'माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यासमोर कपडे काढणं कठीण जातं'

फोटो स्रोत, BBC Three
माझं नाव मिक विथम आणि माझं माझ्या गर्लफ्रेंडवर - लिअॅनवर खरंच खूप प्रेम आहे. पण तिचंही स्वतःवर प्रेम असतं तर खूप बरं झालं असतं.
मोहक हास्य, निळे डोळे आणि लांब केसांची लिअॅन सुंदर आहे. ती केस नेहमी वेगवेगळ्या रंगानी रंगवते. सध्या तिने आपले केस लालभडक रंगाचे केले आहेत.
पण लिअॅनला जशी ती दिसते ते आवडत नाही. दिवसातून अनेकदा ती स्वतःला कुरूप आणि किळसवाणं म्हणते. तिचं वजन जास्त नसतानाही तिला ती जाड आहे असं वाटतं. तिचा चेहरा चांगला रेखीव आहे, पण तरीही तो तिला एका बाजूने वाकडा आहे असं वाटतं.
2015 मध्ये आम्ही टिंडरवर भेटलो. लिअॅनला टिंडर आवडायचं कारण त्यातल्या फोटोंमध्ये ती कशी दिसते हे ती ठरवू शकत होती.
सुरुवातीला आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मला ती अगदी कॉन्फिडंट वाटली. मी कधीही इतर कोणासोबत इतक्या पटकन रुळलो नव्हतो.
तिच्यामध्ये असं काहीतरी होतं ज्याकडे मी अगदी पूर्णपणे आकृष्ट झालो.
आमच्यातलं नातं छान होतं. आणि मी तिच्या प्रेमात पडल्याचं माझ्या काही महिन्यांतच लक्षात आलं.
स्वतःच्या प्रतिमेविषयी शंका
आमच्या नात्याला 6 महिने पूर्ण होता होता माझ्या लक्षात आले की लिअॅनला फक्त तिच्या शरीराविषयी न्यूनगंड नाही तर त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं आहे.
बाहेर जाण्यासाठी आम्ही एकत्र तयारी करत होतो तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचा हेअरस्प्रे संपलाय. ती खूप अस्वस्थ झाली.

फोटो स्रोत, BBC Three
तिचं काहीतरी बिनसलंय हे माझ्या लक्षात आलं. आपले केस कसे दिसतील याची अतोनात काळजी तिला वाटत होती. शेवटी मी दुकानात जाऊन तिच्यासाठी हेअरस्प्रेचा नवा कॅन विकत आणला. तो तिच्या नेहमीच्या स्प्रेपेक्षा वेगळा होता. ते पाहून ती प्रचंड वैतागली, इतकी की रागाच्या भरात ती गोष्टी लाथाडू लागली.
शेवटी त्यावरून आमचं मोठं भांडण झालं. तिचं वागणं, स्वतःविषयी नकारात्मक विचार करणं, स्वतःला कमी लेखणं तिच्यासाठी चांगलं नाही, हे मला नंतर लक्षात आलं.
मलाही ओसीडी - ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर आहे. आधी याचं प्रमाण जास्त होतं पण आता ते नियंत्रणात आहे. त्यामुळे तिच्या वागण्यातली लक्षणंही अशाच प्रकारच्या डिसऑर्डरची असू शकतात असं मला वाटलं.
तिने यासाठी जवळच्या डॉक्टरकडे जावं असं मी सुचवलं. आधी तिला ही कल्पना पटली नाही, पण नंतर आम्ही या गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा करू शकतो याचं तिला बरं वाटलं.
बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर
डॉक्टरने तिच्या या वागण्याचं निदान करण्यात केलं. तिला बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर म्हणजेच बीडीडी (BDD) होता.
जगभरातल्या लोकसंखेच्या फक्त 2% लोकांमध्ये ही गोष्ट आढळते. अशा लोकांना आपण कुरूप आहोत असं वाटतं, ते स्वतःच्या रूपाची इतरांशी तुलना करतात आणि शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाविषयी, सहसा चेहऱ्याची त्यांना सतत काळजी वाटते.
