You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: सिंगापूर ते लंडन रोडट्रिप करणाऱ्या माथूर कुटुंबाची गोष्ट
- Author, अॅडम विल्यम्स
- Role, बीबीसी क्रीडा प्रतिनिधी
46 दिवस चालणारा क्रिकेट वर्ल्ड कप हा सर्वांत दीर्घकाळ चालणाऱ्या टूर्नामेंट्सपैकी एक. पण याच कालावधीत अजून काय काय करता येईल?
एका क्रिकेटवेड्या कुटुंबातल्या तीन पिढ्या याच कालावधीत कारने प्रवास करत आहेत. सिंगापूरपासून इंग्लंडपर्यंत अशी त्यांची तब्बल 14,000 मैल आणि 17 देशांची रोड ट्रीप सुरू आहे, म्हणजे दोन खंड, विषुववृत्त आणि आर्क्टिक प्रदेशातून प्रवास करत.
भेटा माथूर कुटुंबाला. 3 वर्षांच्या अव्यापासून ते 67 वर्षांचे आजोबा अखिलेश यांच्यासकट हे माथूर कुटुंब 20 मे रोजी सिंगापूरहून त्यांची सात आसनी कार घेऊन निघालं.
पण बर्फाच्छित प्रदेश, गारपीट, वाळूची वादळं अशा सगळ्यांचा सामना करत सात आठवड्यांचा कार प्रवास का? आपल्या देशाच्या क्रिकेट टीमची मॅच पाहण्यासाठी थेट विमानप्रवास जास्त सोपा ठरला नसता का?
"वर्ल्ड कप होणार असल्याचं आम्हाला मार्चपासूनच माहिती होतं आणि भारतीय टीमला पाठिंबा देण्यासाठी आपण तिथे असायला हवं, असं आम्हाला वाटलं," असं अनुपमने बीबीसी स्पोर्टला सांगितलं. त्यांना दोन मुलं आहेत.
"विमानप्रवास हा सगळ्यात सोपा पर्याय ठरला असता. पण मग आम्ही विचार केला की देशासाठी काहीतरी खास करायला हवं आणि त्यामध्ये सगळ्यांचा समावेश असायला हवा."
म्हणून मग अनुपम यांचे आई-वडील अखिलेश आणि अंजना, त्याचा सहा वर्षांचा मुलगा अविव, हे पूर्ण प्रवासात सहभागी झाले, तर त्यांची बायको आदिती आणि 3 वर्षांची लहान मुलगी अव्या या प्रवासाच्या मोठ्या टप्प्यामध्ये सहभागी होत्या.
पण जगभ्रमंती करण्यासाठी अनुपम पहिल्यांदा कार घेऊन बाहेर पडलेले नाहीत.
आम्ही या कुटुंबाचा ब्लॉग पाहिल्यावर लक्षात आलं की अनुपमने याआधी 36 देशांमधून तब्बल 96,000 किलोमीटरचा प्रवास केलाय. आता या अनुपमने क्रिकेटसाठी केलेल्या प्रवासातले 22,000 किलोमीटरही यामध्ये जमा करता येतील.
- सिंगापूर
- मलेशिया
- थायलंड
- लाओस
- चीन
- किर्गिस्तान
- उझबेकिस्तान
- कझाकस्तान
- रशिया
- फिनलंड
- स्वीडन
- डेन्मार्क
- जर्मनी
- नेदरलँड
- बेल्जियम
- फ्रान्स
- इंग्लंड (स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दन आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडलाही देत भेट देत आहेत.)
"लहान असल्यापासून दूरवर ड्राईव्ह करून प्रवास करणं हेच माझं स्वप्न होतं. ड्राईव्ह करत जगप्रदक्षिणा करण्याचं माझं स्वप्न आहे," अनुपम सांगतो.
"माझ्याकडच्या जगाच्या निळ्या नकाशावर मी माझ्या सगळ्या रोड ट्रिप्सची नोंद ठेवतो. या नकाशावर सीमारेषा नाहीत. फक्त प्रवास दाखवणाऱ्या लाल रेषा आहेत. सगळं जग लाल रंगात रंगवायचं माझं स्वप्न आहे," असं ते सांगतात.
बर्फ, गारा, वारा आणि पावसातला प्रवास
माथूर कुटुंब लंडनला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना भेटलो. तब्बल सात आठवड्यांच्या जगप्रवासाने थकलेले दिसण्याऐवजी ते वर्ल्ड कपसाठी दाखल झाल्याबद्दल उत्साही आणि खूश होते. आजूबाजूच्या पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या फॅन्ससोबत त्यांच्याही अंगात उत्साह संचारला होता.
दुसऱ्याच दिवशी ते भारत विरुद्ध श्रीलंका सामना पाहण्यासाठी लंडनहून तुलनेने लहानसा प्रवास करून लीड्सला पोहोचणार होते. त्यांच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा त्यांच्या सात सीटर कारवर रेखाटण्यात आलेला आहे. या कारवर आहे अनुपम यांचा जगाचा नकाशा, त्यावर त्यांचा प्रवासमार्ग दाखवणाऱ्या रेषा आणि त्यांनी ज्या देशांना भेट दिली ते देश.
