अपोलो 11: चंद्रावर जाण्याच्या स्पर्धेत अमेरिकेनं रशियावर कशी केली मात?

    • Author, फर्नांडो दुहार्ते
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

15 सप्टेंबर 1959. सोव्हिएत युनियनचे (सध्याचा रशिया) तत्कालीन राष्ट्रपती निकिता ख्रुश्चेव्ह ऐतिहासिक अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले होते.

ख्रुश्चेव यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आयसेनहॉवर यांना सोव्हिएत युनियनचं प्रतीक असणारी एक गोलाकार वस्तू भेट दिली.

ही भेटवस्तू ऐतिहासिक तर होतीच, पण त्यातून एक प्रकारे अमेरिकेची थट्टाही उडवण्यात आली होती. कारण ही गोलाकार वस्तू म्हणजे चंद्रावर उतरणाऱ्या लुना-2 या पहिल्या अंतराळयानाची प्रतिकृती होती.

अमेरिकेचं अपोलो 11 अंतराळयान 1969 मध्ये यंत्रावर उतरलं आणि अमेरिका चंद्रावर माणूस उतरवणारा पहिला देश ठरला. पण त्याआधी या स्पर्धेमध्ये रशियानं अमेरिकेला दोनदा मागे टाकलं होतं.

अंतराळ स्पर्धेची सुरुवात

चंद्रावर सर्वांत आधी पोहोचत सोव्हिएत युनियननं या स्पर्धेमध्ये आघाडी घेतली. पण ही स्पर्धा सोव्हिएत संघानेच सुरू केली होती. 1957मध्ये त्यांनी पहिला कृत्रिम उपग्रह - स्पुटनिकचं प्रक्षेपण केलं.

त्यानंतर लुना 9 या अंतराळयानानं फेब्रुवारी 1966मध्ये चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं आणि मॉस्कोला पुन्हा एकदा आघाडी मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागाचा पहिला फोटोही सोव्हिएत युनियननेच काढला.

दोन महिन्यांनंतर लुना 10 चंद्राच्या कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालणारं पहिलं अंतराळयान ठरलं. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी याचा मोठा फायदा झाला. चंद्रावर थेट उतरण्याचा प्रयत्न करण्याआधी अप्रत्यक्षपणे चंद्राच्या अभ्यासाचा प्रयत्न करणं जास्त योग्य असेल असा विचार दोन्ही देशांच्या अंतराळ वैज्ञानिकांनी केला होता.

1961मध्ये नासाचे वैज्ञानिक जॉन ह्युबोल्ट यांनी एक कल्पना मांडली. ती होती - लुनार ऑर्बिट राँदेवू (LOR). चंद्राच्या कक्षेत फिरत राहणारं एक मदरशिप (मुख्य यान) असेल आणि त्याच्यासोबत लहान अंतराळयान असेल, जे वेगळं होत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी ह्युबोल्ट यांची कल्पना होती.

यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होईल असं ह्युबोल्ट यांचं मत होतं. तसंच मिशन डेव्हलपमेंट, चाचणी, निर्मिती, अंतराळ यान उभारणं, काऊंटडाऊन आणि प्रक्षेपण या सगळ्या गोष्टीही त्यामुळे सोप्या होणार होत्या.

हीच पद्धत अवलंबून अमेरिकेनं चंद्रावर उतरण्यात यश मिळवलं. खरंतर सोव्हिएत संघ 1966 मध्ये चंद्रावर उतरण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला होता.

अमेरिकेची आघाडी

लंडनमधील सायन्स म्युझियमचे स्पेस क्युरेटर डग मिलार्ड सांगतात, "चंद्रावर मानव उतरण्याआधी चंद्रावर एक रोबोटिक यान उतरलं होतं. पण आपण सोव्हिएत युनियनची सगळी कामगिरी विसरून गेलो आहोत."

12 सप्टेंबर 1959 रोजी लुना 2 अंतराळ यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. इतर गोष्टींबाबत गोपनीयता पाळणाऱ्या सोव्हिएत संघाच्या अधिकाऱ्यांनी एक अशी गोष्ट केली ज्यामुळे त्यांचं यश साऱ्या जगाला समजलं. ब्रिटिश अंतराळ वीर बर्नाड लोवेल यांना त्यांनी आपल्या या गुप्त मोहिमेबद्दल सांगितलं. लोवेल यांनी जगाला ही मोहीम यशस्वी झाल्याची बातमी दिली. अमेरिकेलाही त्यांनी याबाबत माहिती दिली. पण सुरुवातीला सोव्हिएत संघाचं यश मान्य करायला ते तयार नव्हते.

