जरा मनात डोकावून पाहा, कदाचित तुमच्यातही या 7 भावना लोप पावत आहेत

फोटो स्रोत, Getty Images
मानवी भावना या स्थिर आणि सर्वत्र सारख्याच असल्याचा आपला समज असतो. मात्र आश्चर्य वाटेल की काही भावना स्थळानुसार बदलत असतात आणि सतत नवनव्या भावनांचा शोध लागत असतो.
उदाहरणार्थ, सध्या प्रचलित असलेली FOMO ही भावना. FOMO म्हणजे Fear of Missing Out. इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यानंतर ही संज्ञा अस्तित्वात आली. याचा अर्थ कुठेतरी एखादा एक्साइटिंग कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्हाला तिथे उपस्थित राहता येत नाही. यातून आलेलं दडपण म्हणजे FOMO.
इतकंच नाही तर भावना, त्या ज्या पद्धतीने अनुभवल्या जातात, व्यक्त केल्या जातात आणि त्याविषयी बोललं जातं, यातही काळानुसार बदल होऊ शकतो. याविषयी आम्ही History of the Emotions केंद्राच्या एक्सपर्ट डॉ. सारा चॅनी यांच्याशी बातचीत केली.
डॉ. सारा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बीबीसी रेडियो 3च्या Free Thinking Festival या कार्यक्रमात हरवलेल्या भावनांचं यंत्रदेखील (Lost Emotions Machine) आणलं. आपल्याला आज काय वाटतं, हे समजून घेण्यासाठी पूर्वी कोणत्या भावना होत्या, हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती त्यांनी दिली.

बघूया अशाच काही हरवलेल्या भावनांविषयी...
1) Acedia (विशिष्ट प्रकारची उदासीनता)
मध्ययुगीन काळात काही विशिष्ट पुरुषांमध्ये ही भावना दिसायची, जसे की मठांमध्ये राहणारे भिक्खू. अध्यात्मिक कोंडी किंवा पेचातून ही भावना उत्पन्न व्हायची. जे ही भावना अनुभवायचे, त्यांना निराश, अस्वस्थ, सुस्त वाटायचं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना आध्यात्मिक आयुष्य सोडून देण्याची अतिव इच्छा व्हायची.
डॉ. चॅनी सांगतात, "हल्ली या भावनेला नैराश्य असं लेबल लावतात. मात्र असीडिया या भावनेचा थेट संबंध आध्यात्मिक पेच आणि मठातलं आयुष्य यांच्याशी आहे. त्याकाळी मठातल्या सर्वोच्च गुरूसाठी हा काळजीचा विषय होता. विशेषतः या भावनेमुळे सहकाऱ्यांमध्ये जो एकप्रकारचा सुस्तपणा यायचा, त्यामुळे धर्मगुरू निराश व्हायचे."

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिश्चन धर्मग्रंथात सांगितलेल्या सात घोरपापांपैकी एक पाप म्हणजे आळस. जसजसा काळ बदलत गेला, आळस हा असीडियाचा समानार्थी शब्द मानण्यात आला.
2) Frenzy (उन्माद)
"ही देखील मध्ययुगीन काळातलीच एक भावना," डॉ. चॅनी सांगतात. "ही एकप्रकारे संतापाची भावना आहे. मात्र, विशिष्ट प्रकारचा संताप." एखाद्याच्या मनात ही भावना असेल तर ती व्यक्ती अतिउत्तेजित होऊ शकतो. चवताळू शकते. तिचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. ती व्यक्ती आरडाओरडा करत संतापून हिंसक होऊ शकते. म्हणजेच ही भावना असणारी व्यक्ती एका जागी शांत बसू शकत नाही.
"भावना ही मनातली अंतर्गत बाब आहे आणि प्रयत्न केले तर आपण आपल्या भावना दडवू शकतो, हा जो आपला आधुनिक समज आहे, तो या फ्रेन्झी भावनेतून अधोरेखित होतो. मात्र मध्ययुगीन काळात ही भावना अनुभवणाऱ्या लोकांना आजचा हा समज लागू होत नव्हता."

