प्रयोगातून दिसून येतं.

तसं झाल्यास इथून पुढे आपल्या तर्कशक्तीत मोठी वाढ होईल. फ्लिन इफेक्टसोबतच ज्ञानातही वाढ झालेली असेल. त्यामुळेच मानवी बुद्ध्यांकाच्या घसरणीकडे बौद्धिक सुवर्णयुगाचा अंत म्हणून न बघता त्याची सुरुवात म्हणून याकडे बघायला हवं.

डेव्हीड रॉबसन बीबीसी फ्युचरचे वरिष्ठ पत्रकार आहेत. या लेखातील काही मजकूर त्यांच्या The Intelligence Trap: Why Smart People Make Dumb Mistakes पुस्तकासाठी करण्यात आलेल्या संशोधनावर आधारित आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)