चांद्रयान 2 - लोकांसमोर ढसढसा रडलं पाहिजे कारण...

फोटो स्रोत, ANI
चांद्रयान-2 चंद्रावर उतरवण्याचं भारताचं स्वप्न अगदी शेवटच्या टप्प्यात भंगलं. चंद्र अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना चंद्रयान-2च्या लँडरचा संपर्क तुटला आणि इस्रोसह देशात सर्वत्र निराशा पसरली.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जवळ घेत त्याची समजूत काढली. ही दृश्यं मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाने बघितली. त्यावर काही जणांनी सहानुभूतीची प्रतिक्रिया दिली तर काहींनी टीका केली.
भावनांचं असं सार्वजनिक प्रदर्शन योग्य नाही ते शास्त्रज्ञाने खंबीर असायला हवं, अशी टीका काहींनी केली. तर काहींना यात काहीच गैर वाटलं नाही.
मात्र, चारचौघांसमोर भावनांचं प्रदर्शन करणं तुम्हाला विचित्र वाटतं किंवा वाटतं नाही, हे सर्वस्वी रडण्याविषयी तुमचं काय मत आहे यावर अवलंबून आहे.
क्विन्सलँड विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञांच्या मते रडण्याविषयीचं तुमचं मत तुमची रडण्याची प्रवृत्ती आणि अनुभव यांना आकार देत असतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
लेह शरमन आणि त्यांच्या टीमने नुकत्याच सादर केलेल्या त्यांच्या अहवालात म्हटलं आहे, "एखादी व्यक्ती किती रडते, रडल्यानंतर तिला काय वाटतं आणि रडल्यामुळे तिला एखाद्या भावनिक प्रसंगाचा सामना करण्यात मदत होते का, हे त्या व्यक्तीचं रडण्याविषयीचं मत आणि अपेक्षा, सामाजिक संदर्भ आणि भूतकाळातले अनुभव याचा परिणाम असण्याची शक्यता आहे."
या शक्यतेचा शोध घेण्यासाठी शरमन आणि त्यांच्या टीमने रडण्याविषयीच्या मताची पहिलीच प्रमाणित चाचणी आखली. यासाठी त्यांनी काही लोकांना 'इतरांसोबत असताना रडण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो, असं तुम्हाला वाटतं,' असं काही ढोबळ प्रश्न विचारले.
या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी 'रडल्यानंतर मला माझ्या भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं' ते 'इतरांसमोर रडल्यामुळे मला मी दुबळा असल्यासारखं वाटतं' असे तब्बल 40 पर्याय दिले. शिवाय शेकडो लोकांच्या दोन गटांनी त्यांच्या उत्तराचं शून्य ते सात या स्केलवर मूल्यांकन केलं.

फोटो स्रोत, Reuters
या प्रश्नांची जी उत्तरं त्यांना मिळाली. त्यावरून शरमन आणि त्यांच्या टीमने रडण्याविषयी प्रामुख्याने तीन प्रकारच्या समजुती असल्याचा निष्कर्ष काढला.
1) खाजगीत रडणं उपयुक्त असतं : ज्या लोकांची उत्तरं या श्रेणीतली होती त्यांनी 'मी खूप निराश होतो तेव्हा रडल्याने मला मदत होते' किंवा 'रडल्याने मला बरं वाटेल' यासारख्या विधानांशी सहमती दाखवली.
2) खाजगीत रडणं उपयुक्त नसतं : या श्रेणीत येणाऱ्या लोकांनी 'एकट्यात रडताना मला अत्यंत वाईट वाटतं' किंवा 'रडल्यानंतर लगेच मला खूप वाईट वाटतं' अशा उत्तरांना सहमती दर्शवली.
3) सार्वजनिक ठिकाणी रडणं उपयुक्त नसतं : या श्रेणीत येणाऱ्या लोकांनी 'माझे मित्र किंवा कुटुंबीय नसलेल्या लोकांसमोर रडल्यावर मला खजील झाल्यासारखं वाटतं', 'सहकाऱ्यांसमोर रडल्याने मला जज केल्यासारखं वाटतं,' अशी उत्तरं दिली.
शरमनच्या निष्कर्षातून रडण्याविषयी लोकांच्या समजुतींचे काही पहिले पद्धतशीर पुरावे मिळतात. (ही मतं गोऱ्या आणि पाश्चिमात्य लोकांची आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे.) याशिवाय प्रत्येकाचं व्यक्तीमत्व आणि लिंग यासारख्या घटकांनुसार या समजुतींमध्ये बदल होऊ शकतात.
