बापाचा खून करणाऱ्या 3 बहिणींच्या सुटकेसाठी 3 लाख लोकांचे अर्ज

    • Author, नीना नाझारोव्हा
    • Role, बीबीसी रशियन सेवा

2018 सालच्या जुलै महिन्यात रशियाची राजधानी मॉस्को शहरात किशोरवयीन असलेल्या तीन बहिणींनी झोपेत असलेल्या आपल्या वडिलांवर चाकूने वार करून त्यांना ठार केलं.

हा बाप आपल्या मुलांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा, असं तपासात निष्पन्न झालं आहे.

या तिन्ही बहिणींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि बघता बघता हे प्रकरण रशियाभर वाऱ्यासारखं पसरलं.

सख्ख्या बापाकडूनच अत्याचाराला बळी पडलेल्या या तिन्ही बहिणींप्रती रशियामध्ये सहानुभूतीचा लाट आली आहे. त्यामुळेच या बहिणींच्या सुटकेसाठी जवळपास तीन लाख रशियन नागरिकांनी स्वाक्षरी केलेली याचिका दाखल करण्यात आली आहे.

वडिलांचं काय झालं?

27 जुलै 2018च्या संध्याकाळी 57 वर्षांच्या मिखाईल खाचातुरीयन यांनी क्रेस्टिना, अँजेलिना आणि मारिया या आपल्या तिन्ही मुलींना एकानंतर एक असं आपल्या खोलीत बोलावलं. त्यावेळी त्या तिघीही अल्पवयीन होत्या. घर स्वच्छ केलं नाही म्हणून ते तिघींवर खूप ओरडले.

त्यानंतर वडिलांना झोप लागल्यावर या तिन्ही बहिणींनी त्यांच्यावर चाकू, हातोडीने वार करून त्यानंतर पेपर स्प्रे मारला. यात त्यांच्या डोक्याला, मानेला आणि छातीला जबर मार बसला. त्यांच्या शरीरावर चाकूचे 30 वार होते.

तिघींपैकी सर्वांत धाकटीने पोलिसांना फोन केला आणि तिघींनाही अटक झाली.

पोलीस तपास सुरू झाला आणि या कुटुंबात मुलींचा किती छळ सुरू होता, हे उजेडात आलं. गेल्या तीन वर्षांपासून मिखाईल या तिघींना मारझोड करत होते. त्यांना कैद्यांसारखं ठेवायचे. इतकंच नाही तर त्यांचं लैंगिक शोषणही करायचे.

कौटुंबिक हिंसाचार

या प्रकरणाला रशियात मोठी प्रसिद्धी मिळाली. या तिन्ही बहिणींना त्यांच्या जन्मदात्या पित्याकडून कुठल्याच प्रकारचं संरक्षण मिळालं नाही आणि त्यामुळे या तिन्ही बहिणी गुन्हेगार नसून पीडित आहेत, असं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मात्र, रशियामध्ये कौटुंबिक हिसाचाराला बळी पडलेल्या पीडितांसाठीचा कायदा नाही.

2017 साली कायद्यात सुधारणा करण्यात आल्या होत्या. या सुधारणेनुसार घरातल्या एखाद्या सदस्याला घरातल्याच सदस्याने पहिल्यांदाच सौम्य स्वरुपाची मारहाण केल्यास, अशी मारहाण जी जबर नसेल आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नसेल तर त्याला दंड किंवा दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली.

रशियामध्ये कौटुंबिक हिंसाचाराकडे पोलीस सहसा कुटुंबाची अंतर्गत बाब या दृष्टीकोनातूनच बघतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांची अगदी नगण्य मदत मिळते.

या मुलींच्या आईलाही त्यांच्या वडिलांनी बरेचदा मारहाण केली होती आणि तीदेखील मदतीसाठी पोलिसांकडे गेली होती. इतकंच नाही तर मिखाईलच्या स्वभावाचा त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्रास व्हायचा. मात्र, यापैकी कुठल्याही तक्रारीची पोलिसांची दखल घेतल्याची नोंद नाही.

ज्यावेळी वडीलांचा खून झाला त्यावेळी मुलींची आई त्यांच्यासोबत राहत नव्हती. मिखाईलने आपल्या मुलींना त्यांच्या आईशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यापासून रोखलं होतं.

या मुलींची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यात कळलं की या मुली एकट्या होत्या आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTSD) म्हणजेच तणावाखाली होत्या.

तपासादरम्यान काय घडलं?

