'विक्रम लँडर'चे अवशेष नासाला नेमके सापडले कसे?

फोटो स्रोत, ISRO.GOV.IN
चंद्राच्या पृष्ठभागावर 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचे अवशेष सापडल्याची माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'नं दिलीये. 'नासा'नं विक्रम लँडरच्या अवशेषांचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.
7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी हे यान चंद्रापासून केवळ 2.1 किमी अंतरावर होतं.
विक्रम लँडरचा जिथं इस्रोशी संपर्क तुटला होता, त्या ठिकाणापासून उत्तर-पश्चिम दिशेला 750 मीटर अंतरवार हे अवशेष सापडले असल्याचं नासानं म्हटलं आहे.
षण्मुगम सुब्रमण्यम यांना विक्रम लँडरचे अवशेष सापडले आणि त्यासंबंधी त्यांनी नासाला कळवलं. आपल्या या शोधाबद्दल बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की विक्रम लँडरचा छोटासा मला भाग सापडला. मी सांगितलेल्या ठिकाणाभोवती नासानं शोध घेतला. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर इतर अवशेष सापडले.

फोटो स्रोत, Twitter/NASA
"आम्हाला विक्रम लँडरचं शेवटचं लोकेशन माहित होतं. त्यामुळं त्या परिसरातच ते असावं, असा अंदाज होता. त्यामुळं आम्ही 2x2 पिक्सेल क्षेत्रात शोध घेतला. विक्रम लँडर अत्यंत छोटा आहे, त्यामुळं आम्ही प्रत्येक पिक्सेलचा बारकाईनं शोध घेतला. तिथं सर्वसामान्य स्थितीपेक्षा वेगळं चित्र दिसल्यावर 'नासा'ला तसा मेल केला," असं सुब्रमण्यम यांनी म्हटलं.
"रॉकेट लॉन्च पाहण्याची आवड होती. त्यामुळं अवकाश संशोधन क्षेत्रात मला पहिल्यापासूनच रस होता. त्यामुळंच या क्षेत्रात आलो. मी मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. आयटी प्रोफेशनल आहे. सुरूवातील मी वेबसाईट आणि अॅप्स तयार करायचो," असंही त्यांनी सांगितलं.
विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर या मोहिमेच्या यशापयशासंबंधी घेतलेला हा आढावा.

अंतराळ मोहिमांच्या इतिहासात नाव कोरण्याची भारताची संधी थोडक्यात हुकली. सगळं व्यवस्थित पार पडलं असतं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत पहिला देश ठरला असता.
यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. मात्र, दक्षिण ध्रुवावर कुणीही गेलं नव्हतं. दक्षिण ध्रुवावर जाणं अवघड आहे. भारताचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 2.1 किमी दूर राहण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे.
चंद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार तेवढ्यात लँडर विक्रमचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी हे यान चंद्रापासून केवळ 2.1 किमी अंतरावर होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या बंगळुरूतल्या मुख्यालयात गेले होते. मात्र, अखेरच्या क्षणी चंद्रयान-2 चा 47 दिवसांचा प्रवास अपुरा राहिला.
इस्रोचा हा पराभव आहे? की या पराभवातही इस्रोचा विजय दडलेला आहे? अखेर चांद्रयान-2 चा 47 दिवसांचा प्रवास पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोचल्यावर अपुरा का राहिला? यामागे काही तांत्रिक बिघाड होता का?
हे सर्व प्रश्न बीबीसीचे प्रतिनिधी रजनीश कुमार यांनी विज्ञानविषयक प्रसिद्ध पत्रकार पल्लव बागला यांच्यापुढे ठेवले. पल्लव बागला यांच्याच शब्दात वाचा त्यांची उत्तरं.
शेवटचे काही क्षण उरले असताना विक्रम लँडरचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटला. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितलं की लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी दूर होता तेव्हा त्याचा संपर्क तुटला.

