दुबईच्या राणी हया यांच्या पलायनाचं खरं कारण आलं समोर

दुबईचे राजे शेख मोहम्मद अल् मख्तूम आणि लंडनला पलायन केलेल्या त्यांच्या पत्नी युवराज्ञी हया बिन अल् हुसैन यांच्यामधील कायदेशीर लढाईला सुरुवात होत आहे.

शेख मोहम्मद यांनी हया यांच्याविरोधात खटला दाखल केला असून त्याची सुनावणी मंगळवारपासून (31 जुलै) लंडनमध्ये होणार आहे.

युवराज्ञी हया या जॉर्डनचे शाह अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहेत. शेख मोहम्मद यांच्या त्या सहाव्या पत्नी आहेत.

दुबई आणि संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) च्या दृष्टिनं हे प्रकरण अतिशय संवेदनशील मानलं जातं आहे.

या प्रकरणी एक खासगी सुनावणीही झाली होती. या सुनावणीच्या वेळेस दोन्ही पक्षांनी म्हटलं होतं, की पैसा किंवा घटस्फोटापेक्षाही आमच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिनं हा निर्णय महत्त्वाचा आहे.

UAE नं या खटल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून हा राजघराण्याचा खासगी प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

शेख लतीफानंही केलं होतं दुबईमधून पलायन

शेख मोहम्मद आणि युवराज्ञी हया यांच्या दरम्यान मतभेदाचं कारण शेख मोहम्मद यांची मुलगी शेख लतीफा असल्याचं दुबईच्या राजघराण्याच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे.

33 वर्षीय शेख लतीफा यांची आई शेख मोहम्मद यांची दुसरी पत्नी आहे. शेख लतीफा यापूर्वीही वादात अडकल्या होत्या. त्यांच्या एकूण राहणीमान आणि जीवनशैलीवर बंधनं लादण्यात आल्यानंतर त्यांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

शेख लतीफाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय किनाऱ्याजवळ अमिरातीच्या सैन्यांनं त्यांचं जहाज ताब्यात घेतलं होतं. डिसेंबरमध्ये आयर्लंडच्या माजी राष्ट्रपती मॅरी रॉबिन्सन यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीनंतर लतीफा कोणालाही दिसल्या नाहीत.

रॉबिन्सन या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीच्या माजी प्रमुख आहेत आणि युवराज्ञी हया यांच्या मैत्रिणदेखील.

या बैठकीनंतर शेखा लतीफा 'संकटात' असल्याचं सांगितलं जात आहे. त्या आपल्या कुटुंबाच्या 'प्रेमळ निगराणी'खाली असल्याचंही म्हटलं जातं.

या आरोपांना उत्तर देताना UAE प्रशासनानं शेख लतीफा यांच्यावरील उपचार आणि रॉबिन्सनसोबतच्या बैठकीची माहिती दिली होती.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात शेखा लतीफा यांनी ४० मिनिटांचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. आपल्यावर जे निर्बंध लादले जात आहेत, त्यामुळे आपल्याला दुबईत राहायचं नसल्याचं त्यांनी या व्हीडिओत सांगितलं होतं.

या व्हीडिओमध्ये शेख लतीफानं आपली बहीण शम्सा हिचा उल्लेख केला होता. 2000 साली ब्रिटनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेली शम्सा ही तिथून पळून गेली होती.

शेख मोहम्मद यांचं ब्रिटनसोबतचं नातं

शेख मोहम्मद यांचं ब्रिटनसोबत वेगळंच नातं आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध सँडहर्स्टचे ते विद्यार्थी आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे शेख मोहम्मद यांनाही घोडे आवडतात. ब्रिटनमधील घोड्यांच्या व्यापारातील ते मोठं नाव आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ब्रिटनमध्ये प्रचंड संपत्ती आहे. त्यांच्याच कार्यकाळात दुबई प्रमुख व्यापारी आणि पर्यटन केंद्र बनलं.

मात्र आता लंडनमध्ये सुरू होणाऱ्या कौटुंबिक लढ्यासोबतच त्यांना दुबईमधील राजकीय आणि आर्थिक आव्हानांनाही सामोरं जावं लागत आहे.

