You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप: भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री या प्रश्नांची उत्तरं देतील का?
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेल्यानंतर काही गोष्टींविषयी चर्चा सुरू झाली. म्हणजे धोनीची संथ बॅटिंग किंवा या महत्त्वाच्या सामन्यात विराट आणि रोहित का अपयशी ठरले. पण या सगळ्यांमध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची भूमिका काय होती, याचा विचार खरंतर व्हायला हवा.
2011चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला होता, "या विजयाचं श्रेय गॅरी आणि आमच्या कोचिंग टीमचं आहे कारण त्यांनी वर्षभरापूर्वीच आमची तयारी करून घ्यायला सुरुवात केली होती. त्याचा टीमला प्रचंड फायदा झाला."
गॅरी कर्स्टन प्रशिक्षक असतानाच 2008मध्ये भारत आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाला. त्यानंतर लगेचच या मितभाषी आणि मीडिया टाळणाऱ्या दक्षिण आफ्रिकन कोचने पुढे काय करायचं हे नक्की केलं होतं.
त्यानंतरच्या काळामध्ये भारताचे क्रिकेटपटू एकसंध होऊन टीमच्या मॅनेजमेंटच्या धोरणांनुसार क्रिकेट खेळतील याची काळजी कर्स्टन यांनी घेतली. याच टीमने पुढे इतिहास घडवला.
26 मार्च 2015. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर यजमान ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताचा मोठा पराभव केला.
विराट कोहली पाणावलेल्या डोळ्यांनी पॅव्हेलियनमध्ये बसलेला असताना कप्तान महेंद्रसिंह धोनी विजयी ऑस्ट्रेलियन टीमचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात आला. रवी शास्त्रींनी प्रत्येक भारतीय खेळाडूकडे जात त्यांची पाठ थोपटली.
तेव्हा 53 वर्षांचे असणारे रवी शास्त्री भारताच्या क्रिकेट टीमचे 2014 पासून संचालक (Team Director) होते. आणि 2016पर्यंत त्यांनी ही भूमिका बजावली. त्यांतर माजी कर्णधार अनिल कुंबळेची निवड मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली.
साधारण पुढचं वर्षभर, जून 2017पर्यंत अनिल कुंबळे भारताचा प्रशिक्षक होता. पण त्यानंतर त्याच्यात आणि कर्णधार विराट कोहलीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या.
इंग्लंडमध्ये भारत पाकिस्तान विरुद्धची चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी हरला. त्यानंतरच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अनिल कुंबळे संघासोबत गेला नाही.
कुंबळे कोच असतानाच्या वर्षभराच्या कालावधीत संघाला यशही मिळालं. खेळलेल्या 17 पैकी 12 टेस्ट सामन्यांमध्ये भारतीय टीम विजयी झाली आणि या काळात टीमचं आयसीसी टेस्ट रँकिंग सर्वोच्च होतं.
त्यानंतर लगेचच रवी शास्त्री टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून परतले. असं म्हटलं जातं की त्यांना टीमचा कर्णधार आणि काही ज्येष्ठ खेळाडूंचा पाठिंबा होता.
शिवाय असाही अंदाज होता की त्यांनी संचालक असताना भारतीय टीमला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत नेलं असल्याने शास्त्री 2019च्या इंग्लंड वर्ल्डकपसाठी टीम मजबूत करायला लागतील. शास्त्रींनी काही प्रमाणात ते केलं देखील.
टीमचे बॅटिंग कोच असणाऱ्या संजय बांगरला त्यांनी नुसतंच कायम न ठेवता, त्याला टीमच्या सहायक कोचपदी बढती दिली.
भरत अरूण यांची टीमचे बोलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावर वाद झाला कारण अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना त्यांना या पदावर भारताचा माजी जलदगती गोलंदाज जहीर खानची नियुक्ती करायची होती.
संघातल्या नव्या पिढीला विविध वातावरणामध्ये खेळण्याचा सराव व्हावा म्हणून भारताने देशाबाहेर खेळावं, यावर रवी शास्त्रींचा भर होता.
खेळाडूंना त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने खेळण्याची मुभा देत त्यांची बॅटिंग वा बॉलिंग कौशल्यं सुधारण्याबद्दल रवी शास्त्री ओळखले जातात.