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या नियंत्रण कक्षातून वैज्ञानिकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरने कुठेतरी चंद्रावर उतरण्याची घाई केली. शेवटच्या क्षणांमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे ज्यामुळे पूर्ण यश मिळू शकलं नाही.
विक्रम लँडरमुळे निराशा झाली असली तरी ही मोहीम अपयशी ठरलेली नाही. कारण चांद्रयान-2चा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आपलं काम करत आहे. या ऑर्बिटरमध्ये अनेक वैज्ञानिक उपकरणं आहेत आणि ही सर्व उपकरणं उत्तम पद्धतीने काम करत आहेत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा प्रयोग होता आणि या प्रयोगाला नक्कीच धक्का बसला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या अपयशातही विजय आहे. यापूर्वीही भारताने ऑर्बिटर सोडलं होतं. मात्र, यावेळेचं ऑर्बिटर जास्त आधुनिक आहे. चंद्रयान-1च्या ऑर्बिटरपेक्षा चंद्रयान-2चं ऑर्बिटर जास्त आधुनिक आणि वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज आहे.
प्रत्येकच प्रयोग यशस्वी होत नसतो
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा प्रयोग भारताने पहिल्यांदा केला आहे आणि या प्रयोगातले शेवटची 15 मिनिटं खूप महत्त्वाची असतील, असं डॉ. सिवन यांनी मला सांगितलं देखील होतं. हा एक प्रयोग होता आणि त्यात धक्का बसला आहे. प्रत्येकच प्रयोग यशस्वी होत नसतो.
माझ्या अंदाजानुसार शुक्रवारी रात्री जवळपास 1.40 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला सुरुवात केली आणि जवळपास 2.51 किमी दूर असताना संपर्क तुटला. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आजवर कुठलंच रोबोटिक लँडर उतरलेलं नाही, हे खरं आहे.

फोटो स्रोत, Twitter/pib india
मात्र, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी मला सांगितलं होतं की दक्षिण ध्रुव असो विषुववृत्तावरच्या सपाट प्रदेशावर असो किंवा उत्तर ध्रुवावर उतरणं असो सर्वांमध्येच अडचणी येतात. डॉ. सिवन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही ध्रुवावर उतरणं सारखंच आव्हानात्मक असतं.
नवीन माहिती मिळावी, यासाठी चंद्रयान-2 ला अगदीच नवख्या ठिकाणी पाठवलं होतं, हे खरं आहे. जुन्या जागी जाऊन काही उपयोग नव्हता म्हणून नवीन जागा निश्चित करण्यात आली होती.
'ऑर्बिटर तर काम करतच आहे ना'
ऑर्बिटर तर काम करतोच आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणं हे भारताचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि हे काम ऑर्बिटर करत आहे. भविष्यात त्याचा डेटा नक्कीच येईल.
विक्रम लँडर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तिथली माहिती गोळा करणार होतं. ते आता होणार नाही. तिथल्या डोंगराचं विश्लेषण करायचं होतं, ते आता होणार नाही. विक्रम आणि प्रज्ञानवरून चंद्राच्या पृष्ठभागाची सेल्फी आली असती, जगाने ती बघितली असती. आता ते शक्य नाही. विक्रम आणि प्रज्ञानने एकमेकांचा फोटो पाठवली असता. ते आता शक्य नाही.
ही एक वैज्ञानिक मोहीम होती आणि ही मोहीम आखण्यात 11 वर्षं लागली. या मोहिमेचा ऑर्बिटर यशस्वी झाला. लँडर आणि रोव्हर अपयशी ठरले. या अपयशाने इस्रो मागे जाणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याचाच पुनरुच्चार केला आहे. इस्रो सर्वांत आधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की नेमकं काय झालं आणि त्यानंतरच पुढचं पाऊल काय असेल, हे ठरवले.
अमेरिका, चीन आणि रशियाला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आलं आहे. मात्र, शुक्रवारी रात्री भारताला हे साध्य करता आलं नाही. सॉफ्ट लँडिंग म्हणजे कुठल्याही सॅटेलाईटला लँडरने सुरक्षित उतरणे आणि त्याचं काम सुरळित सुरू होणे. चंद्रयान-2 लादेखील अशाच पद्धतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचं होतं. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी ते शक्य झालं नाही.
जगभरातले 50 टक्क्यांहून कमी अवकाश मोहिमा सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्या आहेत. अंतराळ विज्ञान जाणणारे नक्कीच भारताच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देतील. यानंतर इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे 'गगनयान'. गगनयान मोहिमेत अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








