You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये येणाऱ्या काश्मीरबाबतच्या बातम्यांमागचं सत्य - फॅक्ट चेक
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री अली हैदर जैदी यांनी पोलीस लाठीमाराचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडियो भारत प्रशासित काश्मीरचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडियो पोस्ट केला आहे आणि हा व्हिडियो आतापर्यंत दोन लाखांहून जास्त लोकांनी बघितला आहे.
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये ते लिहितात, "नरेंद्र मोदी सरकार काश्मीरमध्ये काय करत आहे, हे जगाने बघावं. उशीर होण्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले पाहिजेत."
बीबीसीच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की हा व्हिडियो काश्मीरमधला नाही तर हरियाणातल्या पंचकुला भागातला आहे.
रिव्हर्स इमेज सर्चमध्ये हा व्हिडियो 25 ऑगस्ट 2017 चा असल्याचं कळलं. 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहिम बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हिंसक आंदोलन केलं, त्यावेळचा हा व्हिडियो आहे.
जुन्या बातम्यांनुसार या हिंसक आंदोलनादरम्यान 30हून अधिक जण ठार झाले होते आणि राज्यात पोलिसांनी 2500हून जास्त लोकांना ताब्यात घेतलं होतं.
मात्र, जैदी यांनी हा व्हिडियो चुकीच्या संदर्भासह पोस्ट केल्याने पाकिस्तानातल्या अनेक मोठ्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये हा व्हिडियो शेअर होतोय.
असे अनेक व्हिडियो
पाकिस्तानातले केंद्रीय मंत्री अली हैदर जैदी यांनी काश्मीरमध्ये तणावाच्या परिस्थितीदरम्यान अशा पद्धतीने जुना व्हिडियो चुकीच्या संदर्भात पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाच्या काही दिवसांतच त्यांनी असाच एक व्हिडियो ट्वीट केला होता. तो व्हिडियो आजवर सव्वा दोन लाख लोकांनी बघितला आहे आणि जवळपास चार हजार लोकांनी तो शेअर केला आहे.
#SaveKashmirFromModi या हॅशटॅगसह जैदी लिहितात, "भारताच्या ताब्यातल्या काश्मिरात लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून 35-A रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केला."
मात्र, हा व्हिडियोसुद्धा 3 वर्षं जुना आहे. 'Revoshot' नावाच्या एका यू-ट्युबरने 18 ऑक्टोबर 2016 रोजी हा व्हीडिओ पोस्ट केला होता.
जैदी यांच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिडियो हिजबुल मुजाहिद्दीनचा एक कमांडर बुरहान वाणीच्या अंत्ययात्रेचा आहे. 24 वर्षीय बुरहान वाणी हिजबुल मुजाहिद्दीनचा पहिला कमांडर होता ज्याने स्वतःचे आणि आपल्या साथीदारांचे हत्यार घेतलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते.
भारत प्रशासित काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या एका मोठ्या चकमकीत बुरहान वाणी ठार झाला होता. 9 जुलै 2016 रोजी वाणी ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
'काश्मीरमध्ये कत्ल-ए-आम' हा दावा खोटा
पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचे माजी डीजी हमीद गुल यांचा मुलगा अब्दुल्लाह गुलने एक व्हिडियो ट्वीट केला आहे. या व्हिडियोत काही लोक जखमींची मदत करताना दिसतात.
या व्हिडियोसोबत त्यांनी लिहिलं आहे, "काश्मीरमध्ये कत्ल-ए-आम सुरू झाला आहे. हा व्हिडियो मला एका काश्मिरी बहिणीने पाठवला आहे. आम्ही काश्मीरमधल्या लोकांना राजनयिक, नैतिक आणि राजकीय मदत करत आहोत."
गुल यांनी 25 सेकंदांचा जो व्हिडियो शेअर केला आहे तो 60 हजारांहून जास्तवेळा बघण्यात आला आहे. शिवाय 2000 लोकांनी तो व्हिडियो शेअर केला आहे.
बीबीसीच्या पडताळणीत आढळलं की 'काश्मीर न्यूज' नावाच्या एका यू-ट्युबरने 21 ऑक्टोबर 2018 रोजी हा व्हीडिओ भारत प्रशासित काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्याचा असल्याचं म्हणत पोस्ट केला होता.
या व्हिडियोविषयी आम्ही इंटरनेटवर सर्च केलं. त्यावेळी आम्हाला 'ग्रेटर काश्मीर' नावाच्या वेबसाईटचा लेख सापडला. हा लेख 22 ऑक्टोबर 2018 रोजी पोस्ट करण्यात आला होता.
या लेखानुसार दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात 20-21 ऑक्टोबरच्या रात्री एक मोठी चकमक झाली. यात सात सामान्य नागरिकही ठार झाले होते.
व्हायरल व्हिडियोत याच सात सामान्य नागरिकांचे मृतदेह गावातून बाहेर घेऊन जाताना दिसत आहेत.
कुलगाममधला हा व्हिडियो जवळपास वर्षभरानंतर आता पाकिस्तानात व्हायरल होत आहे. हा व्हिडियो काश्मीर खोऱ्यातल्या सद्यपरिस्थितीशी जोडून शेअर केला जातोय.
'मानवी ढाल' बनवण्याची कहाणी
पाकिस्तानातल्या अनेक मोठ्या फेसबुक ग्रुपवर एक व्हीडिओ काश्मीरमधला असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. हा व्हिडियो पाकिस्तानातले एक प्रसिद्ध पत्रकार हामीद मीर यांनीही शेअर केला आहे.
ते लिहितात, "हा जम्मू-काश्मीरमधला लेटेस्ट (16 ऑगस्टचा) व्हिडियो आहे. श्रीनगरजवळ भारतीय सैन्याने दगडफेकीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी 4 काश्मिरी तरुणांना मानवी ढाल बनवलं."
या व्हिडियोत जवानांच्यामधे बसलेले चार तरुण दिसतात. दुसरीकडे उभे असलेले काही लोक यांच्याविषयी बोलताना दिसतात की भारतीय जवानांनी दगडफेक रोखण्यासाठी त्यांच्या साथीदारांना आपल्या कारसमोर बसवलं.
रिव्हर्स सर्चमध्ये हा व्हिडियोदेखील वर्षभर जुना असल्याचं कळतं. जम्मू-काश्मीरमधल्या सद्यस्थितीशी या व्हिडियोचा संबंध नाही.
काश्मीरमधून चालणाऱ्या 'काश्मीर वाला' आणि 'काश्मीर रीडर' या व्यतिरिक्त मुख्य प्रवाहातल्या काही न्यूज वेबसाईट्सने या घटनेवर बातमी केली होती.
या बातम्यांनुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या सांबोरा गावात 18 जून 2019 रोजी ही घटना घडली होती. या घटनेबाबत सामान्य लोकांचं म्हणणं होतं की सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दलांनी चार तरुणांचा मानवी ढाल म्हणून वापर केला होता. मात्र, या चौघांना अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नव्हती, असं स्थानिक पोलिसांचं म्हणणं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)