गेल्या चार वर्षांपासून दुबईची अर्थव्यवस्था मंदावली आहे. क्षेत्रीय तणावामुळे तेलाचे दरही सातत्यानं घसरत आहेत.

हा कायदेशीर लढा जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्यासाठीही चिंतेचा विषय आहे. कारण UAE आणि त्याचा मित्रराष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाकडून जॉर्डनला आर्थिक मदत मिळते.

कोण आहेत हया बिन अल् हुसैन?

युवराज्ञी हया यांचा जन्म 1974 साली झाला. जॉर्डनचे माजी राजे हुसैन हे त्यांचे वडील आणि महाराणी अलिया अल् हुसैन या त्यांच्या आई. हया केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जॉर्डनचे सध्याचे राजे अब्दुल्ला (दुसरे) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत.

युवराज्ञींच्या बालपणातला बहुतांश काळ युनायटेड किंग्डममध्ये गेला आहे. ब्रिस्टॉलमध्ये बॅडमिंटन स्कूल आणि डोर्सेट येथील ब्रेस्टन स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं.

नेमबाजी, फाल्कन पक्षी (ससाणे) उडवण्यांबरोबर आपल्याला मोठ्या अवजड वाहनांची आवड आहे, असं त्यांनी एका मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. जॉर्डनमध्ये अवजड वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या आपण एकमेव महिला असल्याचा त्यांचा दावा होता.

लहानपणी त्यांना घोडेस्वारीचा छंद लागला. वयाच्या विशीतच त्या कुशल घोडेस्वार झाल्या. 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जॉर्डनचं नेतृत्व केलं होतं.

10 एप्रिल 2004 रोजी तीस वर्षांच्या हया यांचा शेख मोहम्मद यांच्याशी विवाह झाला. शेख मोहम्मद संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक आहेत. लग्नाच्या त्यावेळेस त्यांचे वय 53 होतं आणि प्रिन्सेस हया त्यांची सहावी पत्नी आहेत. वेगवेगळ्या विवाहांमधून त्यांना 23 मुले झाली आहेत असं सांगण्यात येतं.

अम्मानमधल्या एका सोहळ्यात शेख मोहम्मद आणि हया विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर शेख मोह्ममद यांच्याबरोबरच्या जीवनावर हया यांनी अनेकदा मत व्यक्त केलं होतं. तसंच आपलं कौटुबिक जीवन उत्तम असल्याचं चित्र त्यांनी रंगवलं होतं.

"त्यांचं कर्तृत्व पाहून मला दररोज नवा आश्चर्याचा धक्का बसतो. ते माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते", असं एमिरेट्स वूमन मासिकाला 2016 साली दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या.

परंतु सारं काही आलबेल नसल्याचं गेल्या वर्षी दिसून आलं. गेल्या वर्षी शेख मोहम्मद यांची मुलगी शेखा लतिफा पळून गेल्यावर त्याकडे सर्वांचं लक्ष गेलं. आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य नाही आणि आपला छळ होत असल्याचं तिनं एका व्हीडिओमधून सर्वांना सांगितलं होतं.

सहा महिन्यानंतर युवराज्ञी हया यांनी लतिफाच्या पलायनाच्या प्रयत्नाबद्दल आपल्याला अनेक धक्कादायक गोष्टी दिसल्या आणि आपल्यावर पतीच्या कुटुंबाकडून दबाव येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दुबईमध्ये सुरक्षित वाटेनासं झालं आणि इंग्लंडमध्ये जाण्याआधी त्या जर्मनीला पळाल्या असं सांगण्यात येतं.

त्यांच्या सध्याच्या नात्याबद्दल शेख मोहम्मद यांनी काहीही स्पष्ट केलेलं नाही. 10 जून रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एका अनोळखी महिलेचा फोटो प्रसिद्ध करून त्यामध्ये 'फसवणूक आणि विश्वासघात' असं लिहिलं आहे.

युवराज्ञी हया सध्या केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्सममध्ये 8.5 कोटी पौंड किंमतीच्या घरात राहात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)