वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडला विजेतेपद मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्सचे वडील का झालेत तिरस्काराचे धनी?

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देण्यात बेन स्टोक्सनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला किवी गोलंदाजांनी पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्यानंतर बेन स्टोक्सनं पाय रोवत नाबाद 84 धावा केल्या आणि मॅच टाय झाली.

त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये झालेल्या 15 धावांपैकी 8 धावा स्टोक्सनं केल्या होत्या. पण सुपर ओव्हरमध्येही मॅच बरोबरीत सुटली. म्हणून मग सर्वात जास्त चौकार कोणी लगावले यावरून वर्ल्ड कप विजेत्याची निवड करण्यात आली.

या मॅचमध्ये बेन स्टोक्सने दोन षटकारांसह सात चौकार लगावले होते. म्हणूनच इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन होण्यामध्ये बेन स्टोक्सची भूमिका महत्त्वाची ठरली.

तो जवळपास 'सुपर ह्यूमन' आहे, या शब्दांत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गननं स्टोक्सची स्तुती केली होती.

वडिलांची न्यूझीलंडच्या विजयासाठी प्रार्थना

पण इंग्लंडच्या विजयाचा हा मुख्य शिल्पकार मूळचा न्यूझीलंडचा आहे. बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्च इथे झाला. त्याचे वडील न्यूझीलंडच्या नॅशनल रग्बी टीमसाठी खेळले आहेत.

स्टोक्स 13 वर्षांचा असताना त्याचं कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झालं. पण एक दिवस स्टोक्समुळेच न्यूझीलंडची टीम वर्ल्ड कप हरेल, असा विचार त्याच्या कुटुंबाने कधी केला नसेल. निदान त्याचे वडील जेरार्ड स्टोक्स यांच्या मनात तरी असं आलं नसावं.

काही वर्षे इंग्लंडमध्ये राहून ते त्यांच्या देशात, त्यांच्या शहरात म्हणजेच ख्राईस्टचर्चमध्ये परतले आणि रविवारी घरच्या टीव्हीवर फायनल पाहताना ते न्यूझीलंडच्या विजयाची प्रार्थना करत होते.

वडिलांना न्यूझीलंड जिंकायला हवंय तर मुलगा इंग्लंडच्या विजयासाठी प्रयत्न करतोय याचा उल्लेख टीव्ही समालोचक नासिर हुसैन वारंवार करत होते.

बेन स्टोक्सच्या वडिलांना त्याच्या तडफदार खेळीचा अभिमान आहे. पण न्यूझीलंडची वेबसाईट 'स्टफ'वर एक रंजक बातमी छापून आलेली आहे. ज्यामध्ये बेन स्टोक्सचे वडील या अंतिम सामन्यानंतर टीकेचे धनी ठरल्याचं म्हटलं आहे.

बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी पहिल्यांदाच विजयी खेळी केली असं नाही. या वर्ल्ड कपमध्येच अंतिम सामन्याआधी किमान पाच वेळा इंग्लंडला गरज असताना खेळपट्टीवर टिकून राहत फलंदाजी केलेली आहे.

अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते बेन स्टोक्स हा खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू खेळाडू आहे. काहींना तर त्याच्यामध्ये गॅरी सोबर्स आणि इयान बॉथम सारख्या ऑल राऊंडर्सची झलक दिसते.

28 वर्षांचा बेन स्टोक्स डावखुरा जलदगती गोलंदाज आहे पण तो मधल्या फळीमध्ये उजव्या हाताने फलंदाजी करतो. 52 टेस्ट मॅचेसमध्ये बेन स्टोक्सच्या नावावर 127 विकेट्स सोबत सहा शतकंही जमा आहेत. तर 95 वन डेमध्ये त्यानं 70 विकेट्स घेत तीन शतकंही ठोकलेली आहेत. टेस्ट मॅचमधला त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे 258.

इंग्लिश क्रिकेटचा 'बॅड बॉय'

पण हाच ऑलराऊंडर बेन स्टोक्स कालपर्यंत इंग्लिश क्रिकेटसाठी 'बॅड बॉय' होता. 2016 मध्ये ब्रिस्टलमधल्या एका नाईट क्लबच्या बाहेर झालेल्या झटापटीच्या व्हीडिओमुळे त्याची ही ओळख झाली होती. त्याला अटक झाली आणि प्रकरण कोर्टात गेलं.

कोणत्याही इंग्लिश किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी अॅशेस मालिका अत्यंत महत्त्वाची असते. पण या वादामुळे त्याला त्यावर्षी अॅशेसमध्ये खेळता आलं नाही.

जून 2016च्या एका महिन्यात बेन स्टोक्सला इंग्लंडमध्ये चार वेळा वेग मर्यादेचं उल्लंघन करताना पकडण्यात आलं.

पण तीसुद्धा पहिली घटना नव्हती. त्या आधी 2011 मध्ये दारुच्या नशेत डरहॅममध्ये त्यानं ट्रॅफिक पोलिसांशी वाद घातला होता.

2012 मध्ये पोलिसांनी त्याला नशेत असताना ताब्यात घेतलं, पण ताकीद देऊन सोडण्यात आलं.

2013 मध्ये त्याला मॅट कॉल्ससोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत पाठवण्यात आलं. दारुच्या नशेमध्ये तो टीमच्या नियमांची पर्वा करत नसल्याचा आरोप होता.

क्रिकेटच्या मैदानातही तो प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाद घालत असे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बांगलादेशचा क्रिकेटपटू शब्बीर रहमानसोबतचा त्याचा वाद अजूनही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे.

इतकंच नाही तर 2015 मध्ये लॉर्डसवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात त्यानं मिचेल स्टार्कचा थ्रो हाताने अडवला होता.

पण वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर बेन स्टोक्स इंग्लिश क्रिकेटचा सुपरस्टार बनला आहे. नाईट क्लबबाहेरच्या मारहाणीनं त्याला एक वेगळी ओळख दिली होती. पण इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवत त्याने एक नवीन उदाहरण उभं केलं आहे.

क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडला गेली 44 वर्षं वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा होती. बेन स्टोक्सने ही प्रतीक्षा संपवली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)