"आम्ही स्वतःला AMX पेंट इट रेड (Paint it Red) म्हणवतो," अनुपम माझ्याशी कारमधून बोलताना सांगतात. "AM आमच्या कुटुंबाच्या नावाची आद्याक्षरं आणि X कारण हा प्रवास करत असताना आमची संख्या बदलत होती."
बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनुपम यांचं कुटुंब मूळचं चेन्नईचं, पण गेल्या 14 वर्षांपासून तो सिंगापूरमध्ये आहे.
पण क्रिकेट पाहण्यासाठी रस्त्याने इतका प्रवास करण्याची कल्पना कशी सुचली?
"रस्त्याने हा प्रवास कसा करता येईल, कोणत्या देशांतून आम्हाला जावं लागेल याचा विचार करायला मी सुरुवात केली, आणि मग लक्षात आलं की हे देश एकमेकांना जोडलेले आहेत," अनुपम सांगतात. "मग आम्ही अगदी बारकाव्यांनिशी आखणी करायला सुरुवात केली, भरपूर व्हिसांसाठी अर्ज केले आणि सगळं जुळून आलं."
नशीब खरंच बलवत्तर होतं. कारण त्यांना इतक्या दिवसांच्या प्रवासात फक्त एकदाच त्यांचा मार्ग बदलावा लागला. दक्षिण पूर्व आशियामधून सीमा ओलांडताना त्यांना सुरक्षेच्या कारणांमुळे मार्ग बदलावा लागला. पण ते वगळता ते त्यांच्या मूळ योजनेनुसारच प्रवास करत आले. शिवाय या सगळ्या प्रवासात फक्त एकदाच उशीर झाल्याने त्यांना हॉटेल बुकिंग रद्द करावं लागलं.
"उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानसारख्या देशांमध्ये अतिशय सुंदर जागा आणि निसर्गसौंदर्य आहे. पण या ट्रिपच्या आधी मी त्याबद्दल ऐकलंही नव्हतं," अनुपम सांगतात. "काही देशांमध्ये आम्हाला अगदी अनुभवी गाईड मिळाले. त्यांचं योगदान खूप मोठं होतं."
"आम्ही थोडीशी वाट वाकडी करून चीनमध्येही गेलो कारण आम्हाला चीनच्या मुख्य भूमीवर सर्वांत दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील टोकाला भेट द्यायची होती. आर्क्टिक प्रदेशातही आम्ही असंच काहीसं केलं कारण आम्हाला स्वीडन पाहायचा होता. आणि तिथलं बर्फाचं हॉटेलही आम्ही पाहिलं. भन्नाट होतं ते."
"ड्रायव्हिंगसाठीच्या आवडीतून आम्ही हे सगळं केलं. आणि मनात एकच विचार होता की आपण हे आपल्या देशासाठी आणि क्रिकेटसाठी करतोय."
असा प्रवास कऱण्यासाठी कुटुंबाचा आणि मित्रमंडळींचा पाठिंबा हवाच. अनुपम यांचे आईवडील अखिलेश आणि अंजना यांनी नातू अविव सोबत मार्गक्रमणासाठी मदत तर केलीच, पण गरज पडल्यावर रस्त्याच्या कडेला चूल मांडून घरगुती स्वयंपाकही केला. चीनच्या दुर्गम भागामध्ये इतर जेवण उपलब्ध नसताना याचा खूप फायदा झाला.
"माझी तब्येत आणि इतक्या मोठ्या प्रवासामुळे मी आधी याबद्दल साशंक होतो," अनुपमचे वडील अखिलेश सांगतात. "पण मग मी पूर्णपणे यात सामील व्हायचं आणि नवीन अनुभव घ्यायचं, नवीन जागा पहायचं ठरवलं. आम्ही असाच दृष्टिकोन ठेवला आणि सगळं छान झालं."
अनुपमची आई अंजना सांगतात, "सगळ्यात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे जगभरातले लोक एकसारखेच असतात. ते प्रेम देतात आणि मलाही माझ्या देशासाठी आणि एकूणच जगामध्ये शांतता आणि प्रेम हवंय. भारताला पाठिंबा देण्यात मला आनंद मिळतो आणि आता इथे येऊन त्यांना खेळताना प्रत्यक्ष पाहणं उत्साहवर्धक आहे."
"असा प्रवास आयुष्यात एकदाच घडतो आणि आयुष्य बदलून टाकतो. आम्ही इतक्या नवीन गोष्टी शिकलो, आयुष्य नवीन प्रकारे जगायला शिकलो."
"आम्हाला हे करता आलं याबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही सिंगापूरहून 17 बॅग्स घऊन निघालो तेव्हा भारताच्या हाय कमिशनरही आम्हाला हिरवा झेंडा दाखवला. आणि कारमध्ये वर्ल्ड कप आणण्यासाठी 18व्या बॅगकरता जागा ठेवायला सांगितलं!"
पण या कुटुंबाला आता कदाचित त्या बॅगेची गरज भासणार नाही.
या माथूर कुटुंबाची एकमेव उमेद होती की त्यांच्या या प्रवासाचा शेवट गोड होईल 14 जुलैला भारतीय टीमच्या विजयासोबत. पण आता तसं तर होणार नाही, हे स्पष्ट झालंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)