You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'विवाहाआधी महिलांना कौमार्य जाहीर करणं बंधनकारक नाही'
बांगलादेशातल्या महिलांना आता विवाह नोंदणी फॉर्मवर व्हर्जिनिटीबद्दल उल्लेख करणं बंधनकारक नसेल. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानंच तसं स्पष्ट केलंय.
याआधी बांगलादेशात विवाह नोंदणी फॉर्मवर महिलांना 'कुमारी' म्हणजेच 'व्हर्जिन' आहोत की नाही, ते सांगावं लागत होतं. मात्र, आता 'कुमारी' शब्द काढून टाकण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय.
'कुमारी' शब्दाऐवजी आता 'ओबीबाहिता' हा बंगाली शब्द विवाह नोंदणी फॉर्मवर वापरला जाणार आहे. ओबीबाहिता' शब्दाचा अर्थ 'अविवाहित' असा होता.
मात्र, याच फॉर्मवरील 'विधवा' आणि 'घटस्फोटित' हे दोन शब्द कायम राहतील.
'कुमारी' शब्द अपमानकारक असल्याचा आरोप बांगलादेशातील महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. न्यायालयानं हा शब्द काढून टाकल्यानं या कार्यकर्त्यांनी निर्णयाचं स्वागत केलंय.
बांगलादेशातील विवाहविषयक कायदे हे बंधनं आणणारे आणि भेदभावपूर्ण आहेत, अशी टीका स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या गटांनी केलीय.
लहान वयातच मुलींचं लग्न लावून देण्याचं प्रमाण बांगलादेशात जास्त आहे. तेही मुलींच्या इच्छेने नव्हे, तर आई-वडीलच त्यांचा जोडीदार ठरवतात.
कोर्टानं नव्या आदेशात काय म्हटलंय?
'कुमारी' हा बंगाली शब्द विवाह नोंदणी फॉर्मवरून काढून टाकावा, असं बांगलदेशच्या न्यायालयानं म्हटलंय. लग्न झालेलं नाही, अशा अर्थासाठी हा शब्द फॉर्ममध्ये होता, मात्र याचा अर्थ 'व्हर्जिन आहात की नाही' असाही निघत होता.
विवाह नोंदणी फॉर्मवरून 'कुमारी' शब्द काढून टाकण्यासाठी 2014 साली न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकाकर्त्याच्या वकिलानं यशस्वी युक्तीवाद केला. हा शब्द म्हणजे महिलांसाठी अपमानकारक आणि महिलांचं खासगी आयुष्याला धोका पोहोचवणारा आहे, असं न्यायालयाला सांगितलं होतं.
'कुमारी' शब्दाऐवजी आता 'ओबीबाहिता' हा बंगाली शब्द विवाह नोंदणी फॉर्मवर वापरला जाणार आहे. 'ओबीबाहिता' शब्दाचा अर्थ 'अविवाहित' असा होतो. त्याचवेळी, न्यायालयानं पुरुषांनाही ते अविवाहित, घटस्फोटित की विधूर आहेत, हे विवाह नोंदणी अर्जावर उल्लेख करण्यास सांगितलंय.
येत्या काही महिन्यात हा निर्णय बांगलादेशमध्ये लागू होईल.
बांगलादेशात न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया काय उमटल्या?
"हा एक ऐतिहासिक निर्णय आहे" असं याच खटल्यातील वकील असणाऱ्या अन्युन नहार सिद्दिका म्हणाल्या. बांगलादेशातील महिलांच्या हक्कांना आणखी बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.
बांगलादेशातील विवाह नोंदणी कार्यालयातील अधिकारी म्हणाले, आम्ही आता विवाह नोंदणी फॉर्मवर बदलाच्या अधिकृत आदेशाची वाट पाहत आहोत.
"मी आतापर्यंत अनेकांच्या लग्नांची नोंदणी केलीय. मला अनेकदा विचारलं गेलंय की, पुरूषांना व्हर्जिनिटी लपवण्याचं स्वातंत्र्य असतं, मग महिलांन का नाही? पण ते माझ्या हातात नव्हतं, असंच नेहमी सांगायचो. पण आता असे प्रश्न मला विचारले जाणार नाहीत, अशी आशा आहे," असं विवाह नोंदणी कार्यालयातील अधिकारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)