खाचातुरीयन बहिणींचं हे प्रकरण खूप हळूहळू पुढे सरकलं. त्या सध्या कोठडीत नाहीत. मात्र, त्यांच्यावर निर्बंध आहेत. त्या पत्रकारांशी बोलू शकत नाहीत. शिवाय त्यांना एकमेकींशींही बोलायलाही परवानगी नाही.

हा खून वडिल झोपेत असताना करण्यात आला. त्यामुळे हा विचारपूर्वक करण्यात आलेला खून असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे.

या बहिणींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 20 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अँजेलिनाने हातोडी वापरली, मारियाने चाकूने वार केले तर क्रेस्टिनाने पेपर स्प्रे मारला, असा आरोप आहे.

मात्र, हा खून स्वसंरक्षणासाठी करण्यात आल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे. रशियन कायद्यानुसार हल्ल्यापासून तात्काळ बचावासाठी किंवा सातत्याने होत असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या स्वसंरक्षणाला मान्यता आहे.

उदाहरणार्थ एखाद्याला बंदी बनवून त्याचा सतत छळ केल्यास अशा प्रसंगी केलेल्या हल्ल्याला स्वसंरक्षणासाठी केलेला हल्ला म्हणून ग्राह्य धरलं जातं.

या बहिणी 'continuous crime' म्हणजेच सातत्याने करण्यात येणाऱ्या गुन्ह्याच्या पीडित आहेत आणि म्हणून त्यांची सुटका करावी, असं बचाव पक्षाचं म्हणणं आहे.

मिखाईल 2014 पासून आपल्या मुलींचा अनन्वित छळ करायचे हे तपासातच स्पष्ट झाल्याने हा खटला रद्द होईल, अशी बचाव पक्षाच्या वकिलांची आशा आहे.

या प्रकरणानंतर रशियात कौटुंबिक हिंसाचार या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. कायद्यात बदल करून शासकीय निधीतून चालणारी शेल्टर होम्स, आक्रमक वर्तनाला आवर घालण्यासाठीचे मानसोपचाराचे अभ्यासक्रम यासारख्या काही उपाययोजना कराव्या, अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी केली आहे.

कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती किती मोठी?

रशियात किती महिला घरगुती हिंसाचाराला बळी पडतात, याची निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, प्रत्येक चार कुटुंबापैकी एका कुटुंबातल्या स्त्रिला अशा अत्याचाराला सामोरं जावं लागतं, असं मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं म्हणणं आहे.

रशियातलं कौटुंबिक हिंसाचाराचं आणखी एक हादरवून टाकणारं प्रकरण होतं मार्गारिटा ग्राचेव्हा यांचं. त्यांच्या नवऱ्याने केवळ ईर्षेपोटी त्यांचे दोन्ही हात कुऱ्हाडीने कापून टाकले होते.

तज्ज्ञांच्या मते रशियातल्या तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या 80% महिलांनी घरातल्या व्यक्तीकडून होणाऱ्या छळापासून स्वसंरक्षण म्हणून हत्या केली आहे.

एकीकडे या बहिणींना मोठा जनाधार मिळत असला तरी रशियातल्या काही पुराणमतवादी कुटुंबातून टीकाही होत आहे.

रशियात एक संघटना आहे 'Men's State'. 'पितृसत्ता' आणि 'राष्ट्रवाद' ही आपली दोन प्रमुख मुल्ये असल्याचं ते सांगतात. या संघटनेचे सोशल मीडियावर जवळपास 1 लाख 50 हजार सदस्य आहेत. या संघटनेने या बहिणींची सुटका होऊ नये, या मागणीसाठी 'Murderers behind Bars' या नावाने मोहीम उघडली आहे.

या बहिणींच्या सुटकेसाठी change.org संघटनेने याचिका दाखल केली आहे. शिवाय, अनेक ठिकाणी कविता वाचन, रॅली, नाटकांचं सादरीकरण यासारखे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

मॉस्कोमधल्या स्त्रिवादी चळवळीच्या कार्यकर्त्या डॅरिया सेरेन्को यांनी या बहिणींना पाठिंबा दर्शवण्यासाठी जून महिन्यात तीन दिवसीय रॅलीचं आयोजन केलं होतं. त्या म्हणतात की सार्वजनिक आयोजनांमागचा मुख्य उद्देश या प्रकरणाला बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळावी आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळावी, हा आहे.

त्या म्हणतात, "कौटुंबिक हिंसाचार हे रशियातलं वास्तव आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. मात्र, आपण स्वतः या अत्याचाराला बळी पडलो नसलो तरीदेखील याचा सर्वांच्याच आयुष्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)