फोटो स्रोत, Getty Images
"भावना व्यक्त करण्यासाठी लोकांनी जी भाषा वापरली, त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी अशा गोष्टी अनुभवल्या ज्यांचा आपण कधीच अनुभव घेऊ शकत नाही," डॉ. चॅनी सांगतात. काही ऐतिहासिक भावना या त्या काळाशी आणि ठिकाणांशी इतक्या सुसंगत होत्या की त्या आपण आज अनुभवू शकत नाही.
3. Melancholy (विषाद, खिन्नता, उदासीनता)
"Melancholy हा शब्द हल्ली उदासीनता किंवा खिन्न मनःस्थितीसाठी वापरला जातो. मात्र पूर्वी याचा अर्थ वेगळा होता," डॉ. चॅनी सांगतात. "सुरुवातीच्या आधुनिक काळात या भावनेला शारीरिक व्याधी मानले गेले, ज्याचा संबंध सहसा भीतीशी जोडला गेला."
सोळाव्या शतकापर्यंत शारीरिक आरोग्य हे शरीरातल्या चार तत्त्वांच्या संतुलनावर अवलंबून असल्याचाच समज होता. ही चार तत्त्वं म्हणजे रक्त (Blood), कफ (Phlegm), पिवळं पित्त (Yellow Bile) आणि काळे पित्त (Black Bile). शरीरात काळ्या पित्ताचं प्रमाण वाढल्याचा परिणाम म्हणजे Melancholy, असे मानले जाई.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. चॅनी सांगतात, "पूर्वी Melancholyच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण होतं भीती. काही प्रकरणांमध्ये तर लोकांना आपण काचेचे बनलेले आहोत, असं वाटायचं आणि फुटण्याच्या भीतीने ते जागचे हलायचेदेखील नाहीत."
फ्रान्सचे सहावे राजे चार्ल्स हे Melancholy ने ग्रस्त होते. चुकून धक्का लागून तुटण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या वस्त्रांमध्ये लोखंडी सळ्या लावून घेतल्या होत्या.
4. Nostalgia (भूतकाळाची तीव्र आठवण होणे)
ही भावना आपल्याला माहिती आहे, असं तुम्हाला वाटेल.
डॉ. चॅनी सांगतात, "एकमेकांशी संवाद साधताना हा शब्द आपण अगदी सहज आणि सर्रास वापरतो. मात्र ज्यावेळी हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला, तेव्हा त्याचा अर्थ होता विशिष्ट प्रकारची शारीरिक व्याधी.
"अठराव्या शतकातल्या खलाशांना हा आजार व्हायचा. घरापासून खूप लांब गेल्यावर घरी जाण्याची अतिव ओढ लागायची तेव्हा त्याला नॉस्टॅलजिया म्हटलं जायचं."
आता या भावनेची लक्षणं दिसत नाहीत. मात्र अठराव्या शतकात नॉस्टॅलजियाची शारीरिक लक्षणं दिसायची, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
नॉस्टॅलजिक खलाशी थकलेला, आळशी असायचा. त्याला अज्ञात वेदना व्हायच्या आणि या सर्व लक्षणांमुळे त्याच्या कामावर परिणाम व्हायचा. नॉस्टॅलजियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये तर खलाशाचा मृत्यूदेखील व्हायचा. आजच्या आधुनिक काळात आपल्या भूतकाळाविषयी वाटणाऱ्या ओढीशी त्या काळातल्या नॉस्टॅलजियाशी तुलना होऊच शकत नाही.
5. Shell Shock (जोरदार धक्का बसणे)
अनेकांनी शेल शॉक हा शब्द ऐकला असेल. पहिल्या महायुद्धात खंदकातल्या सैनिकांना या अवस्थेने ग्रासलं होतं. इतिहासातल्या इतर अनेक भावनांप्रमाणेच शेल शॉकविषयी ज्या पद्धतीने बोललं जायचं किंवा त्यावर उपचार केले जायचे, त्यामुळे भावना आणि आजार यांच्यात एक रेष ओढली गेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
"शेल शॉकग्रस्त लोकांकडे बघून त्यांना काही शारीरिक त्रास असेल, असं जाणवणार नाही. मात्र अशा लोकांना अचानक झटका यायचा आणि त्यांची बघण्याची आणि ऐकण्याची क्षमताच संपायची," डॉ. चॅनी सांगतात. "युद्धाच्या सुरुवातीला असा समज होता की स्फोटाच्या जवळ असल्याने त्या आवाजामुळे मेंदूला धक्का बसून ही लक्षणं दिसत असावी. मात्र नंतर हे मानलं गेलं की रुग्णाला आलेले अनुभव आणि त्यावेळी त्याची असलेली मनोदशा यामुळे ही लक्षणं दिसतात."
6. Hypochondriasis (हायपोकाँड्रियासिस)
Hypochondriasis हादेखील एक आजारच मानला जायचा. मात्र एकोणीसाव्या शतकात ही शुद्ध भावना आहे, यावर शिक्कामोर्तब झालं.
"या आजारामुळे थकवा येतो, वेदना होतात आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात, असं मानलं जाई. सतराव्या आणि अठराव्या शतकात (डाव्या फुफ्फुसाच्या खाली असलेल्या) प्लिहामुळे हा आजार होत असावा, असा समज होता. मात्र, नंतर तो दोष मज्जातंतूंवर ढकलण्यात आला."

