You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप यांच्या सभेत 'वंशवादी' घोषणा, पुन्हा फुटलं वादाला तोंड
डेमोक्रॅट पक्षाच्या चार महिला खासदारांवर वंशभेदी टीका केल्यानं गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वादात अडकले आहेत.
या महिला खासदारांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्रंप यांनी म्हटलं होतं की, एवढाच जर त्रास होत असेल, तर त्यांनी अमेरिका सोडून आपापल्या देशात परत जावं.
याच सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत आता नवीन घटना घडली आहे. ट्रंप यांच्या प्रचारसभेत त्यांच्या समर्थक महिला खासदाराविरोधात काही लोकांनी घोषणा दिल्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.
या घोषणांवरून नव्याने वाद सुरू झाल्यानंतर अखेर स्वत: ट्रंप यांना पुढे येऊन सांगावं लागलं की, या घोषणांशी आपला काहीच संबंध नाही.
अलेक्झांड्रिया ओकासियो कोरटेज, रशीदा तलीब, इयाना प्रेस्ली आणि इल्हान ओमर या चार महिला खासदारांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या. या महिला खासदारांनी विजयी होऊन अमेरिकेत नवा इतिहास रचला होता.
या चारही महिला खासदार अमेरिकन असल्या, तरी त्या स्थलांतरित आहेत.
त्यांनी ट्रंप सरकारच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर टीका केली. त्यामुळे गेल्या रविवारी डोनाल्ड ट्रंप यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत म्हटलं की, या महिला अमेरिकेचा द्वेष करतात आणि भ्रष्ट व गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये त्यांनी परत जावं, जिथून त्या आल्या आहेत.
'सेंड हर बॅक'वरून वाद
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यात बुधवारी डोनाल्ड ट्रंप यांची प्रचारसभा होती. त्यावेळी उपस्थित ट्रम्प समर्थकांनी 'सेंड हर बॅक' अशा घोषणा दिल्या. यावेळी ट्रंप हे आपल्या भाषणातून इल्हान ओमर यांच्यावर टीका करत होते. ओमर या सोमालियन वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.
या प्रसंगावरूनही आता नव्याने वाद सुरू झाला आहे. अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केले. शिवाय, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनीही ट्रंप यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या समर्थकांना थांबवलं का नाही? तर आपला त्या घोषणांशी काहीही संबंध नसल्याचे सांगत ट्रंप यांनी पळ काढला.
ट्रंप म्हणाले, "त्या घोषणांमुळे मला आनंद झाला नाही. मात्र, त्यांनी दिलेल्या घोषणांशी मी सहमत नाही, हे मी म्हटलं नाही."
आपण नेमके कोणत्या गोष्टीशी सहमत नाही, हे मात्र ट्रंप यांनी स्पष्ट केले नाही.
ट्रंप यांनी प्रचारसभेत जे काही म्हटलं ते फॅसिस्ट विचारधारेतून आलेलं आहे, अशी खासदार इल्हान ओमर यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या पुढे म्हणाल्या, "राष्ट्राध्यक्षांनी जे काही म्हटलं ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. जसे इतर अमेरिकन नागरिक आहेत, तसेच आम्हीही आहोत. हा आमचा देश आहे आणि आम्ही इथलेच नागरिक आहोत. ट्रम्प व्यासपीठांवरून आपले फॅसिस्ट विचार पसरवत आहेत. कारण त्यांच्या नकारात्मक धोरणांचं समर्थन करत नाहीत, म्हणून ते अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगत आहेत. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, अमेरिकेत असहमत असणंही देशभक्तीच आहे."
निवडणुकीतील रणनिती
जाणकाराच्या मते, 'सेंड हर बॅक'च्या घोषणा 2016 च्या निवडणूक प्रचाराची आठवण करून देतात. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात पाठवण्यासाठी 'लॉक हर अप'च्या घोषणा दिल्या होत्या.
बीबीसीचे अमेरिकेतील प्रतिनिधी अँथनी जर्चर यांच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे एक चाणाक्ष राजकीय नेते आहेत. ते संधीचा फायदा घेतात.
अशी विधानं करून ट्रंप डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांमधून फूट पाडणं आणि अशा लोकांना एकत्र करू पाहत आहेत, त्यांच्या मतांमुळे निवडणुकीत फायदा होईल, असंही जर्चर सांगतात.
जर्चर पुढे म्हणतात, यात एक प्रकारची जोखीमसुद्धा आहे. जर ट्रंप यांच्या समर्थकांची एकजूट होऊ शकते, तर त्यांच्या विरोधकांच्या बाबतीतही असं होऊ शकतं.
दरम्यान, या सर्व घटनांवरून अमेरिका भेदभावपूर्ण आणि घाणेरड्या निवडणूक प्रचाराकडे झुकत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)