इम्रान खान : भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड टीका केली.

मोदींच्या या निर्णयाची तुलना त्यांनी हिटलरने नाझींसाठी सांगितलेल्या 'फायनल सोल्युशन'शी केली. कलम 370 रद्द करून मोदींनी आपली शेवटची खेळी खेळल्याचंही ते म्हणाले.

भारत, पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत युद्ध झाल्यास पाकिस्तानही सज्ज असल्याचं आव्हान त्यांनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा थेट उल्लेख करत ते म्हणाले, "आपकी ईंट का जवाब पत्थर से देंगे."

यंदा पाकिस्तान त्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 14 ऑगस्ट हा दिवस 'काश्मीर एकता दिन' म्हणून साजरा करणार आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करणे आणि या राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी पाकिस्तान प्रशासित काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादला भेट दिली.

पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे राष्ट्रपती सरदार मसूद खान आणि पंतप्रधान राजा फारूख हैदर यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.

इम्रान खान पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या विधानसभेला संबोधित करताना म्हणाले, "नरेंद्र मोदी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिटलरच्या नाझी पार्टीकडून प्रेरित आहे. ते वंश श्रेष्ठत्व मानतात आणि त्यांच्या मते हिंदू श्रेष्ठ आहेत. त्यांना वाटायचं की मुस्लिमांनी आपल्यावर राज्य केलं आहे. आता त्यांचा सूड उगारण्याची वेळ आली आहे."

इम्रान खान म्हणाले की ही विचारसरणी केवळ मुस्लिमांचा द्वेष करत नाही तर ख्रिश्चनांचाही द्वेष करते. मुस्लिमांनी आपल्यावर 600 वर्षं राज्य केलं नसतं तर आज आपला देश सर्वोत्तम असता, असं विष आरएसएसने हिंदूंच्या मनात कालवलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना इम्रान खान म्हणाले, "याच विचारसरणीने महात्मा गांधींची हत्या केली. पुढे याच विचारसरणीने मुस्लिमांचा नरसंहार केला."

"गेल्या पाच वर्षांत काश्मीरमध्ये जे अत्याचार झाले ते याच विचारसरणीमुळे झाले. नरेंद्र मोदींनी जी खेळी खेळली आहे ती त्याची शेवटची खेळी आहे. हे फायनल सोल्युशन आहे. हिटलरनेही नाझींसाठी फायनल सोल्युशन दिलं होतं."

"मोदींनी राजकीय घोडचूक (ब्लंडर) केली आहे. हे मोदी आणि भाजपला जड जाईल. कारण काश्मीरचं सर्वात आधी आंतरराष्ट्रीयीकरण त्यांनी केलं आहे."

इम्रान खान म्हणाले, "आधी काश्मीरविषयी चर्चा करणं कठीण होतं. आता जगाचं लक्ष काश्मीरकडे आहे. आपण हा मुद्दा आंतरराष्ट्रीय कसा बनवतो, त्याकडे लागलं आहे. मी तुमच्या संसदेत काश्मीरचा आवाज जगात बुलंद करणारा राजदूत बनण्याची जबाबदारी स्वीकारतो."

इम्रान खान आणखी काय म्हणाले, वाचा..'भारताला विनाशाकडे ढकलले'

  • इतिहासाकडे बघितलं तर जगभरात आजारी मेंदू आणि असभ्य लोकांनी नरसंहार घडवला आहे. लोकांना कल्पनाच नाही की ही तशीच विचारसरणी आहे. जगभरातले लोक मानतात की हा कर्म आणि निर्वाण मानणारा देश आहे. ते आम्हाला दहशतवाद पसरवणारे म्हणायचे. मात्र, भारताला सहिष्णु मानलं जायचं. मात्र, या विचारसरणीमुळे सर्वात जास्त नुकसान भारताचंच होईल. यांनी भारताची राज्यघटनाच रद्द केली.
  • 370 आमची अंतर्गत बाब नव्हतीच. ते जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात गेले. राष्ट्राचा विनाश युद्धामुळे नव्हे तर कायद्याचं राज्य संपल्यानं होतो. तिथले न्यायाधीश घाबरले आहेत. मीडिया नियंत्रणात ठेवला आहे. विरोधकांची भाषणं ऐकली तर वाटतं भीतीच्या छायेत ते भाषणं देताहेत.
  • नाझी जर्मनीत असंच व्हायचं. त्यांच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्यांना गद्दार म्हटलं जायचं. त्यांना ठार केलं जायचं किंवा हुसकावून लावलं जायचं. भारतातही मुस्लीम काही बोलले तर त्यांच्यावर पाकिस्तानात निघून जा, अशी शेरेबाजी केली जाते. बुद्धीजिवीदेखील घाबरले आहेत.
  • हे भारताला विनाशाकडे नेत आहे. भारतात 18 ते 19 कोटी मुस्लीम आहेत. ही संख्या थोडीथोडकी नाही. त्यांना अशी वागणूक मिळाली, त्यांना धमकावलं, त्यांचे अधिकार हिरावून घेतले, तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया येणारच. इंग्लंडचं उदाहरण घेतल्यास मॅन्चेस्टर आणि बर्मिंगहॅममध्ये ज्या लोकांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला ते कट्टरतावादी झाले. भारतातही असंच घडतंय.

