क्रिकेट: 'माऊंटन मॅन' रहकीम कॉर्नवाल टीम इंडियाला भारी पडणार का?

साडेसहा फूट उंची आणि वजन 140-वेटलिफ्टिंग किंवा कुस्तीपटूचं वर्णन वाटलं ना! पण हा तपशील आहे वेस्ट इंडिजचा 26वर्षीय क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवालचा. त्याला 'माऊंटन मॅन' असंही म्हटलं जातं. वेस्ट इंडिजने भारताविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. कॉर्नवालला या संघात संधी मिळाली आहे.

अंतिम संघात स्थान मिळाल्यास कॉर्नवाल पाच दिवस फिटनेस राखू शकेल का हे पाहणं रंजक ठरेल. संधी मिळाल्यास कॉर्नवाल सर्वाधिक वजनाचा क्रिकेटपटू ठरू शकतो.

2007 वर्ल्डकप स्पर्धेत बर्म्युडाचा संघ सहभागी झाला होता. भारताच्या रॉबिन उथप्पाचा अफलातून कॅच घेणारा ड्वेन लिव्हरॉक तुम्हाला आठवतोय का? लिव्हरॉकपेक्षा कॉर्नवालचं वजन जास्त आहे. कॉर्नवाल हा कॅरेबियन बेटसमूहापैकी लीवर्ड आयलंडचा. फिरकीपटू कॉर्नवालच्या नावावर फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये 55 मॅचेसमध्ये अडीचशेहून अधिक विकेट्स आहेत. प्रचंड ताकदीच्या बळावर पल्लेदार षटकार लगावण्यात कॉर्नवाल माहीर आहे.

तीन वर्षांपूर्वी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सराव सामन्यात रहकीमने दिमाखदार प्रदर्शन केलं होतं. दोन वर्षांपूर्वी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये कॉर्नवाल आणि कायरेन पोलार्ड यांच्यात बाचाबाची झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)