या बीडीडीसाठीच्या थेरपीला लिअॅनने सुरुवात केली आहे. तिच्या आजाराचं निदान झालं असलं, तरी अशा परिस्थितीत राहणं कठीण आहे. मला स्वतःला त्रास होत नसला तरी लिअॅनसोबत असल्याने आता बीडीडी हा माझ्याही रोजच्या आयुष्याचा भाग आहे.

फोटो स्रोत, BBC Three
तिच्या या आजारामुळे रोज काहीतरी भलतंच घडू शकतं. म्हणजे एकदा आम्ही दोघे ज्यूस बारला जात होतो. पण तिने अचानक सांगितलं की ती आत येणार नाही. आत बसलेली मुलगी तिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे असं तिला वाटलं आणि ती आत आली नाही.
पण हा आजार फक्त इतकाच मर्यादित नाही. कधी कधी परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते. अशात लोकांना आपला चेहरा ओरबाडून काढावा, केस जाळून टाकावेत असंही वाटतं.
तिनेही तिचे केस एकदा जाळण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या हातातला लायटर मी अक्षरशः हिसकावून घेऊन तिला थांबवलं.
आमच्या नात्याची सुरुवात झाली, तेव्हाच हे सगळं घडल्यामुळे मी अगदी घाबरून गेलो होतो. तिला थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो.
सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही, सेक्स करू शकत नाही. माझ्यासमोर कपडे काढणं, किंवा तसं वावरणं लिअॅनला खूप कठीण जातं.
आम्ही जवळ आलो त्याला आता महिने उलटले असतील. तेव्हा आमच्यात फोरप्ले झाला होता.
सेक्स करताना ती कम्फर्टेबेल व्हावी म्हणून सहसा मी थांबतो आणि तिला पुढाकार घेऊ देतो. पण त्रासदायक गोष्ट म्हणजे मी पुढाकार घ्यावा असं तिला वाटत असतं. परिणामी आम्ही क्वचितच एकमेकांच्या जवळ येऊन काही 'करू' शकतो.
आम्ही जवळ येऊ शकत नाही
आम्ही जवळ येतो तेव्हा लिअॅनला त्यावेळी कसं वाटतंय यावर सगळं अवलंबून असतं. आम्ही सुरुवात तर करतो, पण जर तिला याबद्दल मनापासून काही वाटत नसेल तर मग आम्ही थांबतो.
कधीकधी मला अगदी माझ्यावर सुरा रोखल्यासारखं वाटतं. कोणत्याही नात्यात सेक्स ही महत्त्वाची गोष्ट नसली तरी नात्याचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे .
मग मी स्वतःसाठी पॉर्न पाहातो. मी ते पाहून नये असं लिअॅनला वाटतं आणि ते वैतागते. तिच्याबरोबर सेक्स करण्यापेक्षा मला पॉर्न जास्त आवडतं असं तिला वाटतं.
आम्हाला जवळीक साधता यावी म्हणून आम्ही अनेक गोष्टी केल्या. डेटवर गेलो. तिला स्वतःला तयार करण्यासाठी मी भरपून वेळ दिला. पण तिलाच स्वतःबद्दल न्यूनगंड वाटत असेल तर सगळंच कठीण होतं.
आम्ही आमच्या भविष्याबद्दल काहीच ठरवू शकत नाही.

फोटो स्रोत, BBC Three
आम्ही दोघेही 29 वर्षांचे आहोत. आमचे सगळे मित्र-मैत्रिणी लग्न करत आहेत. या उन्हाळ्यातही आम्हाला अनेक लग्नांना जायचं आहे. आम्हीही लग्न आणि मुलं यांच्याबद्दल बोललो आहेत. मला खरंच आवडेल ते सगळं.