'भारतीय मुस्लिमांना पश्चाताप होतोय'

  • भारतात क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा श्रीमंत घरातले मुस्लीम म्हणायचे द्विराष्ट्र सिद्धांत योग्य नाही. मात्र, आज सगळेच म्हणताहेत की जिन्ना बरोबर होते. काश्मीरातले भारत समर्थक नेतेही आज असंच म्हणताहेत. मी फारूख अब्दुल्लांचं म्हणणं ऐकलंय.
  • आरएसएसचं जे भूत बाटलीतून बाहेर आलं आहे, ते परत जाणार नाही. ते पुढेच जाणार आहे. यानंतर शीखांवर संकट ओढावेल. दलितांवर ओढावेल. ख्रिश्चनांवर तर आधीच ओढावलं आहे आणि मुस्लिमांनासुद्धा लक्ष करण्यात येतंय.
  • द्वेषाने भरलेला हा दृष्टीकोन काश्मीरपुरता नाही. तो पाकिस्तानच्या दिशेने येणार आहे. पुलवामानंतर केली होती, तशी एखादी मोठी कारवाई स्वतंत्र काश्मीरमध्ये करण्याची त्यांची योजना असल्याची माहिती मिळतेय. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची दोनवेळा बैठकही झाली आहे.

'ईंट का जवाब पत्थर से'

  • यावेळी भारताने अधिक घातक योजना आखली आहे. काश्मीरमध्ये जे काही घडतंय त्यावरून लक्ष वळवण्यासाठी स्वतंत्र काश्मीरमध्ये कारवाई करणार आहेत. यासाठी मी आज इथून मोदींना सांगू इच्छितो - तुम्ही कारवाई करा. हम ईंट का जवाब पत्थर से देंगे.
  • पाकिस्तानच्या सैन्याला युद्धाचा गाढा अनुभव आहे. 20 वर्षांपासून ते शहिदांचे पार्थिव उचलत आहेत. पाकिस्तानचं सैन्य आणि नागरिकही सज्ज आहेत. सैन्यासोबत जनताही लढेल. पुन्हा एकदा मोदीला सांगू इच्छितो - तुम्ही कराल तर आम्हीही सामना करू. शेवटपर्यंत लढू. आम्ही अल्लाव्यतिरिक्त इतर कुणाच्याही पुढे वाकत नाही.

मोदींची हिटलरशी तुलना

  • मोदीने आपल्या भाषणात म्हटलं - 370 रद्द करून काश्मीरमध्ये समृद्धी आणू. हिटलरने रशियावर हल्ला करतेवेळी म्हटलं होतं - मी तुम्हाला साम्यवादापासून मुक्ती देतोय. थोडी माणसंही संघटित झाली आणि त्यांचा दृष्टीकोन एक असेल तर ते संपूर्ण समाजावर राज्य करू शकतात, हे आरएसएसने नाझी पार्टीकडून शिकून घेतलं आहे.
  • भाजप भारतात जे काही करतेय तेच नाझी पक्षानेही केलं होतं. एखाद्या समाजावर जेव्हा विनाश ओढावतो तेव्हा त्याच्या नेत्याच्या डोक्यात घमेंड चढते. हेच हिटलरबाबतीत घडलं होतं.

युद्धासाठी पाकिस्तान सज्ज

युद्ध हा कोणत्याच समस्येवर उपाय नाही. युद्धाद्वारे एखादी समस्या मिटवण्याचा प्रयत्न केल्यास आणखी तीन नव्या समस्या निर्माण होतात. मात्र, हे नरेंद्र मोदीचं मिसकॅलक्युलेशन आहे.

पाकिस्तान पूर्णतः सज्ज आहे. त्यांनी उल्लंघन केल्यास आणि तशी त्यांनी तयारीही केली आहे तर आम्हीदेखील सज्ज आहोत, हा आमचा निर्णय पक्का आहे. मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की त्यानंतर जे युद्ध होईल, त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)