खाजगीत रडणं उपयोगाचं आहे का, याचा स्कोर जवळपास निम्मा होता. म्हणजेच खाजगीत रडणं फायद्याचं असतं, या मताशी लोक पूर्णपणे सहमत नव्हते आणि पूर्णपणे असहमतही नव्हते.
मात्र, खाजगीत रडणं उपयोगाचं नाही, या मताशी अनेक जण सहमत नव्हते. ( 0 ते 7 च्या स्केलवर या मताचा स्कोअर 2 होता.) पहिल्या दोन घटकांचे निष्कर्ष एकत्रित केल्यावर असं दिसून आलं की सहभागी झालेल्यांचा एकंदरित कल हा स्वतःहून रडण्याने खूप नुकसान होण्याची शक्यता नाही. उलट त्याची मदतच होऊ शकेल, याकडे होता.
अमेरिकेतले मानसशास्त्रज्ञ रँडोल्फ कोर्नेलियस यांनी 1985 सालापर्यंतच्या 140 वर्षांत रडण्याविषयी छापून आलेल्या 72 प्रसिद्ध लेखांचं विश्लेषण केलं. यात त्यांना आढळलं की जवळपास 94% लेखांचा सूर हा रडणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे, असा होता. (त्यांचे निष्कर्ष 1986 साली झालेल्या परिषदेत सादर करण्यात आले आणि तेव्हापासून अनेकांनी या निष्कर्षाचा संदर्भ दिला आहे.)

फोटो स्रोत, Reuters
शिवाय अनेक विद्वानांनी आणि डॉक्टरांनीदेखील रडण्याचे मानसिक फायदे सांगितले आहेत. एक सुप्रसिद्ध ब्रिटीश मानसोपचारतज्ज्ञ हेन्री मॉड्स्ले यांनी म्हटलं होतं, "ज्या दुःखांना आसवांद्वारे वाट मोकळी करून दिली जात नाही, ती दुःख लवकरच इतर अवयवांना रडवतात." म्हणजे रडून दुःख हलकं केलं नाही तर त्याचा विपरित परिणाम शरिरातल्या इतर अवयवांवर होतो.
मात्र, संशोधकांना वेगळंच आढळलं. रडण्यामुळे भावनांचा निचरा होण्याऐवजी रडल्यावर बरेचदा वाईट वाटतं, असं त्यांना दिसून आलं.
उदाहरणार्थ लॉरेन बालेस्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2011 साली प्रकाशित केलेल्या एका डायरित म्हटलं आहे की ज्या दिवशी लोक रडले त्यादिवशी त्यांची मनःस्थिती इतर दिवसांच्या तुलनेत वाईट होती. इतकंच नाही तर त्याचा परिणाम पुढचे दोन दिवस राहतो.
दरम्यान, चित्रपटातला दुःखद प्रसंग बघताना रडू कोसळणं याचा थेट संबंध दुःखी भावना दाटून येण्याशी आहे. 'दुःखी चित्रपट' शैलीच्या अलिकडच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की रडल्यामुळे मूड लवकर खराब होतो. तर रडल्यानंतर 90 मिनिटात मूड सुधारण्यास मदत झाली.
मात्र, एकंदरित या सर्व संशोधनातून जे चित्र तयार होतं ते रडण्याने भावनांचा निचरा होतो या सर्वसामान्य समजाच्या उलट आहे.
सार्वजनिक ठिकाणी रडणं योग्य?
आता सार्वजनिक ठिकाणी रडण्याविषयी बघू. शरमन यांच्या संशोधनात चारचौघांसमोर रडणं उपयोगाचं नाही, या मताशीही लोकांनी पूर्ण सहमती किंवा पूर्ण असहमती दाखवली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजेच भावनांचं सार्वजनिक प्रदर्शन याविषयी सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्यांच्या मनात द्विधा मनःस्थिती होती. या द्विधा मनःस्थितीमागचं कारण दुसऱ्या एका अभ्यासावरून समजून घेता येईल. रडण्यासंबंधीच्या एका संशोधनात असं आढळलं आहे की सार्वजनिक ठिकाणी रडण्याचे परिणाम क्लिष्ट असू शकतात आणि ते लिंगानुसार बदलतात.
उदाहरणार्थ 2016मध्ये एक संशोधन करण्यात आलं ज्यात असं दिसून आलं की न रडणाऱ्यांना रडणाऱ्यांच्या तुलनेत सक्षम मानलं जातं आणि या समजामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचं जास्त नुकसान होतं.