पण वर्ल्ड कप 2019 सुरू व्हायच्या आधी आणि वर्ल्डकप दरम्यान त्यांनी घेतलेले काही निर्णय त्यांना भविष्यातही त्रास देत राहतील.
या प्रश्नांची उत्तरं रवी शास्त्रींकडे आहेत का?
बीबीसी हिंदीला दिलेल्या एका एक्सक्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान माजी भारतीय खेळाडू फारूख इंजिनियर यांनी रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.
"ऋषभ पंत सुरुवातीपासून या पथकाचा भाग का नव्हता? वर्ल्ड कपसाठीची टीम निवडत असताना इतके वाईट निर्णय का घेण्यात आले?" ते विचारतात.
"या पराभवासाठी टीमचे कोचही तितकेच जबाबदार आहेत असं वाटतं का," असं विचारल्यावर इंजिनियर म्हणतात, "एकट्या रवीला याचा दोष देता येणार नाही. संपूर्ण टीम हरली आणि त्या सगळ्यांसाठीच हा दिवस वाईट होता. पण हो, टीमची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावर चर्चा व्हायला हवी."
गेल्या दोन वर्षांमध्ये टीमच्या निवड प्रक्रियेमध्ये रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या मताला बऱ्यापैकी महत्त्वं दिलं गेलं आणि यातूनच दुसरा सवाल उभा राहतो.
पुजारा आणि रहाणे बाहेर का?
सगळ्या जगाला हे माहीत होतं की ही स्पर्धा इंग्लंडमध्ये अशा वातावरणात होणार आहे जिथे बॉल हवेत भरपूर वळतो. मग असं असताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना बाहेर का बसवण्यात आलं?
कोहलीशिवाय मुख्य कोच रवी शास्त्रींनाही पुजारा काऊंटी क्रिकेट खेळल्याचं माहीत होतं आणि इंग्लिश हवामानामध्ये उसळणाऱ्या आणि हवेत फिरणारा बॉल खेळताना तो चाचपडत नसल्याचंही त्यांना माहीत होतं.
तेच रहाणेच्या बाबतीत. आक्रमक बॉलिंग पडत असताना शांतपणे त्याचं ठामपणे सरळ बॅटने खेळण्याचं तंत्र त्याने अनेकदा, अनेक ठिकाणी दाखवलेलं आहे.
गेल्या आयपीएलमध्ये जलदगतीने धावा करत आणि मोठे शॉट्स खेळत त्याने त्याच्या विरोधकांची तोंड बंद केली.
त्याच्याही पेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या अंबाती रायडूचाही टीम निवडीदरम्यान विचार करण्यात आला नाही. कदाचित यामुळे त्याने वर्ल्ड कप सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा घाईघाईने केली.
पण जर टीमने विजय शंकर, मयंक अगरवाल आणि ऋषभ पंत सारख्या अननुभवी खेळाडूंची निवड करण्याची 'कॅलक्युलेटेड रिस्क' घेतली असेल, तर या खेळाडूंनी कामगिरी न केल्यावर त्याला जबाबदार कोण? या तिघांपैकी फक्त ऋषभ पंतने काही प्रमाणात आपली भूमिका बजावली.
याला जबाबदार आहेत सिलेक्टर्स, कर्णधार आणि कोच - जे या सगळ्यांमध्ये फक्त वयानेच नाहीत तर क्रिकेटमधल्या अनुभवानेही ज्येष्ठ आहेत.
यापुढचा प्रश्न विचारण्यात येऊन दोन दिवस उलटले असले, तरी उत्तर अजूनही अपेक्षित आहे.
धोनीला बढती का दिली नाही?
रोहित, विराट आणि राहुल असे टॉप ऑर्डरचे तिघे फक्त प्रत्येकी एक धाव करून बाद झाल्यानंतर रवी शास्त्री - विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीसारख्या अनभुवी खेळाडूला बढती देत वर खेळायला का पाठवलं नाही?
पंत, पांड्या आणि दिनेश कार्तिकनंतर धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवणं ही त्या दिवसांतली सगळ्यात मोठी चूक होती.
