You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाँगकाँग आंदोलन : जेव्हा मेट्रो स्टेशनमध्ये निदर्शक आणि पोलिसात धुमश्चक्री होते...
हाँगकाँगमध्ये पोलीस आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री पाहायला मिळाली आहे. हाँगकाँगमध्ये जवळपास 10 आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे.
रविवारी (11 ऑगस्ट) रात्री पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधुराचा मारा केला. त्याचप्रमाणे एका रेल्वे स्टेशनवरही निदर्शक आणि पोलिसांमध्ये धुमश्च्रक्री झाली.
वान चाई जिल्ह्यात निदर्शनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तसंच पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. याला उत्तर म्हणून पोलिसांनी निदर्शकांवर लाठीचार्ज केला.
या धुमश्चक्रीत पोलिसांसहित अनेक जण जखमी झाले आहेत.
एका मेट्रो स्टेशनमध्ये पोलिस बंदोबस्तादरम्यान रबरच्या गोळ्या झाडत आहेत, तसंच इतर काही अधिकारी एस्कलेटरवर लोकांना लाठीनं मारहाण करत आहेत, असं चित्रित करण्यात आलंय.
वादग्रस्त प्रत्यापर्णाच्या विधेयकामुळे देशात 2 महिन्यांपासून निदर्शनं सुरू आहेत. दोन्ही बाजू भूमिकेवर ठाम असल्यानं हा वाद शांत होण्याची शक्यता कमी आहे.
या विधेयकामुळे हाँगकाँगमधल्या गुन्हेगारांचं चीनच्या मुख्य भूमीत प्रत्यार्पण करण्याची परवानगी मिळाली असती. सरकारनं आता हे विधेयक स्थगित केलं असलं तरी ते पूर्णपणे रद्द करावं, अशी निदर्शकांची मागणी आहे.
पोलिसांनी केलेल्या कठोर मारहाणीची स्वतंत्र चौकशी करावी आणि नेत्या कॅरी लाम यांनी राजीनामा द्यावा, या निदर्शकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
काय घडलं?
रविवारी दुपारी शहरातल्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये एका शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस बंदी असतानाही निदर्शकांनी पार्कमधून बाहेर पडत शहरातल्या मुख्य रस्त्यांवर ताबा घ्याययला सुरुवात केली, त्यानंतर पोलीस आणि निदर्शकांत वादाला सुरुवात झाली.
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू होता. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्यांचा वापर केला. तसंच त्सिम शा त्सुई जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गजबजलेल्या बाजारात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या निदर्शनादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. या फोटोतील महिलेला पोलिसांनी गोळ्या घातल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे महिलेच्या बराच रक्तस्त्राव झाला आहे.
"निदर्शकांनी एका नवीन युक्तीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस येण्यापूर्वीचं ते लहान गटात विभागले जातात आणि मग एकाहून अधिक भागात निदर्शनं करतात," बीबीसीचे स्टीफन मॅकडोनेलने यांनी सांगितलं.
क्वाई फोंगमधल्या मेट्रो स्थानकात अश्रूधुर फवारण्यात आला होता. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बंदिस्त मेट्रो स्थानकात अश्रूधुराचा प्रथमच हल्ला केला होता, अशी बातमी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली होती.
निदर्शकांना अटक करण्यासाठी पोलीस स्वत: निदर्शकांच्या वेशभूषेत आले होते, असंही स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे पोलिसांवर दोन पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले आणि यात एक पोलीस अधिकारी होरपळला आहे.
रविवारी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शांतता दिसून आली आणि तिथं कोणत्याही निदर्शनांची किंवा अटकेची बातमी नाही.
हाँगकाँगमध्ये निदर्शनं का?
हाँगकाँगमधल्या गुन्हेगारांचं चीनच्या मुख्य भूमीत प्रत्यार्पण करता यावं, यासाठीचं विधेयक हाँगकाँग सरकारनं आणलं होतं. ते पूर्णपणे रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी लाखो लोक गेले काही दिवस हाँगकाँगमध्ये निदर्शन करत आहे.
हे विधेयक मागे घेतल्यावरही हाँगकाँगमध्ये लाखो लोक अजूनही रस्त्यांवर आहेत.
हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी या विधेयकामुळे समाजात तणाव निर्माण झाल्याबद्दल माफी मागितली आहे. हाँगकाँगवर चीनचा प्रभाव वाढत चालल्याची भीती व्यक्त करत काही लोकांनी या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लाम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)