त्याच संशोधकांनी दुसऱ्या अभ्यासातही असाच निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रडणाऱ्या व्यक्ती अक्षम असतात, हे दुसऱ्या संशोधनात ठोसपणे सिद्ध होऊ शकलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एका संशोधनाने सामाजिक संदर्भाचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे. यात आढळलं की कामाच्या ठिकाणी रडणाऱ्यांविषयी अधिक निष्ठुरतेने मत बनवलं जातं. विशेषतः रडणारी व्यक्ती पुरूष असेल तर.
या लिंगभेदाचंही अधिक सखोल विश्लेषण करण्यात आलं. त्यात आढळलं की रडणाऱ्या महिलांना साधारणपणे चलाख आणि हळव्या मानलं जातं. तर आणखी एका संशोधनात या उलट आढळलं. यात रडणाऱ्या पुरुषांना नकारात्मक परिणामांना समोरं जावं लागत असल्याचं दिसलं.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमीच सक्षम मानलं जातं. उदाहरणार्थ, टिलबर्ग विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात असं आढळलं की ज्या स्त्रिया रडत नाहीत त्यांना केवळ न रडणाऱ्या पुरुषांपेक्षा कमी सक्षम मानलं जातं असं नाही तर रडणाऱ्या पुरुषांच्या तुलनेतही त्यांना कमीच सक्षम मानलं जातं.
असं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी रडण्याचे काही फायदेही आहेत, याचेदेखील अनेक पुरावे आहेत. रडल्यामुळे तुम्हाला इतरांकडून आपोआप सहानुभूती मिळते. मानसिक आधार मिळतो.

फोटो स्रोत, Getty Images
शरमन यांच्या अभ्यासातून व्यक्ती-व्यक्तींमधले काही विचित्र फरकही दिसून आले. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती जास्त भावनिक होत्या, ज्या भावनिकदृष्ट्या चांगल्या व्यक्त व्हायच्या आणि ज्या भावनिक आधारासाठी इतरांवर अवलंबून असायच्या त्या खाजगीत तसंच सार्वजनिक ठिकाणी रडणं उपयुक्त असतं, या मताच्या होत्या.
तर दुसरीकडे ज्या व्यक्तींनी हे सांगितलं की रडण्याचा काहीही उपयोग नसतो, त्यांना स्वतःच्या भावना योग्य पद्धतीने हाताळता येत नव्हत्या.
रडण्याविषयीचं आपलं मत आणि आपली वागणूक यांच्यांत परस्परसंबंध असल्याचा शरमन आणि त्यांच्या टीमचा दावा आहे. ते म्हणतात, "रडणं स्वीकार्य नाही, असं मानणाऱ्या व्यक्ती किंवा इतर लोक त्यांच्याकडून सकारात्मक राहण्याची अपेक्षा करतात, असं मानणाऱ्या व्यक्ती भावनांचं प्रदर्शन होता कामा नये, या प्रयत्नात स्वतःच्या भावना दाबण्याची शक्यता अधिक असते."
रडण्याविषयीचं आपलं मत, आपली वागणूक आणि आपले अनुभव यांच्यातही परस्पर संबंध असण्याची दाट शक्यता आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी रडणं खजिल करणारं आहे, असं वाटत असेल तर सार्वजनिक ठिकाणी रडणं तुमच्यासाठी एक क्लेषकारक अनुभव असू शकतो. भविष्यात संशोधनातून हे सिद्ध झाल्यास आपल्या भावनांकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनाचा आपल्यावर परिणाम होत असतो, या मानसशास्त्रातल्या मान्यतेला बळ मिळेल. उदाहरणार्थ, खराब मूडची किंमत कळणाऱ्या व्यक्तींवर अशा मूडचा फार परिणाम होत नाही.
आपल्या अभ्यासाचा शेवट करताना शरमन आणि त्यांचे सहकारी लिहितात, "प्रत्येकाचे रडण्याचे सामाजिक आणि वैयक्तिक अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळेच आयुष्य जसंजसं पुढे सरकतं रडण्याविषयीची आपली मतं बदलत असतात. हे बदललेलं मत भविष्यातलं आपलं रडणं ठरवतो. हे तोवर घडतं जोवर रडण्याविषयीचा आपला अनुभव बदलत नाही किंवा अपडेट होत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









