#HisChoice : 'मला माझ्या मुलाला सांगायचंय की रडण्यात काहीही गैर नाही'

'पापा प्लीज, No!'
आजकाल खेळताना मी माझ्या मुलाला पकडतो तेव्हा त्याच्या तोंडून हे शब्द सहज निघतात. त्याला लक्षात आलंय की हे काम करतं. फक्त तीन शब्द, 'पप्पा प्लीज, No.'
त्याच्या आईने आमच्यात तसा करारच घडवून आणला आहे. जेव्हाही तो हे तीन शब्द उच्चारेल तेव्हा मी त्याला ताबडतोब सोडून देईल. मग भले मी त्याला कित्येक तासांनी पाहात असेन, त्याला छातीशी कवटाळण्याची माझी इच्छा असेल किंवा त्याला चिडवायचं असेल... तरीही त्याच्या परवानगीशिवाय मी त्याला स्पर्श करू शकत नाही.
फारफार तर 15-20 दिवसांपासून आम्ही हे करत असू, पण एका लहानशा सवयीने त्याच्यात किती बदल झाला आहे, हे पाहून मी थक्क झालोय.
त्याला या गोष्टीची जाणीव झाली आहे की घरात त्याचं ऐकलं जातं. त्याचा आत्मविश्वास बळकट होण्यासाठी हे गरजेचं आहे.
पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याला आतापासून 'नाही' या शब्दाचं सामर्थ्य लक्षात आलं आहे. कित्येकांचं आयुष्य जातं या शब्दाचं सामर्थ्य लक्षात येता येता. अनेकांना तर आयुष्यभर हे कळतच नाही.
फक्त अडीच वर्षांचा आहे तो, तेव्हाच त्याला जर हे समजतंय तर मी आशा करतो की तो मोठा होईल तेव्हाही तो इतरांच्या 'नाही' चा आदर करेल.
मी लहान असताता खूपदा ऐकलं, 'काय मुलीसारखा रडतोस'? या एका वाक्यात मर्दानगीची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला जातो.
मुलगा असून कुणी कसं काय रडू शकतो? या गोष्टीचा माझ्यावर किती मानसिक दबाव होता हे मी सांगू शकत नाही. कदाचित हा दबाव माझ्यावर माझ्या आईवडिलांनी टाकला होता किंवा नातेवाईकांनी.
मी अजूनही माझ्या आईवडिलांशी या विषयावर बोललेलो नाही, पण कदाचित त्यांच्यासाठी रडणाऱ्या मुलाला शांत करण्याची ही एक क्लृप्ती असेल.
काही दिवसांनी माझा मुलगा घराबाहेर पडेल, दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला जाईल, सायकल चालवायलाही शिकेल. पण त्याला या दबावापासून मुक्त ठेवायचा माझा प्रयत्न असेल. मनमोकळं रडण्यासाठी किंवा आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी त्याच्यावर दबाव का असावा?

#HisChoice ही बीबीसीची विशेष सीरिज आहे. भारतातल्या 9पुरुषांच्या जीवनात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित ही सीरिज आहे.
या कथा 'आधुनिक भारतीय पुरुषां'चे विचार आणि त्यांच्या आशा-आकांक्षा, प्राधान्यक्रम आणि त्यांच्या आवडीनिवडींवर प्रकाश टाकतात.

आपलं दुःख व्यक्त करण्याआधी, त्याला हा विचार करावा लागेल का की तो मुलगा आहे की मुलगी? वेदना सगळ्यांनाच होतात, त्यांची तीव्रता कमी जास्त असू शकते आणि याच्याशी रडण्याचा काही संबंध नसावा. आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांनाच असला पाहिजे.
मुलांना जेव्हा हे सांगितलं जातं की, 'मुली रडतात, मुलं नाही' तेव्हा अप्रत्यक्षपणे हे सांगायचं असतं की रडणं कमकुवत असण्याचं लक्षण आहे. मुलांना कळत नकळत दिलेली ही शिकवण त्याच्या मनावर कोरली जाते आणि मग ती प्रत्येक गोष्टीत दिसायला लागते.
शाळेत खेळताना त्यांची इच्छा नसते की त्यांच्या टीममध्ये मुली असाव्यात, कारण त्या तर दुबळ्या असतात आणि त्या टीममध्ये असल्या तर कोणतीही मॅच जिंकणं सोपं नसणार.
एखादा मुलगा दुबळा असू शकत नाही का? मी माझ्या मुलाला कधी हे म्हणणार नाही की तू असा कसा मुलगा आहेस जो मुलीकडून हरला.
खेळांकडे फक्क खेळ म्हणून पाहिलं पाहिजे, त्यात मुलगा-मुलगी असा भेद नको. आणि खेळात हार-जीत आपापल्या क्षमतेनुसार होते.
मुला-मुलींमध्ये असणारं अंतर वेळेपरत्वे वाढत जातं.