ज्यावेळी भारताला बॅटिंग ऑर्डरमधल्या अनुभवी खेळाडूची गरज होती, त्यावेळी धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंग करायला पाठवण्यात आलं.
हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकसारखे पिच-हिटर्स (मोठे शॉट्स मारणारे खेळाडू) धोनीच्या आधी खेळायला आले. पण भारताला जेव्हा अखेरीस मोठ्या फटक्यांची गरज होती, तेव्हा हे सगळे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये बसून होते.
माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी धोनीला उशिरा बॅटिंग करायला पाठवण्याचा विरोध केला आहे.
"धोनीला इतक्या खाली खेळायला पाठवणं हा तांत्रिक घोळ होता. त्यांना दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या विकेट्स वाचवता आल्या असत्या. धोनीला ऋषभ पंतसोबत भागीदारी उभी करता आली असती," अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्टदरम्यान समालोचन करताना लक्ष्मण म्हणाला.
सौरव गांगुलीलाही लक्ष्मणचं मत पटल्यासारखं वाटलं.
तो म्हणाला, "धोनी लवकर येऊ शकला असता आणि पूर्ण इनिंग्स खेळू शकला असता. मग आपल्या हातात जडेजा, पांड्या आणि कार्तिक राहिले असते. या तिघांनी शेवटच्या चार-पाच ओव्हर्समध्ये गेल्या काही काळात चांगली कामगिरी केलेली आहे."
पिच ओळखण्यात चूक झाली का?
शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टीम मॅनेजमेंटला पिच नेमकं समजलं होतं का?
स्वतः कोचनी त्यांच्या स्टाफच्या ज्येष्ठ सदस्य आणि खेळाडूंसोबत ओल्ड ट्रॅफर्डच्या पिचची मॅचच्या आदल्या दिवशी नेट्समधल्या सरावादरम्यान जवळून पाहणी केली होती.
जर धावपट्टी खरंच जलदगती गोलंदाजांना साथ देणारी वाटत होती, तर मग यजुवेंद्र चहल या स्पिनरला विश्रांती देऊन मोहम्मद शमीची निवड करत वेगवान हल्ल्याची तीव्रता वाढवता आली असती.
सेमी फायनलमध्ये जडेजाने स्पिनरची भूमिका बजावली. त्याने त्याच्या वाटच्या 10 ओव्हर्समध्ये फक्त 34 रन्स दिल्या आणि न्यूझीलंडच्या धोकादायक वाटणाऱ्या ओपनरची - हेन्री निकोल्सची महत्त्वाची विकेटही मिळवली.
पण यजुवेंद्र चहलने त्याच्या 10 षटकांमध्ये फक्त एक बळी घेत तब्बल 63 धावा दिल्या.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टुर्नामेंटमध्ये फक्त 4 मॅचेस खेळायला मिळालेल्या मोहम्मद शमीने त्यामध्येही 14 विकेट्स घेतल्या असून त्याला मात्र ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलं नाही.
क्रिकेट हा एक टीम गेम - सांघिक खेळ आहे यात शंकाच नाही. आणि पराभवाचा किंवा चुकीचा दोष कुणा एका व्यक्तीला देता येत नाही.
पण जर प्रत्येक निर्णयासाठी, रन, बॉलिंग किंवा घेतल्या - न घेतलेल्या कॅचसाठी कर्णधार आणि खेळाडूंवर टीका होत असेल तर प्रशिक्षक या मोठ्या जहाजाचा कॅप्टन असतो. आणि त्यालाही कठोर प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
फारुख इंजिनियर हे योग्य पद्धतीने मांडतात, "पराभवाची चिरफाड करणं अतिशय कठीण असतं. पण पराभवामुळे अनेक प्रश्नही उभे राहतात. म्हणजे समोरचा फील्डर आपल्या बाजूच्या स्टंपच्या दिशेने बॉल टाकत असल्याचं दुसरी धाव घेणाऱ्या धोनीला दिसूनही त्याने डाईव्ह का मारली नाही? आणि रविंद्र जाडेजा त्याच्या आयुष्यातल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असताना त्याला इतक्या मॅचेसपासून दूर का ठेवण्यात आलं? हे सगळं अगम्य आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)