You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया: व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाविरोधात निवडणूक लढवायची आहे तर आधी 'ही' अट पूर्ण करा
रशियात पोलिसांनी एका रॅलीदरम्यान हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेतलं आहे. यंदाच्या वर्षातली ही सगळ्यांत मोठी कारवाई मानली जात आहे.
सिटी हॉलमध्ये निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांना लाठीमार करत पोलिसांनी हुसकावून बाहेर काढलं.
निवडणुकांमधून विरोधी पक्षाच्या नेत्यांना वगळण्यात आल्याच्या मुद्यावरून आंदोलक निदर्शनं करत होते. राजकीय आकसातून ही कारवाई झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
8 सप्टेंबर रोजी निवडणुका होत आहेत. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना ही निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
साधारण 30 नेत्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रं त्यांच्याकडे नाहीत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
बंदी घालण्यात आलेल्या रॅलीत साधारण 1,074 जणांना अटक करण्यात आली. 1127 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ही रॅली सुरक्षेला धोका होती असं मॉस्कोचे महापौर सर्जेय सोबायिन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक व्यवस्थेचं कसोशीने पालन केलं जाईल असं त्यांनी पुढे सांगितलं.
ज्या पद्धतीने मॉस्को शहराचं प्रशासन चालवलं जात आहे आणि युनायटेड रशिया पार्टीवर आंदोलक नाराज असून त्यांचा राग अनावर झाला आहे.
विरोधी पक्षाचे नेते अलेक्स नॅव्हानलय यांनीच शनिवारी झालेल्या रॅलीचं आयोजन केलं होतं. अलेक्स हे व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक आहेत. बुधवारी त्यांना महिनाभरासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
पुतिन शनिवारी बाल्टिक समुद्र सफरीवर होते. पृथ्वीतलावावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी खोल समुद्रात डुबकी घ्यावी लागते असा टोला अलेक्स यांनी हाणला होता.
काय घडलं शनिवारी?
निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात या मागणीसह गेल्या शनिवारी 20,000 आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यावेळी डझनभर आंदोलकांना अटक करण्यात आली होती.
27 जुलै रोजी आयोजित रॅलीला कितीजण उपस्थित होते याविषयी अधिकृत आकडा स्पष्ट झालेला नाही मात्र संख्या झपाट्याने कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांच्या मते 3500 आंदोलक या रॅलीला हजर होते. यामध्ये 700 पत्रकारांचाही समावेश होता.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमाराचा प्रयोग केला. यामध्ये काही आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
स्थानिक निवडणुका रशियात गौण असतात. मॉस्को प्रशासन शहराचं बजेट किंवा महत्त्वपूर्ण नियुक्त्या करत नाही. याआधी मोठ्या विरोधाविना बहुतांशी निर्णयांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यंदाच्या निवडणुका गाजण्याची चिन्हं आहेत कारण स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास उत्सुक व्यक्तींना प्रक्रियेतून रद्दबातल ठरवण्यात आलं आहे.
निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना 5000 स्वाक्षऱ्या गोळा करण्यास सांगण्यात आलं आहे. स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीने सरकारच्या डेटाबेससाठी स्वत:ची माहिती पुरवण्याचं कलम समाविष्ट आहे. वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेल्या लेखात व्लादिमीर कारा-मुर्झा यांनी याबाबत सविस्तर लिहिलं आहे.
काहीजणांनी आवश्यक स्वाक्षऱ्या मिळवल्या मात्र निवडणूक आयोगाने स्वाक्षऱ्यांसंदर्भात आक्षेप घेतला आहे. यावरून वातावरण तापलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)