14 सप्टेंबर 1959 रोजी मध्यरात्रीनंतर लुना 2 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर ताशी 12 हजार किलोमीटरच्या वेगानं आदळलं. हे अंतराळयान त्यातील उपकरणांसहित नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

पण शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसण्याच्या काळात हे यश मोठं होतं.

लूना 2 नं वैज्ञानिक प्रयोगही केले. चंद्राचं कोणतंही प्रभावी चुंबकीय क्षेत्र नाही आणि त्यामधून कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन (रेडिएशन) होत नसल्याचं त्यातून आढळून आलं.

ब्रिटनच्या अंतराळ संस्थेचे ह्युमन एक्सप्लोरेशन प्रोग्राम मॅनेजर लिबी जॅकसन सांगतात, "या मोहिमेतून वैज्ञानिकांना चंद्राच्या पृष्ठभागाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली होती."

लुना 9 मोहिमेचा अमेरिकेला फायदा

सोव्हिएत युनियनच्या लुना 9 या मोहिमेचा फायदा सात वर्षांनंतर अपोलो मोहिमेला झाला.

सोव्हिएत संघाच्या आणि अमेरिकेच्याही वैज्ञानिकांना असं वाटत होतं की चंद्राचा पृष्ठभाग हा अंतराळयानासाठी कदाचित फार मऊ ठरेल. चंद्रावर रेती असली तर त्यामध्ये अंतराळयान रुतून बसण्याची त्यांना भीती होती.

पण सोव्हिएत संघाच्या लुना 9 मोहीमेमुळे हे लक्षात आलं की चंद्राचा पृष्ठभाग टणक आहे आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची होती.

जॅक्सन म्हणतात, "हे खरंतर वैज्ञानिक यश होतं ज्याचा फायदा भविष्यातल्या मोहिमांना झाला."

लुना 10 : सोव्हिएत युनियनची पुन्हा सरशी

ही मोहीमदेखील सोव्हिएत संघानं अमेरिकेवर केलेली मात होती. जॅक्सन सांगतात, की भौगोलिक राजकारणाने अंतराळातल्या या स्पर्धेला एक वेगळीच दिशा दिली होती.

लुना 10 यानानं अनेक महत्त्वाचे शोध लावले. चंद्रावरील मातीचं पृथ्थकरण आणि तिथल्या दगडांमधल्या लहान कणांविषयीची माहिती या यानामुळे मिळाली. दगडाचे लहान लहान कण अंतराळ वेगानं फिरत राहतात आणि ते अंतराळातल्या यानासाठी किंवा चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांसाठी धोकादायक धरू शकतात.

प्रसिद्ध अंतराळ इतिहासकार आसिफ सिद्दीकी यांनी जून महिन्यांत अमेरिकन संस्था 'प्लॅनेटरी सोसायटी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं, "1961मध्ये अवकाशामध्ये पहिला माणूस पाठवून आणि 1965 मध्ये पहिला स्पेस वॉक यशस्वी करत आपण ही स्पर्धा जिंकलेलीच आहे, असं सोव्हिएत संघाला वाटायला लागलं होतं. अमेरिका चंद्रावर माणूस उतरवण्यात यशस्वी होईल याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता."

1968मध्ये अमेरिकेनं अपोलो 8 मोहिमेमध्ये चंद्रावर एक मनुष्य असणारं यान पाठवलं जे चंद्राच्या कक्षेत जाऊन यशस्वीरित्या परत आलं. अमेरिकेने ही निर्णायक आघाडी घेतली होती. यानंतर एक वर्षाच्या आतच अपोलो 11 चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं.

खरंतर अपोलो 8 मोहिमेआधीच सोव्हिएत युनियननं मानव असणारं यान अंतराळात पाठवण्यात अमेरिकेआधीच यश मिळवलेलं होतं. पण मग तरीही ते मागे का पडले?

नासाचे इतिहासकार रॉजर लायोनियस यांनी बीबीसीला सांगितलं, "कुठून सुरुवात करू? ना त्यांच्याकडे आवश्यक वैज्ञानिक तंत्रज्ञान उपलब्ध होतं ना पुरेसा आर्थिक पाठिंबा. त्यांची संघटनात्मक आखणीही चांगली नव्हती."

सोव्हिएत युनियनला चंद्रावर मानवरहित यान पाठवण्यात यश आलं असलं तरी त्यांना मानव असलेलं यान पाठवण्यासाठी आवश्यक तंत्राचा विकास करता आला नाही.

आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसं असणारं अंतराळ यान थेट चंद्रापर्यंत नेऊ शकेल असं शक्तिशाली रॉकेट मॉस्कोकडे नव्हतं.