मला आठवतं, आठवीत असताना जेव्हा पहिल्यांदा आम्हाला रिप्रोडक्शनचा धडा शिकवला गेला, तेव्हा वर्गातली अनेक मुलं गालातल्या गालात हसत होती. मुलांच्या या खिदळण्याने मुली अस्वस्थ झाल्या होत्या आणि म्हणूनच शिक्षकांनीही काहीही प्रश्न न घेता-विचारता तास संपवला.
पण मुलांच्या काही प्रश्नांची उत्तर शिक्षकांच्या आधी आई-वडिलांनीच दिली असती तर त्यावेळी वर्गात आणि मग शाळेतून परतताना कोणत्या गल्लीत बसून मुलींवर जोक मारायची वेळ आली नसती.
आजकाल मोकळेपणाने प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचा आहे. राईट टू ब्लीड, मीटू यासारख्या अनेक कँपेन्स चालू आहेत. अशात माझ्यासारख्या बापाने आपल्या मुलांशी खुलेपणाने बोलायला नको? मुलांना हे समजावून सांगायला हवं की मुलींच्या भावनांना समजून घ्या. विशेषतः पाळीच्या दिवसात संवेदनशीलपणा दाखवा. असं केलं तर ते आपली आई, बहीण यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि यातूनच एक सकारात्मक समाज घडेल.
आजही ऑफिसमध्ये काही सहकाऱ्यांना महिलांवर पांचट विनोद करताना पाहातो, तेव्हा वाटतं की याची सुरुवात कुठेतरी त्या रिप्रोडक्शनच्या धड्याशी निगडित आहे.
लहानपणी जे लक्ष विचलित झालं होतं, त्यामुळे या गोष्टींमध्ये नको इतका रस निर्माण झाला होता. कुणी काही सांगायला नाही, समजवायला नाही, त्यामुळे रिकामं असताना याच गोष्टींमागे सगळा वेळ जायचा. आता असं वाटतं की यात जो वेळ गेला तो काहीतरी चांगलं करण्यासाठी वापरण्यात आला असता.
लहान मुलं अनेक गोष्टी स्वतःच्या स्वतःच शिकतात. पण तरी मला वाटतं की माझ्या मुलाच्या मनात जे प्रश्न येतील, त्यांची उत्तरं मी योग्य वेळी द्यावी.
मला त्याचा मित्र बनावं लागेल. मला माहीत आहे की मुलं जेवढ्या मोकळेपणाने सगळ्या गोष्टी आपल्या मित्रांना सांगतात तेवढ्या मोकळेपणाने कदाचित आईवडिलांना सांगणार नाही.

पण तो माझ्याशी बोलू शकतो, असा विश्वास त्याला वाटणं ही माझी जबाबदारी आहे. मला मान्य आहे की तो इतर मुलांसारखाच पीअर प्रेशरमध्ये अडकेल. त्यालाही अनेक किशोरवयीन मुलांप्रमाणे नवनवीन गोष्टींचा प्रयोग करून पाहाण्याचं कुतूहल असणार.
बाप आणि मुलगा यांच्यातली नाजूक सीमारेषा पार न करता त्याला चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणं ही माझी जबाबदारी असेल.
माझे माझ्या वडिलांशी खूप चांगले संबंध आहेत, पण त्यांच्याशी प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोलण्याची हिंमत नव्हती. मला वाटतं की मुलाशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला हे माहीत असायला हवं की त्याच्या मनात काय सुरू आहे. उद्या चालून तो कोणत्या अडचणीत सापडला तर वेळेवारी मी त्याचा बचाव करू शकेन.
दहावी, बारावी, कॉलेज आणि मग नोकरी. आयुष्यातल्या या टप्प्यावर मुलांशी संवाद साधण्याची फार गरज असते. मी माझ्या मुलाला सांगेन की अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण जर कमी मार्क मिळाले तर मी त्याला मार्कांच्या तराजूत तोलणार नाही. लोक काय म्हणतील या दबावापासून मी त्याला लांब ठेवेन, म्हणजे पुढे जाऊन तो पुराणमतवादी विचारांना आव्हान देईल.
चुका सगळीच मुलं करतात, पण त्याला चांगल्या-वाईटातला फरक सांगणं माझं काम आहे. मान्य आहे की तो चुकेल तेव्हाच शिकेल. पण त्याने अशी एखादी चूक करावी, ज्याने दुसऱ्याचं नुकसान होईल, हे मला मान्य नाही.
या सगळ्यातून मी गेलोय म्हणूनच माझी इच्छा आहे की यातून माझ्या मुलाला तरी सोडवावं.
(ही गोष्ट दिल्लीत राहणाऱ्या कथानायकाशी बीबीसी प्रतिनिधी प्रशांत चहल यांनी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. बीबीसी प्रतिनिधी सुशीला सिंह यांची ही निर्मिती आहे.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








