आयर्लंड विरुद्ध इंग्लंड : जगज्जेत्यांचा 85 धावांत खुर्दा, टिम मुर्तगाच्या 5 विकेट्स

जगज्जेत्या इंग्लंडचा आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत 85 धावांतच खुर्दा उडाला.

14 जुलैला लॉर्डसवरच रंगलेल्या वर्ल्ड कपच्या थरारक अंतिम लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं.

त्यानंतर अवघ्या आठवडाभरात इंग्लंडची दाणादाण उडाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला.

आयर्लंडचा 37 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज टिम मुर्तगाने पाच बॅट्समनना माघारी धाडत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. मुर्तगा इंग्लंड काऊंटी संघ मिडलसेक्स आणि सरेसाठी खेळतो.

पदार्पणवीर मार्क अबेरने तीन विकेट्स घेत मुर्तगाला चांगली साथ दिली. बॉड रॅनकिनने दोन विकेट्स घेतल्या.

इंग्लंडच्या आठ बॅट्समनना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. जो डेन्लीने सर्वाधिक 23 धावा केल्या.

इंग्लंडने या चारदिवसीय टेस्टसाठी जेसन रॉय आणि ऑली स्टोन यांना पदार्पणाची संधी दिली. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांना विश्रांती देण्यात आली आहे. जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि जेम्स अॅंडरसन दुखापतीमुळे या टेस्टचा भाग नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)