अमेरिकेकडे ताकदवान सॅटर्न 5 रॉकेट होतं जे मानव असणाऱ्या सर्व चांद्रमोहिमांसाठी यशस्वीरित्या वापरण्यात आलं.

पण त्याचवेळी सोव्हिएत संघाचं एन 1 रॉकेट चारही प्रक्षेपण चाचण्यांदरम्यान अयशस्वी ठरलं.

राजकीय संघर्ष

लुनार ऑर्बिट राँदेव्हू (LOR) मिशन यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी आपल्या अंतराळामध्ये या मोहिमेविषयीचा अभ्यास करता येईल अशी 'मॅन्युअल डॉकिंग सिस्टीम' गरजेची असल्याचं अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन्ही देशांच्या लक्षात आलं होतं.

1966 पर्यंत अमेरिकेने हा अडथळा पार केला पण सोव्हिएत युनियनला हे जानेवारी 1969 पर्यंत हे करता आलं नाही.

शिवाय सोव्हिएत संघाच्या अंतराळ मोहिमेला कम्युनिस्ट नेतृत्त्वासोबत सतत संघर्ष करावा लागत होता. आवश्यक संसाधनांसाठी त्यांना सेनेशी स्पर्धा करावी लागे. त्यावेळी सोव्हिएत युनियनच्या सेनेला आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यात रस होता.

सोव्हिएत युनियनच्या प्रयत्नांत अडथळे

आसिफ सिद्दीकी 'चॅलेंज टू अपोलो - द सोव्हिएत युनियन अँड स्पेस रेस 1945-74' या त्यांच्या पुस्तकात म्हणतात, की अमेरिकेच्या मोहिमेला यश मिळाल्यानंतर काही वर्षांतच सोव्हिएत युनियनने चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहीमेकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली.

ते म्हणतात, "सोव्हिएत युनियनच्या अंतराळ कार्यक्रमाविषयी गोपनीयता बाळगण्यात येत होती. पण ती एक अशी मोहीम होती जिच्या मार्गात अनेक अडथळे होते."

सोव्हिएत युनियनमधल्या वरच्या फळीशी संबंधित लोकांनीही अशीच माहिती दिली आहे. सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती निकिता ख्रुश्चेव्ह यांचा मुलगा आणि एअरोस्पेस इंजिनिअर असणारे सर्जेई ख्रुश्चेव्ह यांनी अमेरिकन मासिकाला सांगितलं होतं, "सोव्हिएत युनियनचा अंतराळविषयक कार्यक्रम ही एक केंद्रीय व्यवस्था होती असा पाश्चिमात्य देशांचा गैरसमज होता. पण खरंतर ही अमेरिकेच्या अपोलो मिशनपेक्षा जास्त प्रमाणात विकेंद्रित असणारी व्यवस्था होती. सोव्हिएत संघामध्ये अनेक डिझायनर होते जे एकमेकांशी स्पर्धा करत होते."

दरम्यान, मॉस्कोच्या या अंतराळ मोहिमेचं नेतृत्व करणारे इंजिनियर सर्जेई कुरोलेव्ह यांचं जानेवारी 1966 मध्ये आकस्मिक निधन झालं. मोहिमेसाठी हा मोठा झटका होता.

रशियाचा शेवटचा प्रयत्न

चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेमध्ये आपण मागे पडत असल्याची जाणीव जेव्हा सोव्हिएत संघाला झाली तेव्हा त्यांनी शेवटची शक्कल लढवली. त्यांनी एक मोहीम सुरू केली. अपोलो 11च्या आधी चंद्रावर पोचून तिथून नमुने गोळा करून परत येणं या मोहिमेचं उद्दिष्टं होतं.

अपोलो 11च्या उड्डाणाच्या तीन दिवस आधी 13 जुलै 1969 रोजी लुना 15 अंतराळात झेपावलं. चार दिवसांनंतर ते चंद्राच्या कक्षेत दाखल झालं. अपोलो 11 त्यानंतर 72 तासांनी आलं. पण चंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नात लुना 15 हे यान नष्ट झालं.

सर्जेई कुरोलेव्ह यांच्या ऐवजी सोव्हिएत संघाच्या अंतराळ मोहिमांचं नेतृत्व करणाऱ्या वेस्ली मिशहिन यांनी अमेरिकन टीव्ही नेटवर्क पीबीएससोबत 1999 मध्ये बोलताना म्हटलं होतं, "आम्हाला असं वाटायचं की आम्ही सगळ्या जगाच्या पुढे आहोत आणि या मोहिमेत आम्ही नेहमीच अमेरिकेपेक्षा आघाडीवर राहू. पण असं वाटणं वेगळं आणि तशी संधी मिळणं वेगळी गोष्ट असते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)