पण गोष्टी एका टोकावरून पार दुसऱ्या टोकाला जातात. तिला म्हणते की तिला लग्न करायला आवडेल. पण नंतर तिचा बीडीडी नकार देतो. कारण मूल झालं तर शरीराचं काय होईल याची तिला काळजी वाटायला लागते.
सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, आणि त्याने फरक पडतोय. पण असेहे काही क्षण आले होते जेव्हा मला वाटलं की बस्स, आता वेगळं व्हायला हवं.
आम्ही एकदा एका कार्यक्रमानंतर मित्रांबरोबर बारमध्ये बसलो होतो. तिथे एक मुलगी आली, ती आपल्यापेक्षा जास्त सुंदर आहे असं लिअॅनला वाटलं होतं, ती माझ्याशी भांडून, माझ्यावर ओरडून तिथून निघून गेली.
मला वाटतं तिच्याकडून ते स्वसंरक्षणार्थ घडतं. पण आता आम्ही एकमेकांना डेट करत असल्याला 18 महिने उलटून गेले आहेत आणि या लहानसहान गोष्टी साचायला लागल्यायत.
ती अनेकदा असं करते. दुकानातून किंवा बारमधून निघून जाते, जवळपासच्या कोणामुळे बीडीडी ट्रिगर झाल्याने संतापते आणि त्यामुळे माझ्यावर किंचाळते.
दिलासा देण्याचा प्रयत्न
त्या दिवशी बारमधल्या घटनेनंतर हे सगळं जास्त होत असल्याचं मी तिला सांगितलं. तिने जर यासाठी मदत घेतली नाही तर मी हे अजून सहन करू शकणार नसल्याचंही तिला सांगितलं.
कधी कधी तर मला लिअॅन म्हणजे दोन व्यक्ती असल्यासारखं वाटतं. माझं प्रेम असलेली लिअॅन आणि तिच्या आतला बीडीडी.
ती जे काही बोलते त्याला थेट प्रतिक्रिया देणं मी टाळतो. ती म्हणाली, 'मी निबर दिसते', तर काही बोलण्याऐवजी मी तिच्या दंडाला किंवा हाताला स्पर्श करून किंवा मिठी मारून दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना बरेच दिवस मी ही गोष्ट सांगितली नव्हती कारण ही लिअॅनची 'खासगी गोष्ट आहे' असं मला वाटत होतं. पण मागच्या वर्षी मला माझ्या मनात साचून राहिलेल्या गोष्टी मोकळ्या कराव्याशा वाटत होत्या म्हणून मग मी माझ्या आईवडिलांना सांगितलं.
त्या दोघांनीही मला पाठिंबा दिला. माझी आई मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते आणि लिअॅनची परिस्थिती समजू शकते. पण मी आनंदी असणं तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मी खुश असल्याचं मी तिला कायम सांगत असतो.
मित्रांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना बीडीडीबद्दल नुकतंच समजलं. माझ्यात आणि लिअॅनमध्ये जवळीक नाही, हे समजून घेणं त्यांना सर्वात जास्त कठीण जातंय. 'आम्ही नसतो हे सहन करू शकलो' प्रकारच्या कॉमेंट्स मला अनेकदा ऐकाव्या लागतात.
पण लिअॅनचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि माझा त्या प्रेमावर विश्वास आहे.
येणारा प्रत्येक दिवस मी नवा मानतो आणि आम्ही एकत्र जो काही चांगला वेळ घालवतो तो मी साजरा करतो. अजूनही आम्ही रोज हसतो, एकमेकांसोबत सगळं शेअर करतो आणि ती अजूनही माझी बेस्ट फ्रेंड आहे.
लिअॅनचा बीडीडी कधीही पूर्णपणे जाणार नाही, याची मला जाणीव आहे. पण मला त्याची तीव्रता कमी झाली तर आवडेल म्हणजे लिअॅनला स्वतःविषयी चांगलं वाटू शकेल आणि मला सतत जपून पावलं टाकण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








