पाकिस्तान: क्लस्टर बाँब वापराचा भारतावर आरोप, काय आहे प्रकार?

भारताने सीमेवर गोळीबार केला असा आरोप पाकिस्ताने केला आहे. या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबद्दल ट्वीट केलं आहे.

शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं की भारतीय सैन्याने क्लस्टर बाँबचा उपयोग केला आहे. असं करणं जिनिव्हा करार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे. मी याचा निषेध करतो.

यापुढे कुरैशी यांनी ट्वीट केलं ज्यात लिहिलं होतं की भारत या भागातली शांतता भंग करत आहे आणि युद्धोन्माद पसरवत आहे. तसंच नियंत्रण रेषेवर मानवी अधिकारांचं उल्लंघनही करत आहे.

नियंत्रण रेषा तसंच भारत प्रशासित काश्मिरमध्ये काय चाललं आहे याची इतर देशांनी दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारताना आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लघंन केल्याचा आरोप केला आहे.

"कोणतंही हत्यार काश्मिरी लोकांच्या आपले अधिकार आणि आपली स्वायत्तता मिळवण्याच्या दृढ निश्चयाला दडपू शकत नाही. काश्मीर प्रत्येक पाकिस्तानाच्या रक्तात आहे. काश्मिरी लोकांचा स्वातंत्र्यलढा नक्कीच यशस्वी होईल."

भारतीय सैन्याने या आरोपांना फेटाळून लावलं आहे. सैन्याने म्हटलंय की पाकिस्तानी सैन्य कट्टरवाद्यांना भारतात घुसखोरी करायला तसंच हत्यारं पुरवून हल्ले करायल प्रवृत्त करत असतं.

भारतीय सैन्य कायम प्रत्युत्तरादाखल कारवाई करत असतं आणि आताची प्रत्युत्तरादाखल कारवाईही पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आणि त्यांची मदत मिळणाऱ्या कट्टरवादी घुसखोरांच्या विरोधात केली आहे.

पण क्लस्टर बाँब म्हणजे नक्की काय?

क्लस्टर बाँब म्हणजे असा बाँब जो फुटल्यानंतर ज्यातून अनेक छोटी छोटी स्फोटकं निघतात. ही स्फोटकं लक्ष्यासकट आसपासच्या इतर गोष्टींचं नुकसान करतात.

जिनिव्हा कराराअंतर्गत क्लस्टर बाँब वापरण्यावर बंदी आहे. पण अनेक देशांच्या सैन्यांनी युद्धात असे बाँब वापरलेत असे आरोप झाले आहेत.

क्लस्टर बाँब वापरले तर युद्धात सर्वसामान्य नागरिकांनाही दुखापत होऊ शकते. इतकंच नाही, तर अस बाँब फुटल्यानंतर बराच वेळ लहान लहान स्फोटकं आसपास पडत राहातात.

त्यामुळे जास्त जीवित तसंच वित्तहानी होण्याची शक्यता असते.

विरोधी सैन्याचं जास्तीत जास्ती नुकसान करण्यासाठी या बाँबचा वापर केला जातो. यांना लढाऊ विमानांमधून टाकलं जातं किंवा जमिनीवरून लाँच केलं जातं.

भारत पाकिस्तान करारात सहभागी नाही

सन 2008 साली डब्लिनमध्ये कन्व्हेंशन ऑन क्लस्टर म्यूनिशन नावाने एक आंतरराष्ट्रीय करार अस्तित्वात आला होता. या कराराअंतर्गत क्लस्टर बाँब बाळगायला, विकायला किंवा वापरायला बंदी आणण्याचा प्रस्ताव पारित केला होता.

3 डिसेंबर 2008 पासून या करारावर सह्या व्हायला सुरुवात झाली. सप्टेंबर 2018 पर्यंत 108 देशांनी यावर सह्या केल्या होत्या तर 106 देशांनी या करार मान्य करायला तत्त्वतः मान्यता दिली होती.

पण अनेक देशांनी या कराराला विरोध केला होता ज्यात रशिया, चीन, रशिया, इस्राईल, अमेरिका तसंच भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अजून या करारावर सही केलेली नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)