फोटो स्रोत, Getty Images
हायपोकाँड्रियासिसग्रस्त व्यक्तीला कुठलीही लक्षणं नसताना आपल्याला काहीतरी गंभीर आजार झाला आहे, असं वाटतं.
शरीराची अतिरेकी काळजी वाटल्यामुळे किंवा हायपोकाँड्रियासिस या आजारामुळे काही विशिष्ट लक्षणं दिसत असल्याचा लोकांचा समज होता. मात्र वास्तविक तो मन आणि भावनांचा खेळ असतो.
7. Moral Insanity (मानसिक वेड)
1835 साली डॉ. जेम्स कॉवेल्स प्रिचर्ड यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. डॉ. चॅनी सांगतात. "त्यातून होणारा परिणाम बघता याचा खरा अर्थ 'भावनिक आजार' एवढाच आहे, कारण दीर्घकाळापर्यंत moral या शब्दाचा अर्थ 'मानसिक', 'भावनिक' असा होता. शिवाय आता आपण ज्या अर्थाने (नैतिक) Moral हा शब्द वापरतो तो देखील होता. त्यामुळे संभ्रम होता."
डॉ. प्रिचर्ड यांनी ज्या रुग्णांना 'morally insane' म्हटले त्यांना मानसिक आजाराची कुठलीच लक्षणं नसतानादेखील ते विचित्र वागायचे. डॉ. चॅनी सांगतात, "त्यांना वाटायचं असे अनेक रुग्ण आहेत जे इतर व्यक्तींप्रमाणेच सामान्य आहेत. मात्र त्यांचं त्यांच्या भावनांवर नियंत्रण राहत नाही किंवा त्यांच्या हातून अनपेक्षितपणे गुन्हा घडतो."

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, सुशिक्षित समाजातल्या स्त्रियांमध्ये असलेला क्लेप्टोमेनिया (चोरी करण्याची अनावर इच्छा) हा आजार. यात चोरी करणाऱ्या स्त्रीला हे समजत असतं की तिला चोरी करण्याचं काहीच कारण नाही. तरीही ती चोरी करते. हा क्लेप्टोमेनिया 'मोरल इनसेन'चं लक्षण मानलं जाऊ शकतं. "एकूणात सर्व टोकाच्या भावनांचा तो संग्रह म्हणता येईल आणि सहसा सतत रडणाऱ्या बाळाशी (Difficult Child) त्याची तुलना होते."

भावना या विषयाला वाहिलेल्या 2019 च्या Free Thinking Festivalमध्ये डॉ सारा चॅनी यांनी भावनांविषयी अधिकाधिका माहिती व्हावी, यासाठी त्यांची हरवलेल्या भावनांची मशीन आणली होती. या वर्षीच्या उत्सवातल्या सर्व चर्चा ऐकण्यासाठी Free Thinking Festival Website ब्राऊस करा.
आणि लंडनमधल्या क्वीन मेरी विद्यापीठातल्या History of the Emotions या केंद्रातल्या भावनांच्या प्रयोगशाळेला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला तुम्ही कुठली भावना गमावल्यासारखं वाटतं का?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








