You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांच्या काश्मीर राग आळवण्यामागे असं आहे चीन कनेक्शन - दृष्टीकोन
- Author, प्रोफेसर मुक्तदर खान
- Role, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मध्यस्थी करावी असं आपल्याला सांगितल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्यावर म्हटलं होतं.
भारताने यावर आक्षेप घेऊन या प्रकरणात पाकिस्तानशिवाय कोणाशीही चर्चा करणार नाही, हे आपलं स्पष्ट धोरण असल्याचं सांगितलं.
त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ट्रंप यांनी भारत आणि पाकिस्तान तयार असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं उत्तर दिलं.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी केलेल्या चर्चेतही काश्मीर मुद्द्यावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच चर्चा होऊ शकते, असं स्पष्ट केलं होतं.
डोनाल्ड ट्रंप यांचे शब्द थोडे बदलले असले तरी त्यांची काश्मीर मुद्द्यावरील भूमिका कायम दिसून येते.
किंवा इम्रान यांच्या भेटीतल्या वक्तव्यानंतर अत्यंत कमी कालावधीत त्यांनी या विषयावर मत मांडलं असं म्हणता येईल.
डोनाल्ड ट्रंप जे बोलायचं असतं ते बोलून टाकतात. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सत्य आणि असत्य यांच्यामधील अंतर कमी झालं आहे. फॅंटसी आणि वस्तुस्थिती आणि काल्पनिक गोष्टी यांच्यामधला फरक संपला आहे.
ट्रंप यांची इच्छा
जगातील मोठ्या वादग्रस्त मुद्द्यांमधील युक्रेन आणि क्रायमियाला बाजूला केलं तर कोरिया द्वीपकल्पाचा प्रश्न, इस्रायल-पॅलेस्टाइन वाद आणि काश्मीर याच समस्या शिल्लक राहातात.
ट्रंप यांनी उत्तर कोरियाच्या नेत्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांचे जावई जेरेड क्रुशनर पॅलेस्टाइनमध्ये शांतता यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता उरतो तो फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेला काश्मीरचा मुद्दा.
या प्रश्नातसुद्धा ते लक्ष घालत आहेत. मला तर ते शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करत आहेत असं वाटतंय.
ऑक्टोबर 2017मध्ये अमेरिकेनं नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी जाहीर केली होती. त्यामध्ये भारताला विशेष महत्त्व दिलं होतं. यामध्ये भारताशी संबंध वाढवणे आणि इंडो-पॅसिफिक परिसरावर लक्ष देण्याचं नमूद करण्यात आलं होतं.
अमेरिका आणि भारत यांची राजकीय भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असं ट्रंप प्रशासनानं यामध्ये वारंवार नमूद केलं आहे. पण या कागदपत्रांमध्ये भारताला जितकं महत्त्व दिलं आहे त्या पातळीचं गांभीर्य ट्रंप यांच्या गेल्या काही आठवड्यातील वक्तव्यांतून दिसत नाही.
अशी स्थिती का तयार झाली?
ट्रंप पुन्हा एकदोनदा काश्मीर मुद्द्यावर काहीतरी बोलतील आणि भारत त्यांचं वक्तव्य पुन्हा नाकारेल असं दिसतं. 1948मध्येच भारतानं काश्मीर आपला अंतर्गत मुद्दा असून आपल्या अंतर्गत प्रकरणांमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं होतं. हे ट्रंप यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली असती तरी समजलं असतं.
काश्मीर प्रकरणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघेल असं भारताचं मत आहे. तसंच काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याला भारताचा तीव्र विरोध आहे.
काश्मीरमुळे 1948, 1965 आणि 1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन युद्धं झाली परंतु त्यावर तोडगा निघाला नाही.
व्यापारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. भारताला व्यापारामध्ये दिलेला विशेष दर्जा ट्रंप प्रशासनानं काढून घेतल्यानंतर हा तणाव सुरू झाला.
चीनचा संबंध काय?
भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये 150 ते 160 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. भारताकडून यामधील 100 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो तर अमेरिका भारतासाठी 50 ते 60 अब्ज डॉलर्सची निर्यात करते.
अमेरिकेकडून भारताचा ट्रेड बॅलन्स सकारात्मक राहातो तोही जवळपास 60 अब्ज डॉलर्सइतका. परंतु यामध्ये अमेरिकेला तोटा होतो. अमेरिकेनं भारतासाठी आयातशुल्क कमी केल्यामुळे आणि अमेरिकन मालावर भारत मात्र जास्त आयात शुल्क आकारत असल्यामुळे हे नुकसान होत असल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे.
तसंच भारत चीनला सूट देतो, पण अमेरिकेला देत नाही. इतकचं नाही तर अमेरिकेकडून सूट घेतो. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री भारताच्या या धोरणामुळे नाराज आहेत. भारत व्यापारामध्ये चीनबाबत नरमाईचं धोरणं घेतो, पण अमेरिकेशी मात्र कडक धोरण अवलंबतो, असं त्यांनी ट्रंप यांना आधीच सांगितलं आहे.
यामुळे ट्रंप नाराज होतात. आर्थिक तोट्यामुळे ते चीनवरही नाराज होतात.
या व्यावसायीक असंतुलनामुळेच काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून ते भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असावेत. त्यामुळे भारताकडून सूट मिळेल असा त्यांचा प्रयत्न असावा असं मला वाटतं.
(मुक्तदर खान अमेरिकेतील डिलावेअर विद्यापीठात प्रोफेसर आहेत. हा लेख बीबीसी प्रतिनिधी आदर्श राठोड यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)